नाशिक : जिल्हा वार्षिक योजनेतून २०२१-२२ या आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या ११८ कोटी रुपयांपैकी गत आठवड्यात ४९ कोटींच्या कामांवरील स्थगिती उठविल्यानंतर उर्वरित ७० कोटींच्या कामांवरील स्थगिती पालकमंत्री दादा भुसे यांनी उठविली आहे. त्यामुळे मार्च २०२३ पर्यंत हा निधी खर्च करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेने सुरू केले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली. (moratorium on Nashik ZP remaining 70 crore works also lifted Nashik News)
पालकमंत्री भुसे यांनी जिल्हा परिषदेत आढावा बैठक घेतल्यानंतर शासकीय विश्रामगृहावर झालेल्या विभागप्रमुखांची बैठक घेतली होती. यात मित्तल यांनी पालकमंत्र्यांना निधी खर्चावरील स्थगिती उठविण्याची विनंती केली. त्यानुसार २०२१-२२ या वर्षाचा निधी खर्च करण्यास त्यांनी परवानगी दिली आहे.
आढावा बैठकीनंतर पहिल्या दोनच दिवसांत पालकमंत्र्यांनी ४९ कोटींच्या निधीतील ४१६ कामांवरील स्थगिती उठविली होती. पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेकडून स्थगिती दिलेल्या कामांची यादी मागविली होती. मात्र, जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागांनी केवळ कामांची संख्या व एकूण निधी, अशी ढोबळ माहिती दिली होती.
विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेच्या विभागांनी ही माहिती जिल्हा नियोजन समितीचे सचिव असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्याऐवजी पालकमंत्र्यांच्या खासगी स्वीय सहाय्यकांकडे दिली. पालकमंत्री भुसे यांनी विभागप्रमुखांनी कामांची यादी दिली नसल्याचे सांगितले. त्यानंतर विभागप्रमुखांनी पुन्हा नव्याने याद्या तयार करून त्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविल्या.
जिल्हा परिषदेने पाठविलेल्या कामांच्या यादीमध्ये सर्वसाधारण क्षेत्रातील ७७ कोटी रुपये, आदिवासी विकास विभागाकडील ३७ कोटी रुपये, माडा क्षेत्र ७० लाख रुपये व विशेष घटक योजनेतील ३.५३ कोटी रुपये असे ११८ कोटी रुपयांच्या कामांचा समावेश होता. आता पालकमंत्र्यांनी स्थगिती उठविण्याचे निर्देश दिले असून, कामांना सुरवात झाली असल्याचे मित्तल यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.