MPSC Success : राज्यसेवा परीक्षेच्या खडतर प्रवासात पीएसआय, एसटीआय, एएसओ या पदांनी थोडक्यात हुलकावणी दिली. अनेकदा निराशेचे क्षण वाट्याला आले़; परंतु ‘भरत’ने न थांबता अभ्यासाची वारी सुरू ठेवली आणि यशाची पंढरी गाठली. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना सातत्य आणि संयम या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात.
आत्मविश्वास, अभ्यासातील सातत्य व प्रबळ इच्छाशक्ती या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास यश हमखास मिळते अन् हे सिद्ध केले आहे भरत नागरे याने. (MPSC Consistent success in state service study Success of Bharat Nagre in Civil Service Exam nashik news)
भरत नागरे चाडेगाव (ता. जि. नाशिक) येथील रहिवासी. आई-वडील शेतकरी. भरतचे प्राथमिक शिक्षण गावातील मनपा शाळा क्र. ७८ मध्ये झाले. माध्यमिक विद्यामंदिर एकलहरे येथून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
त्यानंतर भरतने शताब्दी पॉलिटेक्निकमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला. डिग्रीला प्रवेश घेण्यासाठी घरची परिस्थिती नव्हती म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पदवी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्र या विषयांमध्ये बाह्य विभागांतर्गत पदव्युत्तर पदवी घेतली. मधल्या काळामध्ये सुरवातीला कंपनीमध्येही काही काळ काम केले. नंतरच्या काळात स्वतःचे किराणा दुकान सांभाळत समांतररीत्या अभ्यासालादेखील सुरवात केली.
कुठल्याही बाह्य कोचिंगचा आधार न घेता नाशिक रोड देवी चौक परिसरात असलेल्या महापालिकेच्या अभ्यासिकेत बसूनच पूर्ण अभ्यास केला. २०१८ पासून भरत गट ‘ब’ ची परीक्षा पास होत गेला, परंतु अंतिम निकालात यश हुलकावणी देत राहिले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
२०२१ ला एसटीआय आणि एएसओ या पदासाठी एनटी-डी प्रवर्गातून दुसरा येऊनही तांत्रिक अडचणींमुळे यश मिळू शकले नाही. राज्यसेवेच्या तीन पूर्वपरीक्षा भरत यापूर्वी नापास झाला. त्यानंतरची चौथी पूर्वपरीक्षा पास झाला. पहिलीच मुख्य परीक्षा दिली आणि
उपशिक्षणाधिकारीपदी निवड झाली. या संपूर्ण प्रवासात नाशिक रोड अभ्यासिका परिवार, अटल ज्ञान संकुल आणि आर्यन अभ्यासिका यांचे योगदान आहे. गावात होणाऱ्या कोन बनेगा हजारपती या उपक्रमामुळे भरतला सामान्य ज्ञानाबद्दल गोडी निर्माण झाली आणि मित्र आकाश नागरे यांनी स्पर्धा परीक्षेची तोंडओळख करून दिली अन् स्पर्धा परीक्षा प्रवासाचा श्रीगणेशा झाला.
मला दोन भाऊ. मी कुटुंबातील सर्वांत लहान. एक भाऊ मतिमंद. एकंदरीत संपूर्ण वाटचालीत वडिलांचा आणि मोठा भाऊ नीलेश यांचा कायमच पाठिंबा राहिला, त्यामुळे हे यश मिळू शकले, असे ‘भरत’ने सांगितले.
"कुठल्याही परिस्थितीचा न्यूनगंड न बाळगता प्रामाणिकपणे मेहनत घेतली तर निश्चितपणे यश मिळते. योग्य अभ्यास साहित्य, योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मेहनत यांचा त्रिवेणी संगम यशाकडे घेऊन जातो. त्यासोबतच कुटुंबीयांची साथ असणंदेखील तितकंच महत्त्वाचे आहे. या यशाच्या पलीकडे जाऊन जी जबाबदारी मिळणार आहे, ती उत्कृष्टपणे पार पाडण्याचा माझा प्रयत्न असेल." - भरत नागरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.