''बहिणीच्या विवाहानंतर मला जबाबदारीची खरी जाणीव झाली. मग पुढे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचे ठरविले.''
पिलखोड (ता. चाळीसगाव) : ‘गेल्या सहा वर्षांपासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतो. ध्येय निश्चित होते. कुटुंबाची भक्कम साथ मिळाली. त्यामुळे चौथ्या प्रयत्नात यश संपादन करू शकलो’, अशी भावना पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या दिनेश पाटील (Dinesh Patil) याने व्यक्त केली. उपनिरीक्षकपदापर्यंत पोचण्यासाठी दिनेशने गावात रसवंती सुरू करून अभ्यासासाठी हातभार लावला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) २०२२ मध्ये घेतलेल्या मुख्य परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर केली. त्यात दिनेशची निवड झाली. दिनेशने दहावीपर्यंतचे शिक्षण माध्यमिक विद्यालय पिलखोड येथे पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी त्याने चाळीसगावातील बी. पी. आर्ट्स, एस. एम. ए. सायन्स, के. के. सी. कॉमर्स महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथे त्याने पदवीपर्यंतचे (बी.ए. हिंदी) शिक्षण घेतले. पदवीला असतानाच त्याला स्पर्धा परीक्षा खुणावत होती. त्यामुळे त्याने ‘एमपीएससी’चा अभ्यास करण्याचे ठरवले. त्यातही त्याने उपनिरीक्षकपदासाठी लक्ष केंद्रित केले.
दिनेश म्हणाला, ‘मी, आई-वडील आणि बहीण असे आमचे कुटुंब आहे. बहिणीच्या विवाहानंतर मला जबाबदारीची खरी जाणीव झाली. मग पुढे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचे ठरविले. घरच्यांवर आर्थिक जबाबदारीचे ओझे नको म्हणून २०१८ मध्ये गावात रसवंती सुरू केली. त्यानंतर २०१९ मध्ये जळगावला क्लास जॉइन केला. पुण्यातही दोन महिने क्लास केले. आमची जेमतेम ४६ गुंठे शेती होती. अभ्यासावर होणारा खर्च बघून वडिलांनी त्यातील १० गुंठे शेती विकली. आता उपनिरीक्षकपदी निवड झाल्यानंतर आई-वडिलांच्या कष्टाचे खऱ्या अर्थाने चीज झाले, असे म्हणता येईल.’
उपनिरीक्षकपदी निवड झाल्यानंतर दिनेशची स्वामी विवेकानंद अभ्यासिकेतर्फे गावात ढोल-ताशांच्या गजरात घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. या वेळी त्याचे ठिकठिकाणी औक्षण करण्यात आले.
आई-वडिलांचा विश्वास सार्थ ठरवू शकलो. बहिणीची साथ मिळाली. मित्रांनीही वेळोवेळी सहकार्य केले. माझ्या यशात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे आभार मानतो.
-दिनेश पाटील
- २०१९ : पूर्व परीक्षेत अपयश
- २०२० : मुख्य परीक्षेत यश, ग्राउंडमध्ये अपयश
- २०२१ : पूर्व परीक्षेत अपयश
- २०२२ : उपनिरीक्षकपदी निवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.