मुलवड (जि. नाशिक) : मुलवड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जवळपास मुलवडसहित ५० गावे येतात. येथील सर्व लोकांना आरटीपीसीआर चाचणीसाठी सुमारे ८० किलोमीटर अंतर कापत त्र्यंबकेश्वर येथे जावे लागत आहे. त्यामुळे या भागातील लोकांना मोठी कसरत करावी लागतेच व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
जिल्ह्याचे शेवटचे टोक
या ठिकाणच्या लोकांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने याकामी कामधंदे सोडून संपूर्ण दिवस घालावा लागतो. याशिवाय मोठी आर्थिक झळही सहन करावी लागते. या भागात दळणवळणाची साधने उपलब्ध नसल्यामुळे परतीच्या प्रवासात अनेक अडचणी येतात. मुलवड हे नाशिक जिल्ह्याचे शेवटचे टोक असून, अतिदुर्गम भाग आहे. या भागात लसीकरणालाही अद्याप सुरवात झाली नाही. याबाबत त्र्यंबकेश्वर तालुका कोविड सेंटरच्या वैद्यकीय अधिकारी रेखा सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, की मुलवड, चिंचओहोळसारख्या भागात कुठल्याही प्रकारची मोबाईल रेंज नसल्यामुळे कोविड संदर्भात रजिस्ट्रेशन करण्यात अडचणी येतात. त्याशिवाय चाचणी किंवा लसीकरण करणे शक्य नाही. टप्प्याटप्प्याने या भागात लवकरच सुविधा उपलब्ध करून देऊ. सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग भोये म्हणाले, की या भागातील लोकांची आर्थिक व भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने लवकरच उपाययोजना करून सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या, जेणेकरून कोणालाही मानसिक त्रास होणार नाही.
रेंजचा प्रश्न गंभीर
याअगोदरही मोबाईल रेंज संदर्भात ‘सकाळ’ने बातमी प्रकाशित केली होती; परंतु अद्याप प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही. या भागात मोबाईल रेंजचा प्रश्न मोठा गंभीर आहे. ऑनलाइनची सर्व कामे करण्यासाठी ३५ किलोमीटर हरसूलला जावे लागते. या भागात मोबाईल रेंजसाठी आणखी किती दिवस वाट पाहावी लागणार, हा प्रश्र्न येथील नागरिकांना पडला आहे. संबंधित विभागाने लक्ष घालून लवकरच उपाययोजना कराव्यात, ही येथील जनतेची मागणी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.