नामपूर : येथील बाजार समिती व करंजाड उपबाजार आवारात १ हजार ४३८ वाहनांमधून सुमारे २८ हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची विक्रमी आवक झाली.
उन्हाळ कांद्याला २ हजार ५०० ते २ हजार ९५० रुपये प्रती क्विंटल असा सर्वोच्च, २ हजार १०० ते २ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल असा सरासरी भाव मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब अहिरे, उपसभापती भाऊसाहेब कांदळकर यांनी दिली. (Nampur received 28 thousand quintals of onion Rs 2950 highest pric Satisfaction among farmers nashik)
सप्टेंबर महिन्यात कांदा व्यापाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सलग बारा दिवस जिल्ह्यातील बाजार समित्या बंद होत्या.
ऑगस्ट महिन्यात थोड्याफार प्रमाणात कांद्याच्या दरात वाढ होताच केंद्र सरकारने कांद्याचे निर्यातमूल्य ४० टक्के वाढवल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली.
शेतकऱ्यांनी आंदोलनात्मक पवित्रा स्वीकारून केंद्र शासनाच्या निर्णयाच्या निषेधार्थ जिल्ह्यात विविध बाजार समित्यांमध्ये शेतकरी संघटनेतर्फे रास्तारोको आंदोलने करण्यात आली.
त्यामुळे गेल्या दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात बाजार समित्यांमध्ये आर्थिक व्यवहार ठप्पच होते. गेल्या तीन दिवसांपासून येथील बाजार समिती, करंजाड उपबाजार आवारात उन्हाळ कांद्याची विक्रमी आवक झाली.
मोसम खोऱ्यात परिसरासह साक्री तालुक्यात यंदा विक्रमी कांदा शेतकऱ्यांकडे होता. परंतु रोगट हवामानामुळे कांद्याचे आयुष्य कमी झाल्याने चाळीत साठवून ठेवलेला कांदा खराब झाला आहे.
मार्च महिन्यापासून कांद्याच्या दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च देखील भरून निघत नव्हता. कांद्याच्या दरात सातत्याने चढउतार होत असल्याने शेतकरी दैनंदिन कांदा विक्रीचे नियोजन करत आहे.
कांद्याचे दर काही प्रमाणात टिकून असल्याने उन्हाळ कांद्याची बाजारात विक्रमी आवक होत आहे. कांद्याने भरलेल्या वाहनांच्या गर्दीमुळे नळकस रस्त्यालगत वाहतूक विस्कळीत झाली होती.
परिसरातून येथील बाजार समितीत, करंजाड उपबाजार आवारात मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. सकाळी दहापासून लिलावाला सुरुवात झाली. नामपूरला ८५९ वाहने तर करंजाडला ५७९ वाहनांचे लिलाव करण्यात आले.
शेतकऱ्यांनी मालाची प्रतवारी करून माल विक्रीस आणावा, लिलाव झाल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांकडून रोख पेमेंट घ्यावे, कोरोनाकाळात गर्दी टाळण्यासाठी बाजार समिती प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सचिव संतोष गायकवाड, अरुण अहिरे यांनी केले आहे.
नामपूरचे भाव व वाहनांची संख्या
१) २५००/२९५० रुपये : २७०
२) २१००/२४००रुपये : ४००
३) १५००/२००० रुपये : २२
४) १०००/१५०० रुपये : ६२
५) २५५/१०००रुपये : १०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.