नांदगाव (जि. नाशिक) : वाहतूक कोंडी अन् शहराचे अतूट नाते असल्याने सणासुदीच्या दिवसात ट्रॅफिक जॅम अंगवळणी पडू लागली आहे. नांदगावमधील वाहतुकीचे नियमन होण्याची शक्यता दुर्मिळ वाटू लागली आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या नांदगाव शहराच्या नगररचनेचा कुठलाही मागमूस नसल्याने निमशहरी असूनही या दीर्घकालीन समस्येवर अजूनही नेमकेपणाने उत्तर सापडलेले नाही. (Nandgaon people are suffering due to traffic jams Nashik Latest Marathi News)
येवला, चाळीसगाव, औरंगाबाद, पिलखोड, बोलठाण, मालेगाव व मनमाड, अशा सहाही बाजूने शहराच्या मध्यभागातून राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्ग जातात. मात्र, जुना राज्य मार्ग असो, की नवा राष्ट्रीय महामार्ग मूळ आरेखनप्रमाणे उपलब्ध नाही. सगळ्या बाजूंनी रस्त्याला ओरबाडण्यात कुठलीही कसर न ठेवल्याने अरुंद रस्त्यांच्या जाळ्यात असलेले नांदगाव, अशी अवस्था सध्या तरी बनली आहे. बाह्यवळण रस्त्याला मुहूर्त लागत नाही.
रेल्वे फाटक बंद करून काढलेला ‘सब-वे’ची नवी समस्या म्हणून डोकेदुखीचा विषय बनला आहे. आरेखन चुकले, म्हणून ओरड झाली. एखादा विषय राजकरणात अडकला, की त्याचे काय घडते, याचे उत्तर या ‘सब-वे’त दडले आहे. अभियांत्रिकी विभागाने ‘सब-वे’चे आरेखनात दोष ठेवले, हे सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट असले, तरी ‘सब-वे’चा सर्वप्रथम प्रस्ताव कुणामुळे आला. कुणी ‘सब-वे’चे स्थळ सुचविले. ते नामानिराळे राहून ‘ सब-वे’चे रडगाणे सुरू आहे. पर्याय म्हणून स्वीकारलेल्या ‘सब-वे’चाच आता श्वास गुदमरायला लागला आहे.
दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी वाढल्याने वाहनांची संख्या वाढून गेल्या चार दिवसांपासून वाहतुकीची कोंडी होत आहे. पालिका, पोलिस व सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वेपैकी एकही यंत्रणा वाहतुकीचे नियमन करायला तयार नाही. साहजिकच वाहतूक कोंडी सुटण्यासाठी कुणालाही वेळ नाही . वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची सुविधा नसल्याने नागरिक खरेदीसाठी आलेल्या दुकानांसमोर वाहने लावूनच खरेदी करतात, असा युक्तिवाद करण्यात येतो.
मात्र, पार्किंगसाठी जागा आणायची कुठून हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते. त्यातच अतिक्रमण, अस्ताव्यस्त उभ्या वाहनाचा वेढा, या सगळ्यात विक्री करणारे ‘पापी पेट’ का सवाल म्हणून नेहमीचे रडगाणे गात आहेत. त्यात खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीचा मोठा हातभार लागला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.