वणी - दिंडोरी- पेठ मतदारसंघात विविध रस्त्यांची नूतनीकरण, मजबुतीकरणाची कामे मंजूर असून, या कामांची गुणवत्ता राखत लवकरात लवकर दर्जात्मक कामे पूर्ण करून घेण्यासाठी बांधकाम विभागाने दक्षता घ्यावी,
असे आवाहन करतानाच कुठेही कामातील हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिला.
श्री. झिरवाळ यांनी दिंडोरी येथील शासकीय विश्रामगृहात दिंडोरी व पेठ तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, इमारत व दळणवळण, बांधकाम विभाग यांच्या अभियंता, शाखा अभियंता यांच्यासोबत विविध मंजूर,
तसेच नियोजित कामांचा आढावा घेतला. त्यावेळी ते म्हणाले की, दिंडोरी- पेठ मतदारसंघातील कोट्यवधींची विकासकामे मंजूर आहेत. त्यात रस्त्यांची दुरवस्था बघता बहुतांशी रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली असून, काही कामे झाली आहेत. तर काही सुरू आहेत.
काही कामे लवकरच सुरू होणार आहेत. मात्र सदर कामांच्या गुणवत्तेबाबत नागरिकांच्या तक्रारी असून, कामाची गुणवत्ता राखण्याची व ठेकेदारांकडून निविदेनुसार काम करून घेण्याची जबाबदारी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची आहे.
त्यांनी ती जबाबदारी पूर्ण करत काम चांगले करून घ्यावे. अन्यथा त्याची जबाबदारी आपली राहील, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. प्रशासकीय दिरंगाईमुळे कोणताही निधी परत जाता कामा नये. अन्यथा कुणाचीही गय केली जाणार नाही.
दिंडोरी, पेठ येथील प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. गांगुर्डे आदींसह संबंधीत विभागांचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. ज्येष्ठ नेते विश्वासराव देशमुख, जि. प. सदस्य भास्कर भगरे, माजी उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, भाऊसाहेब पाटील, डॉ. योगेश गोसावी, कचरू पाटील आदींनी विविध सूचना मांडल्या.
३३ कोटींच्या कामांना मंजुरी
जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांच्या कामासाठी सुमारे ३३ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मागे एका अधिकाऱ्याच्या बेपरवाहीमुळे निधी परत गेला होता. आता पुन्हा तसा प्रकार होणार नाही याची दक्षता अधिकाऱ्यांनी घेऊन त्वरित प्रशासकीय कारवाई पूर्ण करत कामे सुरू करावी, अशी सूचनाही श्री. झिरवाळ यांनी या वेळी केली.
रस्ता दर्जा उन्नतीसाठी प्रयत्नशील
दिंडोरी तालुक्यातील सर्वच रस्त्यांवर औद्योगिक व शेती यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. हे रस्ते जिल्हा, तालुका व गावांना जोडणारे असल्याने त्यास निधी कमी मिळतो. त्यामुळे रस्ते लवकर खराब होतात.
काही रस्त्यांना दर्जा उन्नती दिली आहे, तेथे मजबुतीकरण होईल. मात्र अजूनही अनेक रस्त्यांची दर्जा उन्नती होण्याची गरज आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ अहवाल शासनास पाठवावा. असेही श्री. झिरवाळ यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.