Nashik ZP Recruitment : विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने जिल्हा परिषदेच्या रखडलेल्या पदभरतीतील उमेदवारांना नियुक्तिपत्र देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत निकाल घोषित झालेल्या आरोग्यसेविका, आरोग्यसेवक पुरुष (४० टक्के) या उमेदवारांच्या कागदपत्रांची सोमवारी (ता. ७) तपासणी करण्यात आली. कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर दोन दिवसांत उमेदवारांना नियुक्तिपत्र दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी दिली. (700 health workers to ZP)
ग्रामविकास विभागाच्या मान्यतेनुसार १८ ते ३० जुलैदरम्यान घेण्यात आलेल्या आरोग्यसेवक (महिला), आरोग्यसेवक (पुरुष), ४० टक्के आरोग्यसेवक (पुरुष), ५० टक्के (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) या पदांच्या परीक्षेचा निकाल ‘आयबीपीएस’कडून प्राप्त झाल्यावर २९ ऑगस्टला तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांच्या मान्यतेने जाहीर करण्यात आला होता.
निकाल घोषित झाल्यावर पुढील प्रक्रियेबाबत शासनस्तरावरून कोणतेही आदेश प्राप्त झालेले नव्हते. मात्र, गत आठवड्यात मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीनंतर, जिल्हा परिषदेच्या पदभरतीतील उमेदवारांना नियुक्तिपत्र देण्याबाबतचे पत्र आरोग्य विभागाकडून प्राप्त झाले.
त्यानुसार, प्रसिद्ध झालेल्या उमेदवारांना शनिवारी व रविवारी आरोग्य विभाग खुला ठेवत, मोबाईलद्वारे कागदपत्रांच्या पडताळणीसाठी बोलविण्यात आले. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल यांच्या नेतृत्वाखालील १५ तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या सहयोगाने तयार करण्यात आलेल्या २० टीमद्वारे उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.
मुख्यालयातील जुन्या सभागृहात सेवकपदासाठी आलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी झाली. आरोग्यसेविका या पदाच्या ५९७ जागांसाठी ७०० हून अधिक उमेदवारांना बोलविण्यात आले असून, रात्री उशिरापर्यंत ही तपासणी सुरू होती. (latest marathi news)
राहिलेली काही तपासणी ही मंगळवारी (ता. ८) केली जाणार आहे. आरोग्यसेवक (४० टक्के पुरुष) या पदाच्या ८५ जागांसाठी २०० उमेदवारांना बोलावून त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी झाली. दोन दिवसांत अंतिम यादी प्रसिद्ध करून नियुक्तिपत्रे देण्यात येणार आहेत.
जि. प. मुख्यालयाला जत्रेचे स्वरूप
आरोग्यसेवक, सेविका या पदाच्या उमेदवारांच्या कागदपत्रांच्या तपासणीसाठी उमेदवारांना बोलविण्यात आले होते. अगदी अमरावती, चंद्रपूर जिल्ह्यांतून उमेदवार आलेले होते. अनेक उमेदवारांबरोबर त्यांचे नातेवाईकही असल्याने मुख्यालयात एकच गर्दी झाली होती. मुख्यालयाच्या आवारात ही गर्दी झाल्याने आवाराला जणू जत्रेचे स्वरूप आलेले दिसत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.