Nashik News : संत निवृत्तिनाथ पालखी सोहळा नियोजनाबाबत जिल्हा परिषद प्रशासन उदासीन असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केल्यावर खडबडून जाग्या झालेल्या प्रशासनाने लागलीच पालखी सोहळा नियोजनाची जबाबदारी नोडल अधिकारी म्हणून ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांच्याकडे सोपविली आहे. (Administration work for Sant Nivruttinath Palkhi ceremony planning)
नोडल अधिकारी संगमनेरे यांनी लागलीच नियोजनाचा प्रस्ताव तयार करण्यास सुरवात केली आहे. वारकरी संघटनाच्या शिष्टमंडळाने सोमवारी (ता. २७) मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, नोडल अधिकारी संगमनेरे यांची भेट घेतली. या भेटीत पालखीचे तत्काळ नियोजन करून प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी केली.
संत निवृत्तिनाथ, संत सोपानकाका व संत मुक्ताई या दिंडी सोहळ्यांना निर्मळवारीसाठी २० कोटी रुपये देण्याची घोषणा शासनाने केली होती. त्यानुसार शासनाने जिल्हा परिषद प्रशासनाला पत्र पाठवून आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे एप्रिल २०२४ मध्ये पुन्हा पत्र पाठवत दिंडीतील भाविकांना पाणी, आरोग्य सुविधा व शौचालय सुविधांबाबतचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले.
त्या पत्राला महिना उलटूनही जिल्हा परिषदेने अद्याप प्रस्ताव पाठविला नाही. संत निवृत्तिनाथ पालखी सोहळाही २१ जूनला प्रस्थान करणार आहे. आता मेचा शेवटचा आठवडा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने अद्याप ग्रामविकास विभागाला प्रस्ताव पाठविलेला नसल्याचे समोर आले होते. (latest marathi news)
याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने यासाठी प्रकल्प संचालक संगमनेरे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली. तसेच, त्यांनी तातडीने विभागप्रमुखांची बैठक घेऊन प्रस्ताव तयार करावा. सदर प्रस्ताव तपासून घेऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने शासनाला सादर करावा, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले.
"मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश प्राप्त झाल्यावर ग्रामीण विकास यंत्रणेकडून प्रस्ताव तयार करण्यास सुरवात केली आहे. दोन दिवसांत प्रस्ताव अंतिम करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने शासनाला सादर केला जाईल." - प्रतिभा संगमनेरे, प्रकल्प संचालक, ग्रामीण विकास यंत्रणा, नाशिक
आचारसंहितेतून सवलत मिळावी
दरम्यान, लोकसभा निवडणूक, त्यापाठोपाठ लागलीच शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे. यातच, २१ जूनला पालखी प्रस्थान करणार आहे. त्यामुळे प्रस्ताव सादर करून मंजूर करणे, निधी प्राप्त करून घेणे यास आचारसंहितेचा अडथळा आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी सोमवारी (ता. २७) जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे याबाबत चर्चा करीत, पालखी सोहळा प्रस्तावास आचारसंहितेतून सवलत मिळावी, अशी मागणी केली आहे. त्यासाठी निवडणूक आयोगालाही पत्र द्यावे लागणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.