Nashik News : राजकारणात जातीचा आणि प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा नेहमीच कुठल्याही उमेदवाराच्या पथ्यावर पडत असतो. यंदा नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात उमेदवारांच्या मुळ अस्मितेचा मुद्दा तेथील राष्ट्रवादीच्या आमदारांसाठी चांगलाच अडचणीचा ठरला आहे. त्यामुळे आमदारांना ठोस भूमिका घेता येत नाही. (Nashik and Dindori Lok Sabha)
घेतली तरी कार्यकर्ते आपले किती ऐकतील याविषयी स्वत:लाच साशंकता असल्याने लोकसभेच्या निवडणुकीत आमदारांचीच कोंडी झाल्याचे दिसून येते. नाशिक व दिंडोरी लोकसभेसाठी आठ दिवसांनी (२० मे) मतदान होणार असल्याने निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे प्रचारसभांना काहिसी अडचण निर्माण झालेली दिसते.
पण या सर्व अडथळ्यांवर मात करुन उमेदवारांचा वेगवेगळ्या मार्गांनी प्रचार सुरुच आहे. नाशिकमध्ये महाविकास आघाडीचे राजाभाऊ (पराग) वाजे हे सिन्नरचे माजी आमदार आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दोन हजार मतांनी अगदी निसटता पराभव झाला. त्यानंतर अडिच वर्षांनी शिवसेनेत फूट पडली आणि अनेक नेते उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सोबत गेले.
पण वाजेंनी पक्ष बदलला नाही म्हणून त्यांना थेट लोकसभेची उमेदवारी मिळाली. त्यांच्या उमेदवारीमुळे सिन्नरकरांच्या अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून आला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटेंना सिन्नरकरांनी एकतर्फी साथ दिली. पण त्याचे रुपांतर विजयात होऊ शकले नाही, हा भाग अलहिदा. यंदा वाजेंच्या रुपाने पुन्हा सिन्नरकर एकत्र आल्याचे दिसून येते. (latest marathi news)
यात आमदार कोकाटेंच्याही कार्यकर्त्यांचा समावेश झाल्याने त्यांना ठोस भूमिका घेताना अडचण झाली आहे. कार्यकर्त्यांना महायुतीचा प्रचार करायला सांगावे तर, ते ऐकतील का आणि आपल्या तालुक्याचा उमेदवार लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यास पुन्हा विधानसभेला तो आपल्यालाच आव्हान देईल, याची भिती कोकाटेंच्या समर्थकांना वाटू लागली आहे.
या पराभवाची सहानुभूती विधानसभेला त्यांना मिळू शकते, यामुळे आमदारांनी सावध पवित्रा घेतलेला दिसून येतो. अशीच परिस्थिती दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे व डॉ. भारती पवार यांच्या बाबतीत निर्माण झाली आहे. भास्कर भगरे मुळचे दिंडोरीचे असल्यामुळे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना थेट त्यांच्या विरोधात जाऊन महायुतीचा प्रचार करताना अडचण झाली आहे.
स्थानिक लोक आपल्या विरोधात जातील आणि विधानसभेला आपल्याला ‘पाणी पाजतील’ अशी भिती त्यांच्याही मनात आपसुकच निर्माण झाली असेल. त्यामुळे कधी महायुतीच्या तर कधी महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर उपस्थित राहुन त्यांनी ‘तळ्यात-मळ्यात’ चा खेळ चालवला आहे. भगरे लोकसभेला पराभूत झाले तर दिंडोरीत विधानसभेचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितले जाईल आणि आपल्यासमोर नवा पर्याय उभा राहिल.
अशी भिती झिरवाळांच्या गोटातील लोकांना वाटू लागली आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत असे विपरीत काही घडू नये, अशी त्यांची मनोमन इच्छा असेल. असेच कळवणच्या बाबतील आमदार नितीन पवारांनाही वाटू लागले आहे. डॉ.भारती पवारांचा प्रचार करावा तर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे लोक दुखावतील.
लोक दुखावले तरी आपण महायुतीचा धर्म पाळत असल्याचे त्यांनी भासवले तरी निवडणुकीत उमेदवार पराभूत झाला तर विधानसभेला आपल्याच विरोधात त्यांना उतरवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. डॉ.पवार या मूळच्या कळवणच्या असल्यामुळे त्यांच्यासाठी काम करणे तसे आमदार पवारांना सोपे आहे.
‘जर तर’च्या या राजकारणात तथ्य नाही, असे आपण गृहित धरले तरी उमेदवारांच्या प्रादेशिक अस्मितेच्या मुद्याने राष्ट्रवादीच्या आमदारांची कोंडी केली आहे, हे तीनही आमदारांचे कार्यकर्ते मान्य करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.