Nashik News : योग दिन हा एक दिवसासाठी नसावा, तर तो सप्ताहभर व्हायला हवा. शरीर आणि मन जोडण्याची योगामध्ये ताकद असून, पहिले प्राधान्य शरीराला द्यायला हवे, असे आवाहन योगशिक्षक संगू गुरुजी यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी झालेल्या विशेष सत्रात केले. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर योग, प्राणायाम, ध्यानधारणा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
सुयश हॉस्पिटल, संगू गुरुजी चॅरिटेबल ट्रस्ट, एम्पायर स्पायसेस ॲन्ड फूड्स लिमिटेड व भारत विकास परिषद, नाशिक मिडटाउन पुरस्कृत यांच्यातर्फे योग दिनानिमित्त रविवारी (ता. १६) सुयश हॉस्पिटलमध्ये खास ज्येष्ठ नागरिकांसाठी घेण्यात आलेल्या कार्यशाळेत बोलत होते. बाहेर पाऊस पडत असतानाही शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी प्रास्ताविक करताना उपक्रमामागील भूमिका मांडली. या वेळी सुयश हॉस्पिटलचे संचालक डॉ. हेमंत ओस्तवाल, योगशिक्षक संगू गुरुजी व सरू माँ, नवे नाशिक ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष देवराम सैंदाणे, गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव ओमप्रकाश शर्मा.
श्री निरामय ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा वैशाली पिंगळे, श्री सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव प्रकाश महाजन, शतायुषी ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव सुरेश कांबळे, सिद्धेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष संपतराव मुसळे, द्वारका परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचे रघुनाथ कुलकर्णी व कुमुदिनी कुलकर्णी यांच्यासह शहरातील विविध ज्येष्ठ नागरिक संघांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
सरू माँ यांच्या ओमकार गायनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. संगू गुरुजी यांनी ज्येष्ठ नागरिकांकडून चेअर योगासह प्राणायाम व ध्यानधारणेची प्रात्यक्षिके करून घेतली. मानेचा व्यायाम व त्याचे महत्त्व पटवून दिले. खुर्चीवर बसून सूर्यनमस्कार कसे करावेत याविषयीची प्रात्यक्षिके करून घेतली. ते म्हणाले, ‘‘प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने वेळ नाही अशी सबब न सांगता, वेळ काढून आपल्या बहुमूल्य शरीराचे स्वास्थ्य जपावे. (latest marathi news)
आपल्याबरोबर जन्मापासून मृत्यूपर्यंत फक्त शरीरच साथ देत असते. म्हणून पहिले प्राधान्य देऊन शरीराला बेस्ट फ्रेंड मानावे. आताच जागे व्हा आणि शरीरासाठी वेळ काढा. हातपाय हलविणे म्हणजे योग नव्हे. शरीर आणि मन जोडणे याला योग म्हणतात. शरीर आणि मन एकत्र जोडले जाते तेव्हा आत्मशक्ती जागृत होते.
आत्मशक्ती वाढते. हीच आत्मशक्ती वाढल्याने आपल्या शरीरातील आजार बाहेर पळू लागतात आणि परमात्मा शक्तीशी आपण जोडले जातो. म्हणून योग शास्त्रशुद्ध पद्धतीने केला जावा.’’ या वेळी ज्येष्ठ नागरिकांनी ब्रिदिंग एक्सरसाइज, भामरी प्राणायाम, उभे राहून करावयची आसने, अर्धकटी चक्रासन, ताडासन व त्याचे विविध प्रकार, दहा मिनिटांचे मेडिटेशन याची अनुभूती घेतली.
व्हेरिकोज व्हेन्स, पॅरालिसिस, पोटऱ्या दुखणे या आजारांसाठी योगासने किती महत्त्वाची आहेत हे उदाहरणासह पटवून दिले. या सप्ताहासाठी माध्यम प्रायोजक ‘सकाळ’ असून, रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास हे आहेत. ‘सकाळ सीनिअर सिटिझन फोरम’चे समन्वयक संजय चव्हाण यांनी आभार मानले.
वृद्धत्व टाळण्यासाठी योग, मेडिटेशन आवश्यक ः डॉ. ओस्तवाल
आपल्या पूर्वजांनी जपलेल्या योगशास्त्रापासून आपण दूर गेल्यामुळे वेगवेगळ्या आजारांना बळी पडत आहोत. वैद्यकशास्त्र कितीही प्रगत झाले असले तरी त्यालाही मर्यादा आहेत. अद्ययावत हॉस्पिटल इमर्जन्सीसाठी महत्त्वाची असली तरी माणूस आजारीच पडू नये ही ताकद फक्त योगा, मेडिटेशनमध्येच आहे. मनाने तरुण माणसे कधीही वृद्ध होत नाहीत.
हे वृद्धत्व टाळायचे असेल तर योगा आणि मेडिटेशनशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन सुयश हॉस्पिटलचे संचालक डॉ. हेमंत ओस्तवाल यांनी केले. ते म्हणाले, की दुखणी टाळायची असतील तर प्रत्येकाने एक्सरसाइज आणि योगा, प्राणायाम, मेडिटेशन करायला हवे. काही जण यूट्यूबरून योग शिकतात. मात्र एखादी स्टेप चुकली तर त्याची किंमतही मोजावी लागू शकते. त्यामुळे योग्य व्यक्तीकडून ते शिकून घेणे उचित ठरते. आपल्या शरीराचा रक्तपुरवठा सुरळीत असेल तर आरोग्य चांगले राहते. हाच रक्तपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्राणायाम, मेडिटेशन, योगा महत्त्वाची भूमिका बजावतो, असे सांगत स्ट्रेसची व्याख्या सोप्या शब्दांत मांडली.
संगू गुरुजींच्या टिप्स
- मानेवर ताण पडू नये म्हणून मानेचा व्यायाम महत्त्वाचा.
- ज्याच्या पोटऱ्या निरोगी त्याचे आरोग्य उत्तम.
- योग-ध्यानधारणेसाठी कारणे न सांगता वेळ काढा.
- आपले शरीर बेस्ट फ्रेंड.
- वाढत्या वयात पॅरालिसिस टाळण्यासाठी ब्रिदिंग एक्सरसाइज महत्त्वाची.
- योगामुळे विल पॉवरची जागृती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.