Gurumauli Annasaheb More  esakal
नाशिक

Gurumauli Annasaheb More : खरिपाचा, सुगीचा हंगाम ‘कृषी-चातुर्मास’ : गुरुमाउली आण्णासाहेब मोरे

सकाळ वृत्तसेवा

त्र्यंबकेश्‍वर : खरिपाचा, सुगीचा हंगाम म्हणजे कृषी-चातुर्मास होय. वर्षाऋतू, शरद ऋतूच्या नैसर्गिक पर्यावरणाबरोबर मनाचे व जगण्याचे पर्यावरण संतुलित ठेवणारा, प्रसन्नता, आनंदाचे शिडकावे देत कष्ट व चिंता विसरायला लावणारा चातुर्मास म्हणजे कृषी-चातुर्मास होय, असे दिंडोरी प्रणीत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांनी शनिवारी (ता. ८) येथे सांगितले. (Gurumauli Annasaheb More)

श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर येथे शनिवारी साप्ताहिक सत्संग झाला. या वेळी राज्यभरातून आलेल्या सेवेकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. गुरुमाउली म्हणाले, की आषाढी एकादशीला पंढरपूरच्या सावळ्या सुंदर श्री विठ्ठलाचे दर्शन डोळे भरून घेतले की पौर्णिमेला श्री गुरूंच्या चरणी विनम्रतेने शरणागत व्हायचे.

सद्‌गुरू ‘रक्षक’ असल्याचा आधार-विश्वास घेऊन शेतीच्या कामात बुडून जायचे, ही रीत तमाम ग्रामीणांच्या अंगवळणी पडलेली, रुजलेली रीत आहे. या शाश्वत परंपरेतून कृषी-संस्कृती अर्थात भारतीय संस्कृती घडली, वाढली आहे. या संस्कृतीने कर्मात राम पाहायला शिकविले. या संस्कृतीने सौंदर्याला अर्थ व जाण दिली. या संस्कृतीने कृषकाला ऋषी बनविण्याची दृष्टी व सामर्थ्य दिले. मातीचे, मेघांचे, पिकांचे सावळेपण या बळीराजाने विठ्ठलाच्या रूपाने, नीलकंठ शंकराच्या रूपाने अनुभवले.

जगणे आणि अध्यात्म असे शेतीतून एकरूप झाले. कृषी-चातुर्मास हा आध्यात्मिक दृष्टीने महारुद्र व भवानीच्या उपासनेचा कालखंड आहे. हरिहराची एकरूपता ही त्यात उत्कृष्टरीत्या सामावली. या एकरूपतेतून वेदांत निर्माण झाला आहे. तसेच, या एकरूपतेतून सणवारांची धारणा स्थिर झाली. श्री विठ्ठलाच्या भक्तिरसाने पर्जन्याला निमंत्रित केल्यावर अन्नब्रह्माची आराधना करीत पेरणी होते. अंकुरित झालेल्या रोपांनी बहरलेल्या पृथ्वीची, ग्रामदेवतांची, सीतारूप शेतीची पूजा होते.

श्रावणातल्या सरींबरोबर भगवान शंकराच्या पिंडीवर रुद्राभिषेक सुरू होतो व दुपार भागवताच्या रसरंगात न्हाऊन निघते. श्रावणाच्या पहिल्या पंधरवड्यात नागपंचमी, तर दुसऱ्या पंधरवड्यात गोपालकाला श्रीकृष्णाची दहीहंडी, असा हरिहराचा उत्सव लोकजीवनात ऊन-पावसाप्रमाणे आनंद-अध्यात्माचे इंद्रधनुष्य जीवन-आकाशात साकारत असतो. लोकमनांच्या उदात्त भावभूमीत उपकारकर्त्या सर्व निसर्ग-घटकांना देवत्व मिळाले. (latest marathi news)

या कृतज्ञतेतून देवतांची सगुण रूपे आविष्कृत झाली व महान, विशाल प्रतीकार्थांचा अथांग सागर ग्रंथांच्या शब्द-शब्दांतून उसळला. उदाहरण द्यावयाचे झाले तर श्रावण समाप्तीच्या पिठोरी अमावास्येचा ‘पोळा’ सणाचे घेऊ या. श्रावण वद्य नवमी ते अमावास्या म्हणजे वृषभ नवरात्र होय. गोपालक श्रीकृष्णाच्या जयंतीनंतर हे नवरात्र सुरू होते.

भारतीय संस्कृती व कृषी जीवनात, आरोग्यशास्त्र व आयुर्वेदात गायीचे विशेष महत्त्व आहे. पृथ्वी ही कामधेनू आहे. भगवान दत्तात्रेयांच्या बरोबर ही कामधेनू नित्य असते. ब्रह्मर्षी वसिष्ठांनी तपश्चर्येने कामधेनू मिळवली. सर्व कामना, अभिलाषा, आकांक्षा पूर्ण करणारी कामधेनू सर्व धनांची, वैभवांची दात्री आहे. या कामधेनूची सेवा करणाऱ्या राजा दिलीपपासून रघुवंशाची उन्नती व भरभराट होते व या सेवेनेच प्रभू श्री रामचंद्राच्या अवताराची मूळ पीठिका तयार होते.

प्रतीकार्थाने कामधेनूची सेवा म्हणजे नव्या आर्य, भारतीय संस्कृतीच्या सामंजस्यातून उत्कर्षाकडे वाटचाल करणाऱ्या कृषी-संस्कृतीच्या भरभराटीची, प्रगतीची सुरवात होय. यातून भगवान शिवाच्या सेवेला नवे रूप, नवे अर्थ मिळाले व ही सेवा शेषशायी महानारायणाशी एकरूप होत गेली. वेदांमध्ये ही ज्ञानात्मक संवेदनांची पावन यात्रा अक्षरबद्ध झाली आहे. अथर्ववेदात गहिस्थ्य जीवनाचे अकराशे मंत्र दिले आहेत.

त्यात गोधन, वृषभधनाची महती सांगताना दुसऱ्या मंडलात म्हटले आहे, की ‘अपां यो अग्रे प्रतिमा बभूव प्रभू: सर्वस्मै पृथिवीव देवी। साहस्त्रे पोषे अपि न: कृणोतु।’ वृषभ मेघांप्रमाणे सर्वांचा प्रभू व पृथ्वी देवतेप्रमाणे सर्वांचा उपकारक आहे. हा वृषभ हजारो प्रकारच्या पुष्टी देऊन आमचे रक्षण करो. सोमरसाने भरलेला कलश धारण केलेला वृषभ इंद्रशक्ती धारण करणारा आहे. हा बैल शिंगांनी राक्षसांचा विनाश करतो व नजरेने दुष्काळाचा नाश करतो. शतपथ ब्राह्मण ग्रंथातही अशा प्रकारचे वृषभ-वर्णन पाहावयास मिळते.

तात्पर्य हेच की शेतीला संपन्न करण्यात बैलाचे सहकार्य मोलाचे आहे. सभ्यता व संस्कृतीच्या विकासाचा तो अग्र वाहक आहे. यंत्रांनी शक्ती करणाऱ्या सधन भूधारकांचे प्रमाण भारतात अल्प आहे. त्यामुळे आजही ग्रामीण भारतात बैलांचे महत्त्व टिकून आहे. पर्यायाने पोळा सणही त्याच जोमाने खेड्यांमध्ये साजरा होतो आहे. गवताला औषध गुण देणाऱ्‍या भारतीय संस्कृतीने पशूंना, वृक्षांना देवत्व दिले.

कारण, या संस्कृतीचा प्रमुख सूत्रधार शेतकऱ्‍याने पंचमहाभूतांशी जिव्हाळा जोडून त्यांच्या कणाकणात परमेश्वराला पाहिले, अनुभवले, व्यक्त केले. आपल्या प्राचीन परंपरा आणि रूढींमध्ये जीवन व परिसराकडे पाहण्याची सधन, संपन्न दृष्टी विकसित करण्याचे सामर्थ्य आहे. आषाढ ते कार्तिकाचा कालखंड मनाच्या सखोल, उत्तुंग, विराट विकासाचा कालखंड आहे.

म्हणून सणवार उथळपणे साजरे न करता त्यातली मार्मिकता अनुभवावी. या कालखंडात ग्रामीण जीवनाचा साक्षेपी अभ्यास आत्मीयतेने करून ज्ञानाची जोडणी व स्नेहाची पेरणी सहजपणे करता येईल. पारंपरिक सणांना सुंदर जाणिवेने आधुनिक अर्थ देऊन जगणे निश्चित समृद्ध करता येईल, असे गुरुमाउली आण्णासाहेब मोरे म्हणाले.

दहीहंडी असो वा पोळा, गणेशोत्सव असो वा नवरात्रोत्सव... या निमित्ताने खेड्यात जाऊन शेतकऱ्यांना मदत करता येईल. श्रमदानाने विधायक सुधारणा घडविता येतील. ज्या देशात पशु-पक्ष्यांनाही मानवाचे प्रेम, श्रद्धा व मदत मिळते, त्या देशात स्वातंत्र्याला ६० वर्षे झाल्यावरही शेतकरी उपाशी, कंगाल झाल्याने आत्महत्या करतात.

ही गोष्ट शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. माणुसकीचे भागवत सांस्कृतिक धारणा व मूल्यांच्या आधाराने प्रत्येकाच्या हृदयात जागविणे, हे आजचे अध्यात्म आहे. अर्थातच, ‘न जाने किस रूप में नारायण मिल जाए’- हा आपला अध्यात्माचा मूळ मंत्र आहे, असेही गुरुमाउली म्हणाले.

सुरवातीला गुरुमाउलींच्या आगमनानंतर सेवेकऱ्यांनी जयघोष केला. राज्यभरातून आलेल्या काही सेवेकऱ्यांचे गुरुमाउलींच्या हस्ते प्रसाद देऊन स्वागत करण्यात आले. मार्गदर्शनानंतर शंका निरसन करण्यात आले. महाआरती होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या वेळी चंद्रकांतदादा मोरे, नितीनभाऊ मोरे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

Ajit Pawar यांच्यामुळे आमच्या पक्षाला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट

Voter Registration : मतदार नोंदणीसाठी एकाच्याच नावावर भरले तब्बल ४६२ अर्ज, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT