Nashik News : महिला बचत गटांकडून तयार होणारी विविध उत्पादने विक्रीसाठी ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करणे आवश्यक असून, गुणवत्तापूर्ण उत्पादन तयार करून ऑनलाइन विक्री करणाऱ्या संकेतस्थळांवरदेखील ही उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले. (Commissioner Praveen Gedam statement Build confidence among consumers to sell products)
या वेळी विभागीय आयुक्त गेडाम यांनी बचत गटांशी संवाद साधला. विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी बुधवारी (ता. ३) जिल्हा परिषदेला भेट दिली. जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात त्यांनी जिल्हा परिषद व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या वतीने महिला बचत गटांमार्फत सुरू असलेल्या कामांची माहिती जाणून घेतली.
या वेळी सामनगाव येथील चार महिला बचत गटांशी संवाद साधताना त्यांनी विविध वस्तूंच्या विक्रीसाठी बाजारपेठ मिळविण्यासाठी दर्जात्मक वस्तूंची निर्मिती व वितरणव्यवस्था बळकट करणे आवश्यक असून, ग्राहकांच्या मनात वस्तूविषयी खात्री निर्माण करणे गरजेचे आहे. ग्राहकांना खात्री झाली, की व्यवसाय आपोआप वाढतो, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
या वेळी महिलांनी उत्पादित केलेल्या पापड, विविध मसाले, पाणीपुरी, अगरबत्ती या उत्पादनांची त्यांनी माहिती जाणून घेतली. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी देखील या वेळी महिला बचत गटांमार्फत सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या उमेद अभियान नाशिकच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘गोदा व्हेली कार्ट’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून देखील वस्तू विक्री करण्यात येणार असल्याचे सांगितले. (latest marathi news)
न्यू जीवन फाउंडेशनचे प्रतीक कुंडू यांनीही या वेळी महिला बचत गटांच्या समन्वयाने सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय गायकवाड यांनी प्रास्ताविकात जिल्हा परिषद व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या वतीने सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
या वेळी विभागीय उपायुक्त मनोज चौधरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, माविमचे कार्यक्रम अधिकारी युवराज उखाडे, नितीन खोडके, नीलेश थोरात आदी उपस्थित होते.
महिलांकडून विक्रीबाबत घेतली माहिती
विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी सामनगाव येथील चार गटांतील महिलांशी संवाद साधला. या बचत गटांना जिल्हा परिषद व मविमकडून प्रशिक्षण देण्यात आले असून, सदर गटांना सी.एस.आर. कृती संगमामधून मशिनरी देण्यात आली आहे. यामध्ये तुलसी महिला बचत गटास कुरडई, नागली पापड, तांदूळ पापड तयार करणे प्रशिक्षण देण्यात आले.
सदर गटाने फेब्रुवारीमध्ये प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर ५७ हजार रुपयांचे कुरडई, नागली पापड, तांदूळ पापड तयार करून विक्री केले आहेत. एकलव्य महिला बचत गटाच्या महिलांना विविध मसाले तयार करणेचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यांनीही सहा हजार रुपयांचा माल विक्री केला आहे.
गौरी महिला बचत गटाच्या महिलांना पाणीपुरी तयार करणेचे प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यानीही वस्तूनिर्मितीस सुरवात केली आहे. बुद्धकिर्ती महिला बचत गटाच्या महिलांना अगरबत्ती तयार करणे प्रशिक्षण देण्यात आले असून, सध्या २०० किलोच्या कामाची मागणी मिळाली असल्याचे महिलांनी या वेळी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.