Nashik News : आगामी विधानसभा निवडणुकीला केवळ तीन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूंकडून एकत्र लढणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, दुसरीकडे महायुतीतील भाजप असो की महाविकास आघाडीतील काँग्रेस यांनी स्वबळावर तयारी सुरू केल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे. (Assembly Elections 2024)
भाजपच्या समितीकडून विधानसभानिहाय आढावा बैठकांमधून गुप्तपणे सर्व विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. या समितीकडून केवळ भाजप आमदारांच्याच मतदारसंघातून नाही, तर महायुतीतील इतर पक्षांतील आमदारांच्या मतदारसंघांचाही आढावा घेतला जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
भाजपपाठोपाठ काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून राज्यातील सर्वच मतदारसंघांतून पक्षाकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांकडून अर्ज मागवले जात आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात फटका बसला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून योग्य खबरदारी घेत तयारी केली जात आहे. राज्यातील स्थितीपेक्षा वेगळा निकाल जिल्ह्यात लागला आहे.
जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत महायुतीला पराभवाचा सामाना करावा लागला आहे. यातही दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपचा झालेला पराभव पक्षाच्या जिव्हारी लागला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुती पराभूत झाली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपने आतापासूनच सावध पावले टाकण्यास सुरवात केली आहे. (latest marathi news)
निवडणुकीचा भाग म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात भाजपकडून आढावा घेतला जात आहे. या बैठकीतून पक्षाचा आढावा घेतला जात असला, तरी मतदारसंघातील राजकीय समीकरणे, इच्छुक यांचा गुप्तपणे आढावा घेतला जात असल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर आता भर दिला आहे.
काँग्रेसने राज्यात सर्वाधिक १३ जागांवर विजय मिळवला. पक्षाला मिळालेल्या या यशामुळे पक्षनेतृत्वाचा आत्मविश्वास वाढल्याने होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जोरात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने लोकसभा निवडणूक लढवली. आता विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरून ‘मविआ’मध्ये जोरदार रस्सीखेच होण्याचा अंदाज आहे.
जागांवरून मतभेद होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे काँग्रेसने स्वबळाचीही तयारी चालविल्याचे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागविण्यास सुरवात केली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया राबवली जात आहे. प्रदेश काँग्रेस भवनात १० ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज जमा करावे लागणार आहेत.
विधानसभा मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्जासोबत सर्वसाधारण प्रवर्गासाठी २० हजार, तर अनुसूचित जाती-जमाती व महिला इच्छुकांसाठी दहा हजार रुपये पक्षनिधी म्हणून जमा करावे लागणार आहे. जिल्हा काँग्रेस भवनाकडे इच्छुकांना अर्ज दाखल करता येणार आहे. १० ऑगस्टपूर्वी ते अर्ज शुल्कासह प्रदेश कार्यालयाकडे सादर करणे जिल्हाध्यक्षांना बंधनकारक राहणार असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
"प्रदेश भाजपच्या सूचनेनुसार प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने मतदारसंघातील राजकीय समीकरणे जाणून घेतली जात आहेत. इच्छुकांची चाचपणी केली जात आहे. पक्षाने आदेश दिल्यास स्वबळावर लढण्याची तयारी आहे." - सुनील बच्छाव, जिल्हाध्यक्ष, भाजप
"प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार प्रत्येक मतदारसंघातील इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागविले जाणार आहेत. यातून मतदारसंघातील पक्षाची ताकद तसेच इच्छुक उमेदवारांची चाचपणी होईल. त्यासाठी विधानसभानिहाय बैठका घेतल्या जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीमुळे कार्यकर्त्यांची ताकद वाढली असून, पक्षाने आदेश दिल्यास सर्व जागा स्वबळावर लढण्याची तयारी आहे." - शिरीष कोतवाल, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.