Nashik Bribe Crime : अहमदनगर औद्योगिक वसाहतीत लोखंडी पाईपलाईन बदलण्याच्या कामांची सुरक्षा ठेव व अनामत रक्कम ठेकेदाराला परत करण्यासाठी एमआयडीसीच्या सहायक अभियंत्यास तब्बल १ कोटी रुपयांची लाच स्वीकारताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.
तर, धुळे एमआयडीसीचा कार्यकारी अभियंता मात्र फरार झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नगर आणि पुण्यातील संशतियांची घरे सील केली असून, संशयित लाचखोरांकडून मोठे गबाड पथकाच्या हाती लागण्याची शक्यता आहे.
विशेषत: भ्रष्टाचार निर्मूलनासाठी दक्षता सप्ताह सुरू असतानाच मोठी कारवाई झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांनी नाशिक विभागाचे कौतूक केले आहे. (Nashik Crime Nagar MIDC Assistant Engineer Accepts 1 Crore Bribe One arrested Another fugitive)
अमित किशोर गायकवाड (३२, रा. राहुरी, जि. अहमदनगर) असे लाच स्वीकारणार्या नगर एमआयडीसीच्या सहायक अभियंत्याचे नाव आहे. तर ठेकेदाराने केले त्यावेळीचे व सध्या धुळे एमआयडीसीत कार्यकारी अभियंता असलेला गणेश वाघ हा फरार झाला आहे.
गायकवाड याच्या नगरमधील आणि फरार वाघ याच्या पुण्यातील घराची झडती सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
श्री. नांगरे-पाटील हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सुरू असलेल्या दक्षता सप्ताहांतर्गत नाशिक विभागाचा आढावा घेण्यासाठी आले असता, प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी नाशिक परिक्षेत्राच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांसह पोलिस निरीक्षक स्वप्निल राजपूत, अंमलदार प्रभाकर गवळी, संदीप हांडगे, किरण धुळे, सुरेश चव्हाण यांनी बजाविलेल्या या कामगिरीचेही श्री. नांगरे-पाटील यांनी कौतूक केले.
अशी आहे कारवाई
छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय ठेकेदार असलेल्या तक्रारदाराने अहमदनगर एमआयडीसीसाठी मुळा डॅम ते डेहेरे या एक हजार एमएम व्यासाची लोखंडी पाइपलाइन बदलण्याचे कंत्राट घेतले होते.
मंजूर निविदेनुसार ३१ कोटी ५७ लाख ११ हजार ९९५ रुपये रकमेवर ५ टक्क्यांप्रमाणे १ कोटी ५७ लाख ८५ हजार ९९५ रुपये अनामत रक्कम तर सुरक्षा ठेव म्हणून ९४ लाख ७१ हजार ५०० रुपये एमआयडीसीकडे जमा होते.
झालेल्या कामाचे अंतिम देयकानुसार २ कोटी ६६ लाख ९९ हजार २४४ रुपये ठेकेदाराला मिळावे, यासाठी सदरचे बिल मंजूर करण्यासाठी २० ऑक्टोबर रोजी एक कोटी रुपयांची लाच मागण्यात आली.
त्यानुसार गेल्या शुक्रवारी (ता.३) लाचखोर गायकवाड याने वाहनात (एमएच २० सीआर ७७७७) १ कोटी लाचेची रक्कम स्वीकारली. याप्रकरणी नगर एमआयडीसी पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तांत्रिक पुरावे
नगर एमआयडीसीत पूर्वी गणेश वाघ कार्यरत होता. सध्या वाघ धुळे एमआयडीसीत कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहे. सदरील कामाच्या बिलांवर वाघ याच्या सह्या घेऊन सदरची देयके मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात गायकवाड याने बक्षिसी म्हणून १ कोटींच्या लाचेची मागणी केली होती.
संगनमताने लाच घेण्यासाठी वाघ याने गायकवाड यास प्रोत्साहन केल्याचे तांत्रिक पुरावे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागले आहेत. मात्र कारवाईची कुणकुण लागताच वाघ धुळ्यातून पसार झाला आहे. पथकाने वाघच्या पुण्यातील व गायकवाडच्या नगरमधील घरे सील केले आहेत.
"राज्यात सर्वाधिक १४० सापळे व १९० लाचखोरांना अटक करून राज्यात अव्वल क्रमांकावर नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आहे. भ्रष्टाचारमुक्त समाज करणे हेच विभागाचे एकमेव उद्दीष्ठ आहे. त्यादृष्टीने नाशिकचे पथक उत्तम कामगिरी करते आहे."
- विश्वास नांगरे-पाटील, अपर पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.