Nashik Crime : नाशिक रोड पोलिस ठाणे हद्दीमधील शिंदे एमआयडीसी भागात ‘एमडी’ या अमली पदार्थाचा अवैध कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला.
दोन दिवसांपूर्वी पुणे पोलिसांना चकवा देऊन ससून रुग्णालयातून फरारी ड्रग्जमाफिया नाशिक शहरातील उपनगरचा रहिवासी असणारा ललित पाटील याच्या भावाच्या कंपनीवर मुंबई साकीनाका पोलिसांनी शुक्रवारी (ता. ६) कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे नाशिक रोड पोलिसांच्या नाकावर टिचून मुंबईतील साकीनाका पोलिसांनी ही कारवाई केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. (Nashik Crime: pune Sassoon's drag racketeer Lalit Patil brother arrested by police in Nashik; Drugs worth 300 crore seized cdj98)
तीन दिवसांपासून मुंबई येथील साकीनाका पोलिस नाशिक शहरात तळ ठोकून होते. नाशिक तालुक्यातील शिंदे गावातील एमआयडीसी परिसरातील श्री गणेशाय इंडस्ट्री (प्लॉट नंबर ३५, शिंदे एमआयडीसी) या कंपनीत ‘एमडी’ हे ड्रग्ज निर्मिती करत असल्याची माहिती एका गुन्ह्यातील आरोपीच्या चौकशीतून मुंबई साकीनाका पोलिसांनी कळाली होती.
तीन दिवस या कंपनीचे बाहेरून निरीक्षण करत ही कारवाई करण्यात आली. गुरुवारी (ता.५) सायंकाळी या कंपनीत छापा टाकत १३३ किलो ‘एमडी’ हा नशीला पदार्थ जप्त करण्यात आला. या पदार्थाची किंमत तीनशे कोटीहून अधिक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या कारवाईत ड्रग् माफिया ललित पाटील याचा भाऊ भूषण आणि जीशान इक्बाल शेख याला साकीनाका पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
ही कंपनी यादव नावाच्या व्यक्तीकडून ललित पाटील याने भाडेतत्त्वावर घेतली होती. मेफेड्रोन अर्थात, एमडी हा घातक पदार्थ समजला जातो. यामुळे सध्याची युवा पिढी वाईट मार्गाला लागत आहे. या नशेमुळे अनेकांमध्ये आजार जडले असून, मृत्यूही ओढवले आहेत. शहरात अनेक ठिकाणी एमडी विकले जात असल्याची चर्चा होती.
नाशिक रोड पोलिस अनभिज्ञ
शिंदे एमआयडीसी परिसरात साकीनाका पोलिसांनी कारवाई केल्यामुळे नाशिक रोड पोलिसांचे धाबे दणाणले आहेत. इतका मोठा ड्रग व्यापार व निर्मिती सुरू असताना नाशिक रोड पोलिसांना कशी माहीत नाही, असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत. दरम्यान, फूड ॲन्ड ड्रग्स विभाग आणि शासनाचे कंपन्यांवर नियंत्रण ठेवणारे वेगवेगळे शासकीय विभाग यांच्याकडे संशयाची सुई जात आहे.
कोण आहे ललित पाटील
चार वर्षांपूर्वी एमडी ड्रग्स प्रकरणात पकडलेला ललित पाटील पुण्याच्या येरवडा कारागृहात होता. तीन दिवसांपूर्वी तो पुणे पोलिसांना चकवा देऊन फरारी झाला. नऊ महिन्यांपासून तो उपचाराच्या नावाखाली पुणे येथील ससून रुग्णालयात मुक्काम ठोकत असे. तेथून ड्रग्ज रॅकेट चालवत असे.
ड्रग विक्री करताना त्याच्या साथीदारांना पकडल्यानंतर ललित पाटीलचे कनेक्शन स्पष्ट झाले. पुणे पोलिस त्याचा ताबा घेण्याच्या आतच त्याने ससून रुग्णालयातून धूम ठोकली. ललित पाटील ड्रग्ज माफिया म्हणून ओळखला जातो. नाशिक शहरात उपनगर येथील शांती पार्क जवळ त्याचे घर आहे. शिवसेना (उबाठा) पक्षात तो काम करत होता.
त्याने काही वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत पक्षात प्रवेश केला होता. सामाजिक कार्यक्रमांमध्ये व राजकीय नेत्यांमध्ये त्याची ऊठबस होती. समाजमाध्यमांवर अनेकवेळा तो राजकीय नेत्यांबरोबर फोटो शेअर करत असे. दरम्यान, पोलिसांनी त्याचा पासपोर्ट घरातून ताब्यात घेतला असून, कुटुंबीयांचीही सखोल चौकशी सुरू असल्याचे समजते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.