Nashik Crime News : बेकायदेशीररित्या व्याजाचा व्यवसाय करून सावकारी करणाऱ्या दोघा सावकारांच्या घरावर म्हसरुळ पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली. पोलिसांनी संशयित सावकारांच्या घरझडतीमध्ये करारनामे, स्टॅम्प पेपर, धनादेशांसह ५ टक्के व्याजाने दिलेल्या रकमांच्या नोंदी असलेल्या डायऱ्या असा महत्त्वाचा दस्तऐवज जप्त केला आहे.
संशयित सावकारांनी शेकडोंजणांची कोट्यवधींची मालमत्ता हडप करून फसवणूक केल्याचा प्रकार यामुळे उघडकीस आला आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Crime Raid on house of two moneylenders in Makhmalabad news)
प्रवीण ज्ञानेश्वर काकड (३८, रा. मानकर मळा, मखमलाबाद), पोपट वसंत काकड (४१,रा. दोंदे रो हाऊससमोर, शांतीनगर, मखमलाबाद) अशी संशयित सावकारांची नावे आहेत. रामदास मोगल (रा. कोठुरे, ता. निफाड) यांनी निफाडच्या सहायक सहकारी निबंधकांकडे अवैध सावकारीविरोधात अर्ज केला होता.
या अर्जानुसार, अवैध सावकारी करणाऱ्या संशयितांकडून मोगल यांनी ५ टक्के दराने पैसे घेतले असता, त्यावर संशयितांनी अव्वाच्या सव्वा दर आकारत वसुली केली जात होती. मोगल यांच्यासह आणखी पाच ते सहा जणांचे अर्ज सहायक निबंधक कार्यालयाकडे करण्यात आले होते.
या तक्रारीनुसार, येवला सहायक सहकारी निबंधक कार्यालयाचे लेखा परीक्षक रवींद्र बाबजी गुंजाळ (रा. ओमकार नगर, पेठरोड) यांनी म्हसरुळ पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांच्या मदतीने सोमवारी (ता. १) रात्री अवैध सावकारी करणारे प्रवीण काकड व पोपट काकड यांच्या घरांवर पोलिसांनी छापा टाकला.
यावेळी सहायक निबंधक कार्यालयाच्या अधिकार्यांच्या उपस्थितीमध्ये म्हसरुळ पोलिसांनी दोघा सावकारांच्या घरात झडतीसत्र राबविले. या झडतीसत्रामध्ये अवैध सावकारी सुरू असलेल्या संदर्भातील महत्त्वाचे दस्तऐवज पोलिसांच्या हाती लागले आहेत.
त्यावरून संशयित दोघा सावकारांनी अनेकांची मालमत्ता कवडीमोल दराने हडप केली आहे. तसेच, कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी गुंजाळ यांच्या फिर्यादीनुसार दोघा सावकारांविरोधात विनापरवाना सावकारी व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक हाके हे करीत आहेत.
जप्त दस्तऐवज
- ४६ करारनामे
- ४४ कोरे स्टॅम्प पेपर
- नावे असलेले ५ स्टॅम्प पेपर
- १०७ धनादेश
- व्याज, कर्जाच्या नोंदी असलेल्या ३ डायऱ्या
कोट्यवधींची फसवणूक
संशयित दोघा सावकारांनी १२५ ते १५० व्यक्तींना दरमहा ५ टक्के व्याजदराने कर्ज दिलेले आहे. त्याच्या नोंदी पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. त्या नोंदीवरून कोट्यवधींची फसवणूक सावकारांनी केली असून, वसुल केलेल्या रकमेचे संशयितांनी केले काय, याचा शोध पोलिस घेत आहेत.
राजरोसपणे सावकारी सुरू
शहरात बेकायदेशीरित्या अव्वाच्या सव्वा दराने व्याजाने पैसे देत सावकारीचा व्यवसाय सुरू असल्याची नेहमीच चर्चा असते. दोन वर्षांपूर्वी अवैध सावकारीतून सातपूरमधील बापलेकांनी तर इंदिरानगरमध्ये तरुण दाम्पत्याने आत्महत्त्या केल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
मात्र यानंतरही उपनिबंधक विभाग व पोलिसांकडून धडक अशी कारवाई झाली नाही. परिणामी शहरात अद्यापही राजरोसपणे अवैधरित्या सावकारीचा धंदा जोरात सुरू आहे. यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्यांची मात्र नाहक लुट अवैध सावकारांकडून होते आहे.
"सहायक सहकारी निबंधक कार्यालयाकडे संशयित दोघा सावकारांविरोधात तक्रार अर्ज आले होते. त्यानुसार, पोलिसांच्या मदतीने गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे."
- रवींद्र गुंजाळ, लेखा परिक्षक, सहकारी सहायक निबंधक कार्यालय, येवला.
"अवैध सावकारीच्या माध्यमातून संशयितांनी दीडशे जणांची फसवणूक केली आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून सखोल तपास करून कारवाई केली जाईल."
- सुभाष ढवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, म्हसरुळ पोलीस ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.