Dindori Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झाली असून, महायुतीची उमेदवारी अद्यापही निश्चित झालेली नाही. दुसरीकडे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, माकप, वंचित बहुजन आघाडीसह अपक्ष उमेदवारांच्या उड्या पडत आहेत.
माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण बंडखोरी करण्याच्या तयारीत असून माकपही उमेदवारीवर ठाम आहे. ‘वंचित’नेही उमेदवारीत बदल करीत, मालती शंकर थविल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मतदारसंघात पंचरंगी लढत होण्याची शक्यता आहे. (nashik Dindori Lok Sabha Constituency five way contest news)
दिंडोरी मतदारसंघात महायुतीने केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना पुन्हा उमेदवारी देत रिंगणात उतरविले आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भास्कर भगरे यांना उमेदवारी दिली आहे.
भाजपने डॉ. पवार यांनी उमेदवारी दिल्याने माजी खासदार चव्हाण नाराज झाले असून डॉ. पवार यांच्यावर मतदारसंघात नाराजी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. त्यासाठी त्यांच्या गाठीभेटी देखील सुरू आहेत.
महाविकास आघाडीने उमेदवारी जाहीर केल्यानंतर माकपने या मतदारसंघावर दावा केला आहे. आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ घटक पक्ष म्हणून माकपला सोडावा अशी मागणी त्यांनी केली. ही जागा आम्हाला सोडली नाही तर शरद पवार गटाचे उमेदवार भगरे यांना पाडण्याचा थेट इशारा त्यांनी दिला आहे. (Nashik Political News)
यामुळे दिंडोरी सध्या राज्यभर गाजत आहे. दिंडोरीचे राजकारण तापलेले असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिंडोरीचा उमेदवार बदलला आहे. ‘वंचित’ने पाचव्या यादीत दिंडोरीसाठी गुलाब मोहन बर्डे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र त्यांच्याकडून आरोग्याच्या कारणास्तव माघार घेतल्यानंतर नवा उमेदवार देण्यात आला आहे.‘वंचित’कडून मालती शंकर थविल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दिंडोरीचा उमेदवार नेमका का बदलला याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. यामुळे दिंडोरीत आता भाजपकडून डॉ. भारती पवार, शरद पवार गटाकडून भास्कर भगरे, वंचित आघाडीकडून मालती थविल यांच्यातील तिरंगी लढत निश्चित झाली आहे. यात माकपकडून जे. पी. गावित, अपक्ष हरिश्चंद्र चव्हाण यांनीही उमदेवारी केल्यास पंचरंगी लढत होऊ शकते. त्यामुळे या मतदारसंघातून नक्की कोण बाजी मारणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.