Heat Waves : मार्च महिन्यातच जिल्ह्यात तापमान ३३ ते ३५ अंशांवर पोचल्याने उष्णतेची लाट जाणवू लागली आहे. यातच यंदा दुष्काळाचे सावट असल्याने प्रामुख्याने मालेगाव, येवला व नांदगाव या तालुक्यांमध्ये उष्मघाताची लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उन्हाचा पार वाढत असल्याने उष्माघात होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग सरसावला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यातील ११२ आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष कार्यान्वित केले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी दिली आहे. (nashik Chance of heat wave in Yeola Malegaon and Nandgaon marathi news)
जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळाचे संकट गंभीर आहे. यातच, मार्च महिन्याच्या मध्यावर्तीपासूनच उष्णतेची लाट वाढत आहे. आताच जिल्ह्याचा पारा हा ३५ अंशांपर्यंत पोचला आहे. एप्रिल व मे महिन्यात उन्हाचा तडाखा आणखी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दुष्काळी परिस्थिती असल्याने उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट झाला असून, विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे. याकरिता फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचे उष्माघात प्रतिबंधात्मक उपायांवर प्रशिक्षण घेण्यात आलेले आहे. त्यानुसार आरोग्य विभागाने जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष कार्यान्वित केला आहे.
यात एक खाट आरक्षित केली आहे. उष्माघाताची लक्षणे जाणवू लागल्यास तातडीने रुग्णाच्या शरीराचे तापमान खाली आणण्यासाठी उपाययोजना असावी, याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात सज्जता ठेवण्यात आली आहे. (latest marathi news)
ही आहेत उष्माघाताची कारणे
उन्हामध्ये शारीरिक श्रमाचे, मजुरीचे कामे फार वेळ करणे, कारखान्याचे वॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यातील काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे, उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येणे.
ही आहेत उष्माघाताची लक्षणे
शरीरास घाम सुटणे, तहान लागणे, शरीर शुष्क होणे, थकवा येणे, ताप येणे (१०२ पेक्षा जास्त), त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैन, अस्वस्थ, बेशुद्ध अवस्था इत्यादी, उलटी होणे आदी.
हे आहेत उपचार
रुग्णास हवेशीर खोलीत ठेवणे, खोलीत पंखे वा कुलर ठेवावेत. शक्यतो वातानुकूलित खोलीत ठेवावे, रुग्णाच्या शरीराचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, रोग्याला बर्फाच्या पाण्याने अंघोळ घालावी, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्या, आइसपॅक लावावेत, ओआरएस सोल्यूशन द्यावे.
असे आहेत प्रतिबंधात्मक उपाय
वाढत्या तापमानाच्या वेळेत कष्टाची कामे टाळणे, कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा सायंकाळी कमी तापमान असताना करावी, उष्णता शोषून घेणारे कपडे उदा. काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नयेत, सैल व उष्णता परावर्तित करणारे पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत, जलसंजीवनीचा वापर करावा, पाणी भरपूर प्यावे, सरबत प्यावे, उन्हामध्ये काम करणे टाळावे व सावलीत विश्रांती घ्यावी.
शक्यतो उन्हात फिरण्याचे टाळावे, आवश्यक कामे असल्यास उन्हात जाण्यापूर्वी भरपूर पाणी प्यावे, उन्हात जाण्याअगोदर जेवण करावे, रिकाम्या पोटी उन्हात जाऊ नये, कान व डोक्याचा उन्हापासून बचाव करणे आवश्यक आहे. डोक्याभोवती पांढरा रुमाल गुंडाळावा. गॉगल्स व हेल्मेट वापरावे, वृद्धांना व बालकांना उन्हात फिरू देऊ नये आदी.
''उन्हाळ्यामुळे उष्माघाताने रुग्णावर उपाययोजना करणेसाठी व मृत्यू टाळण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांनी आवश्यक ती सर्व तयारी केली आहे. नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांवर भर द्यावा, तसेच नागरिकांना उपचारासाठी सुविधा व्हावी यासाठी आरोग्य विभागाने ११२ आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष कार्यान्वित केले आहेत. येथे सर्व उपचार, औषधसाठा यांची सुविधा आहे.''- डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.