Nashik News : शहरानजीक असलेल्या पिंपळगाव खांब (ता. नाशिक) या छोट्या गावातील शेतकरीपुत्राने थेट एव्हिएशन विषयात पीएच.डी. प्राप्त करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. महापालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या आणि घरात कुणीही उच्चशिक्षित नसताना राहुल बोराडे या युवकाने थेट एव्हिएशन क्षेत्रात आपला नावलौकिक प्राप्त केला आहे. त्यामुळेच अनेक नामांकित विमान कंपन्यांनी या युवकासोबत व्यावसायिक करारही केले आहेत. (nashik farmer son marathi news)
राहुल बोराडे यांचा जन्म पिंपळगाव खांब येथील शेतकरी कुटुंबात झाला. शेतकरी कुटुंबातील या युवकाने मनपाच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले. या कुटुंबात उच्च शिक्षणापर्यंत कुणीही पोचलेले नव्हते. त्यामुळे राहुल यांना शिक्षणासाठी कुटुंबाने प्रोत्साहन दिले. (कै.) मीराबाई बोराडे यांचे स्वप्न होते, की आपल्या मुलाने फार मोठे व्हावे, यश मिळवावे.
आईचे हे स्वप्न अखेर राहुल यांनी सत्यात उतरविले आहे. त्यामुळेच केवळ पंचक्रोशीत नाही तर नाशिक जिल्ह्यातच राहुल यांच्या यशाची चर्चा होत आहे. राहुल यांनी इलेक्ट्रॉनिक अॅन्ड टेलिकम्युनिकेशन या विषयात डिप्लोमा केला. त्यानंतर त्यांनी एअरक्राफ्ट इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली.
नाशिकसह महाराष्ट्रातील विविध विमानतळांवर ते ग्राउंड हॅन्डलिंग व ऑपरेशनचे कार्य करीत आहेत. प्रवासी वाहतूक आणि कार्गो यात त्यांची सेवा दर्जेदार आहे. त्याचबरोबर खासगी विमाने, चार्टर्ड फ्लाइट्स, एअर ॲम्ब्युलन्स, हेलिकॉप्टर्स यांच्यासाठी आवश्यक ती सेवा विमानतळावर ते देतात. त्यामुळे व्हीव्हीआयपींपासून ते सर्वसामान्यांपर्यंत त्यांचा नावलौकिक आहे.
त्यांच्या उत्कृष्ट कार्य आणि सेवेची दखल घेत अनेक नामांकित विमान कंपन्यांनी त्यांच्याशी व्यावसायिक करार केला आहे. एव्हिएशन क्षेत्रातील आवड आणि अनुभव यामुळे राहुल यांनी संदीप विद्यापीठातून पीएच.डी. संपादन केली आहे. ‘अ स्टडी ऑफ डेव्हलपमेंट ऑन सस्टेनेबल एव्हिएशन मार्केटिंग स्ट्रॅटेजिक विथ चेंजिंग ग्लोबल एव्हिएशन मार्केटिंग सिनॅरिओ’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता.
उपकुलगुरू डॉ. राजेंद्र सिन्हा यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. यशानिमित गावातून त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. आईची प्रेरणा सतत माझ्यासोबत राहिली आहे. माझे यश बघण्यासाठी आई आज असती तर तिने तोंडभरून कौतुक केलं असतं, हे सांगताना राहुल बोराडे काहीसे भावुक होतात.
यशाची चढती कमान
विमानतळावर ग्राउंड हॅन्डलिंग व ऑपरेशनचे कार्य करतानाच राहुल यांनी ड्रोन कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासोबत करार केला आहे. त्याद्वारे लवकरच ड्रोन कोर्सेस सुरू होणार आहेत.
तसेच त्यांची एव्हिएशन कंपनी ही अनेक लहान-मोठ्या प्रवासी, कार्गो, खासगी विमाने आणि हेलिकॉप्टर्स, एअर अम्ब्युलन्सच्या हॅन्डलिंग व ऑपरेशन्सचे कार्य करते. त्यामुळे त्यांच्या कार्याची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. पंजाब सरकारचे एव्हिएशन सल्लागार अभय चंद्रा यांच्यासह अनेकांनी विशेष पत्र देऊन राहुल यांचा सन्मान केला आहे. (latest marathi news)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.