Nashik News : निफाड पंचायत समितीत निवृत्त झालेल्या १२ शिक्षकांच्या देय वेतनाची रक्कम परस्पर हडप केल्याप्रकरणी निफाड पंचायत समितीचा वरिष्ठ सहाय्यक गणेश थोरात याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. त्याने तब्बल २९ लाख १७ हजार रुपयांची रक्कम जवळच्या नातेवाइकांच्या बँक खात्यात वर्ग केली होती. (Ganesh Thorat senior assistant of Niphad Panchayat Samiti was sacked)
पंचायत समितीकडून प्राप्त झालेला चौकशी अहवाल तसेच जिल्हा परिषद प्रशासनाने केलेल्या चौकशीत ही अनियमितता उघड झाली आहे. थोरात याच्यावर देयकात आर्थिक नियमितता करणे, देयक गहाळ करणे, अनधिकृतपणे गैरहजर राहणे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करणे हा ठपका ठेवत कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी थोरात याच्या बडतर्फीचे आदेश निर्गमित केले आहेत. निफाड पंचायत समितीत वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेला गणेश थोरात व कनिष्ठ लिपिक किरण सपकाळे यांनी २०२१ मध्ये निवृत्त झालेल्या महेंद्र बाबूराव चव्हाण यांच्यासह ११ शिक्षकांना निवृत्तीनंतरच्या रकमांच्या धनादेशाची रक्कम त्रयस्थ व्यक्तींच्या खात्यात वर्ग केली होती.
माजी मुख्याध्यापक लक्ष्मण जोंधळे यांनी निवृत्तीच्या देयकांचा लाभ मिळालेला नसल्याची तक्रार केली. त्यानंतर अर्थ विभागाने चौकशी केली असता १२ निवृत्तिवेतनधारकांचा देय धनादेश घेत वटविला गेला; परंतु शिक्षकांच्या खात्यात देय जमा झालेली नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी व अर्थ विभागाकडून चौकशी झाली. (latest marathi news)
यात, अधिकृत यादीत फेरफार करून गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या शिक्क्यावर स्वतःच स्वाक्षरी करून त्रयस्थ लोकांच्या खात्यावर रक्कम वर्ग केली असल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकारानंतर, थोरात याला कारणे दाखवा नोटीस देत रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात त्याने ही रक्कम जमा केली नव्हती. त्यामुळे गटशिक्षणाधिकाऱ्यांनी, थोरात याने कर्तव्यात कसूर केली असल्याचा अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाला जून २०२३ मध्ये सादर केला.
या अहवालानंतर सामान्य प्रशासन विभागाने गटविकास अधिकारी यांच्यामार्फत पुन्हा सखोल चौकशी केली. या चौकशीत सर्व तक्रारींच्या अनुषगांने थोरात याची चौकशी झाली. यात, सतत अनधिकृतपणे गैरहजर राहत असून, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करीत नाही, नोटिसींना उत्तर देत नाही.
वरिष्ठांचे आदेश होऊनही कार्यभार देत नाही, कामात उदासीनपणा व निष्काळजीपणा, काम करताना सतत निवृत्तिवेतनाच्या देयकात आर्थिक अनियमितता करणे, देयके गहाळ करीत असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे प्रशासनाने थोरात याला सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश काढले आहेत. या कारवाईने कर्मचारी वर्गात खळबळ उडाली आहे.
फौजदारी गुन्हाही दाखल
निफाड पंचयत समितीत कार्यरत असताना १२ शिक्षकांच्या निवृत्तिवेतनाच्या २९ लाख १७ हजार ८४७ रकमेचा अपहार केला म्हणून गणेश थोरात याच्यावर निफाड पोलिस ठाण्यात फसवणुकीसह अनेक कलमांखाली फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे थोरात याच्यावर कारवाई करण्यात हा गुन्हाही ग्राह्य धरण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.