Goda Mahaarti : हरिद्वार, वाराणसीच्या धर्तीवर गोदामातेची सायंमहाआरती तीन दिवसांपासून सुरू झाली खरी. परंतु एकाच्या जागी व एकावेळी दोन महाआरत्या त्याही एकाच वेळी व ठिकाणी सुरू झाल्याने त्रस्त झालेल्या गोदामातेने ‘मीच विनविते हात जोडूनी, दोन आरत्या मज करू नका’ अशी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्तीतील आर्त साद घातली आहे. (nashik Goda Maha Aarti marathi news)
दोन आरत्यांवरून धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनीही नाराजी व्यक्त केली आहे. गोदा जन्मोत्सवाच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजे सोमवार (ता. १९) पासून गंगा गोदावरी पुरोहित संघ व गोदावरी सेवा समिती अशा दोन व्यवस्थांकडून गोदावरीच्या महाआरत्या सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही आरत्या शेजारी शेजारी म्हणजे रामतीर्थ व त्याखालील दुतोंड्या मारुती कुंडालगत सुरू झाल्या आहेत.
त्यांची वेळही सायंकाळी सात अशी एकच असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. खरेतर ही श्रेयवादाची लढाई असलीतरी याप्रकरणी दोन्हीही बाजूला मान्य होईल, असा सन्मान्य तोडगा काढणे आवश्यक असल्याचे मत जाणकार नाशिककरांनी व्यक्त केले आहे. कारण हा राजकारणाचा नव्हे तर नाशिकच्या व गोदामाईच्या अस्मितेचा विषय आहे.
यातील दोन्हीही बाजूला आपलेच लोक असल्याने विद्यमान लोकप्रतिनिधीही यापासून दूर राहणेच पसंत केले आहे. मात्र नाशिक पूर्वचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी या वादात उघडपणे गंगा गोदावरी पुरोहित संघाबरोबर राहणे पसंत केले, त्यालाही अनेक कंगोरे आहेत. तूर्त यातून सन्मान्य मार्ग काढून दोन्ही गटांना एकत्र करणे व एकच महाआरती करून वादग्रस्त बनलेली गोदाआरती एकत्रितपणे सुरू करावी, असा सूर आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी आळवला आहे.
''दोन्ही बाजूंकडून योग्य समन्वय साधून गोदामातेची व पर्यायाने शहराची सुरू असलेली अवहेलना थांबवावी, हेच शहराच्या व सर्वांच्या हिताचे आहे.''- वेदाचार्य रवींद्र पैठणे गुरुजी
''गंगा गोदावरी पवित्र अन निर्मल आहेच. परंतु तिच्या काठी राहूनही आमची मने अद्यापही शुद्ध झालेली नाहीत, हेच दोन आरत्यांच्या आयोजनातून दिसून येते.''- विद्यावाचस्पती लक्ष्मीकांत जोशी
''देशात एकीकडे सर्वत्र एकविचारांनी कामे सुरू असताना आरतीच्या निमित्ताने समाजात फूट नको. गोदामातेची प्रतिष्ठा जपत सर्वांनी एकत्र येऊन महाआरती करत आदर्श पायंडा पाडावा.''- जगदगुरू महामंडलेश्वर डॉ. रामकृष्ण महाराज लहवीतकर (latest marathi news)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.