मालेगाव/टेहेरे : सप्तशृंगगडावरून शिरपूरकडे जाणाऱ्या बसने महामार्गावरील मुंगसेजवळ दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात सीताराम उत्तम सूर्यवंशी (वय ६५) व त्यांची नात वैष्णवी विजय सूर्यवंशी (वय ११) यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरी नात मंजूषा विजय सूर्यवंशी (वय १३) गंभीर जखमी झाली आहे.
आजोबांसह नातीचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी दोन ते अडीच तास रास्ता रोको आंदोलन केले. गावानजीक असलेल्या गतिरोधकाची उंची वाढवावी, तसेच या ठिकाणी उड्डाणपूल करावा, अशी ग्रामस्थांची मागणी होती. (Nashik Grandfather with grandchild killed in accident near Mungse village marathi news)
सूर्यवंशी कुटुंबीय गावानजीक असलेल्या पंढळवाडी येथे राहतात. येथील केबीएच विद्यालयात वैष्णवी सहावीत, तर मंजूषा सातवीत शिक्षण घेते. आज त्यांचा शेवटचा पेपर होता. त्यांना शाळेत सोडण्यासाठी आजोबा सीताराम सूर्यवंशी दुचाकीने मालेगावकडे येत होते. सौंदाणेकडून भरधाव आलेल्या शिरपूर आगाराच्या बसने (एमएच २०, बीएल १५९४) दुचाकीला (एमएच ४१, एडी १२५४) धडक दिली.
अपघात इतका भीषण होता, की दुचाकी शंभर फुटापर्यंत फरफटत गेली. अपघातात सीताराम सूर्यवंशी व वैष्णवी जागीच ठार झाले. दुचाकीचा चेंदामेंदा झाला आहे. जखमी वैष्णवीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.
घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, प्रांताधिकारी नितीन सदगीर, सोमा टोल कंपनीचे प्रकल्प संचालक साळुंखे आदी दाखल झाले. त्यांनी सरपंच रंजना पिंपळसे, उपसरपंच जगदीश सूर्यवंशी, माजी सरपंच रवींद्र सूर्यवंशी, श्रावण सूर्यवंशी आदींसह आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली.
चार दिवसांच्या आत आवश्यक त्या उंचीचे गतिरोधक बनविले जातील, दिशादर्शक फलक लावले जातील, गावाजवळ हायमास्ट उभारला जाईल, तसेच, भुयारी मार्ग व उड्डाणपुलाबाबत आचारसंहिताच संपताच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (latest marathi news)
मागण्यांकडे दुर्लक्षामुळे दुर्घटना
यापूर्वी चारवेळा गावानजीक अपघात घडले. ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनात फक्त आश्वासने देण्यात आली. गतिरोधकाची उंची वाढवली असती तर अपघात झाला नसता. गावानजीक भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल व्हावा, गावाजवळ हायमास्ट लावावा, शासनाकडून सर्व्हिस रोड मंजूर असूनदेखील काम सुरू झालेले नाही आदी मागण्या या भागातील नागरिकांच्या पाच वर्षांपासून आहेत.
या मागणीकडे प्रशासन व सोमा टोल कंपनीचे व्यवस्थापन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. पोलिस प्रशासन व सोमा कंपनीचे अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवा. आमच्या मागण्यांबाबत ठोस निर्णय घ्या. त्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली.
"मुंगसे गावानजीक गतिरोधक, हायमास्ट, दिशादर्शक फलक, भुयारी मार्ग, महामार्गालगत सर्व्हिस रोड व्हावा, यासाठी ग्रामस्थ सातत्याने मागणी करीत आहेत. यापूर्वी चारवेळा अपघात झाले. प्रत्येकवेळी आंदोलन केल्यानंतर केवळ आश्वासने देण्यात आली. एकीकडे ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला जातो, तर दुसरीकडे मागण्यांकडे दुर्लक्ष करून ‘शासन आम्हाला मारी’, अशी अवस्था ग्रामस्थांची झाली आहे. दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी झाली नाही तर ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडतील."
- गंगासाहेब सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते, मुंगसे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.