मालेगाव : गरजूंना हक्काचे घर मिळावे यासाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवीत आहे. प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास, रमाई आवास व मोदी आवास योजना आदी घरकुल योजनांच्या माध्यमातून तालुक्यातील लाभार्थींना घरकुले मंजूर झाली आहेत. लाभार्थींनी दर्जेदार व सोयी सुविधायुक्त घरे बांधावीत असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी येथे केले. (Nashik malegaon gharkul scheme distribution marathi news)
येथील कृष्णा लॉन्समध्ये शबरी आवास, रमाई आवास, मोदी आवास योजनेचे घरकुल मंजुरी आदेश वाटप व जनसुविधा योजनेंतर्गत मंजूर कामांचे ग्रामपंचायतींना आदेश वाटप करण्यात आले, त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. गटविकास अधिकारी अजितसिंग पवार, कृषी अधिकारी किरणकुमार शिंदे यांच्यासह विविध गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पदाधिकारी, लाभार्थी उपस्थित होते.
श्री. भुसे म्हणाले, मालेगाव तालुक्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासनाच्या विविध आवास योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना २०२३-२०२४ या वर्षात एकूण १ हजार ८७० घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. जनसुविधा योजनेंतर्गत ग्रामपंचायत इमारत बांधकाम, स्मशानभूमी कुंपण भिंत आदी कामे करण्यात येतात.
या वर्षात ३८ ग्रामपंचायतीसाठी ३ कोटी ९२ लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आले आहेत. मंजूर कामे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण होण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. रावळगाव-अजंग परिसरात एमआयडीसी, महिला रुग्णालये आदी विविध विकासकामे प्रगतिपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. (Latest Marathi News)
नागरिकांनी पाण्याचा वापर जपून व काटकसरीने करावा. कोणत्याही गावाला पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ नये यासाठी शासनस्तरावर नियोजन करण्यात आले आहे. पिण्याचे पाणी, गुरांसाठी पाणी, चारा आदींसाठी प्रशासनातर्फे तयारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात शबरी योजनेंतर्गत सुशीलाबाई आहिरे (निळगव्हाण), रमाई योजनेंतर्गत राकेश देवरे (झोडगे), मोदी आवास योजनेंतर्गत जावेद शब्बीर मन्सूरी (करंजव्हाण) यांना आदेशाचे वाटप करण्यात आले.
जनसुविधा योजनेतून ग्रामपंचायत आधार खुर्द- स्मशानभूमीस कुंपण करणे, नाळे ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधणे, टेहरे व वजीरखेडे येथील आदिवासी स्मशानभूमीस कुंपण करणे, अजंग येथील स्मशानभूमी जोडरस्ता करणे, चंदनपुरी येथे मांग गारुडी समाज स्मशानभूमी येथे पत्रा शेड व बैठक व्यवस्था करणे या मंजूर कामांसाठी आदेश वाटप करण्यात आले. प्रारंभी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.