अरुणकुमार भामरे : सकाळ वृत्तसेवा
अंतापुर: मुल्हेर (ता. बागलाण) किल्ल्यावरील पाण्याच्या टाक्या, तलाव, किल्ला व परिसरातील बारवमध्ये पानवेली व गाळ साचल्याने ऐतिहासिक ठेवा धोक्यात आला आहे. संबंधित विभागाने विहिरीतील गाळ काढून स्वच्छता करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे. (Nashik Historical heritage at Mulher Fort in danger)
छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक गड-किल्ल्यांची निर्मिती करून किल्ल्यावर राहणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी पाण्याच्या टाक्या, तलाव, बारवांची निर्मिती केली. दुष्काळी परिस्थितीत त्यामुळे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होत होती. परंतु, साल्हेर, मुल्हेर, पिसोळ, न्हावी, तिळवण आदी किल्ल्यांवरील पाण्याचे टाके, विहिरी, तलावांची पडझड झाली असून, आजतागायत दुरुस्ती करण्यात आली नसल्याने हा ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
यावर्षी बागलाण तालुक्यात दमदार पाऊस नसल्याने दुष्काळी परिस्थिती आहे. मुल्हेर किल्ल्यावर भगवान सोमेश्वर व धार्मिक मंदिरे, महंत सुदामादास महाराज यांचा आश्रम आहे. त्यामुळे भाविक, पर्यटकांची वर्दळ असते. येथील पाण्याच्या टाक्यांमध्ये पानवेली, गाळ, झाडांच्या फांद्या साचल्या असून, तीच परिस्थिती बारव, तलावांची झाली आहे.
संबंधित विभागाने स्वच्छता, दुरुस्ती केल्यास पशु-पक्षी, वन्यप्राणी व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होण्यास मदत होणार आहे. संबंधित लोकप्रतिनिधी, पुरातत्त्व विभागाने कार्यवाही करावी, अशी मागणी मुल्हेर येथील माजी सरपंच पंडितराव जगताप, सरपंच निंबा भानसे, उपसरपंच योगेश सोनवणे यांच्यासह नागरिकांनी केली आहे. (latest marathi news)
संवर्धनाची गरज
मुल्हेर किल्ल्यावर बागुल राजांची राजधानी होती. मुल्हेर, मोरागड, हरगड मिळून या त्रीगिरीवर एकूण ९६ पाण्याचे टाके आहेत. किल्ल्याच्या पहिल्या माचीवर एकूण सहा पाण्याचे टाके आहेत. मुल्हेर किल्ल्यावर चार, हरगडवर दोन, मोरागडावर दोन असे एकूण ८ पावसाळी तलाव आहेत.
प्रत्येक पावसाळी तलावात सूर्यघटिका असून, ती दुष्काळावेळी वापरत असत. गडावरील प्रमुख राजमार्गात मोती, हत्ती, गुलाब, सीता, राम, लक्ष्मण, हनुमान टाके आहेत. मुल्हेरगड ते मुल्हेर गाव या मार्गात एकूण २१ पाय विहिरी आहेत. पैकी चंदनबारव व माठबारव या अतिशय सुंदर आहेत. यांचे मूळ स्वरूप कायम राखत जतन संवर्धन होणे गरजेचे आहे.
"मुल्हेर गडावरील चंदनबारव हा स्थापत्याचा अतिशय सुंदर उत्कृष्ट असा नमुना आहे. सदर बारव ही नंदा प्रकारातील असून, त्यास देवड्या व सज्जे आहेत. मुल्हेर गडावरील चंदन बारवमध्ये दोन शिलालेख असून, आत देवतांच्या मूर्ती देखील आहेत. सदर बारव इ.स. १४९८ मध्ये भैरवशहा राठोड बागुल राजाने निर्माण केली आहे."- रोहित जाधव, गड सेवक, सटाणा
"गड किल्ल्यांवरील पाण्याचे टाके, तलाव कोरडे असल्याने पशु-पक्षी, वन्य प्राण्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने गाव-वस्तीकडे धाव घेत आहेत. परिणामी, रात्रीच्या वेळी पाणी व शिकारीच्या शोधात असताना प्राणी विहिरीत पडल्याच्या घटना घडतात. टाके, तलाव, बारवांची दुरुस्ती केल्यास पशु-पक्षी, वन्यप्राण्यांचे अस्तित्व टिकणार आहेत."
- सुरेश पवार, अध्यक्ष, कसमादे परिसर ॲग्रो प्रोड्युसर कंपनी, ढोलबारे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.