येवला : तुमच्याकडे जिद्द आणि हाती घेतलेले काम तडीस नेण्याची प्रबळ इच्छाशक्ती असली की कुठलाही व्यवसाय टॉपवर पोहोचतो हे दाखविले आहे तालुक्याच्या डोंगराळी भागातील भारम येथील सुरेखा जेजूरकर या सावित्रीच्या लेकीने! कृषी विभागाच्या मदतीने उभा केलेला एसजीएम मसाल्याचा विस्तार थेट मुंबई, पुण्यापर्यंत पोहोचून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. (Nashik spice business of women in bharam village news)
एकतर तालुका अवर्षणप्रवण, त्यात भारम-कोळम हा डोंगराळी, हलक्या जमिनी व खोल भूजल पातळीचा भाग. त्यामुळे या परिस्थितीवर मात करण्यासाठी सुरेखा जेजूरकर यांनी कंबर कसली आणि काहीतरी उद्योग सुरू करावा, ही इच्छाशक्ती बाळगत कृषी विभागाच्या मदतीने प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेतून सहकार्य घेऊन वर्षभरापूर्वी एसजीएम मसाले नावाचा उद्योग सुरू केला. आजमितीला त्यांच्या छोट्याशा उद्योगाचा वर्षभरात मोठा विस्तार झाला असून, ३२ प्रकारचे मसाले थेट मुंबई, ठाणे, पुण्यापर्यंत पोहोचत आहेत.
मागील वर्षी फेब्रुवारीत शेतामध्ये पावणेपाच लाख रुपये खर्चून त्यांनी छोटासा शेड उभारला व अत्यावश्यक मशिनरी खरेदी केली. यावर मसाले, शेवया, वडे, कुरडई, पापड हे गृहोपयोगी पदार्थ बनवून विक्री केली. सुरुवातीला मिरचीपुरता असलेला हा व्यवसाय मात्र आता विस्तारला आहे.
आज सुरेखाताईंनी बनविलेले काळा मसाला, सांबर, पावभाजी, लाल मिरची, हळद, गोडा, किचन किंग, काश्मिरी, कांदा लसूण अशा ३२ प्रकारच्या मसाल्यांची पॅकिंग करून मिळालेल्या ऑर्डरवर हे मसाले विक्री सुरू आहे. प्रतिकिलोला ६०० ते १००० रुपयांचा दरही त्यांना मिळत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या मसाल्यांचे सर्वत्र आवडीने कौतुक देखील होत असल्याचे त्या सांगतात. (latest marathi news)
सुरुवातीला त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते विजय जेजूरकर या व्यवसायात उत्सुक नव्हते. मात्र, हळूहळू व्यवसाय विस्तारत गेला आणि त्यांचेही सहकार्य मिळत गेले. वाशिम व पुणे येथून कच्चामाल खरेदी करून त्यावर प्रक्रिया करून जेजूरकर यांनी हा व्यवसाय विस्तारला आहे. विशेष म्हणजे एका वर्षात विक्री केलेल्या मसाल्यातून त्यांना खर्च वजाजाता दोन लाखाचे उत्पन्न मिळाले हेही विशेष..!
कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक संजय मोरे, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड यांनी कर्ज देण्यासह वेळोवेळी मार्गदर्शनही केल्याने त्यांना या कर्जातून सबसिडीत मिळाली असून, नियमितपणे हप्ताही त्या भरत आहेत. खेडेगावातील हा मिरचीचा व्यवसाय थेट ३२ मसाल्यापर्यंत पोहोचल्याने सुरेखाताईंची गरुड झेप इतर महिलांपुढे आदर्शवत अशीच म्हणावी लागेल.
"कृषी विभागाचे कर्ज व दीड लाखाच्या अनुदानातून या महिलेसह तिच्या कुटुंबाला दिशा मिळाली आहे. मेहनतीने उभा केलेला उद्योगाचा विस्तार पॅकेजिंग, ब्रँडिंग यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन केले आणि सुरेखाताईंनी देखील मेहनतीने हा व्यवसाय विस्तारत वेळेत कर्जाची परतफेड केली आहे."- हितेंद्र पगार, मंडळ कृषी अधिकारी, अंदरसूल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.