इगतपुरी शहर : छत्रपती संभाजीनगर ते मुंबईला जाणारी माजी खासदार इम्तियाज जलील यांची तिरंगा संविधान रॅली सोमवारी (ता. २३) दुपारी तीनच्या सुमारास कसारा घाटातून रवाना झाली. मात्र सकाळपासूनच हजारो कार्यकर्त्यांच्या वाहनांच्या ताफ्यामुळे वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता. (Imtiaz Jalil Tiranga Constitution Rally Impact on traffic)
या रॅलीच्या ताफ्यात हजारो वाहने आणि नागरिकांचा सहभाग दिसून आला. त्यातच दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच आनंद दिसून आला. जलील यांना पाहण्यासाठी व रॅलीत सहभागी होण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
कसारा घाटातून रॅली जात असताना या वेळी इम्तियाज जलील यांनी हात उंचावत अभिवादन केले. मुहम्मद पैगंबर यांच्या निंदेविरोधात ही रॅली निघाली असून, जिल्ह्यातील हजारो मुस्लिम बांधव सहभागी झाल्याचे दिसून आले. सायंकाळी सहानंतरही मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांचा ताफा दिसून येत होता. ही रॅली मुंबईत पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांना संविधान भेट देणार आहे.
इगतपुरी ते कसारादरम्यान गर्दी
छत्रपती संभाजीनगरहून नागपूर समृद्धी मार्गाने आलेल्या वाहनांना इगतपुरीच्या पिंप्रीसदो येथून मुंबईकडे जाताना खानपान, चहापाण्यासाठी इगतपुरी ते कसारादरम्यान सर्वच हॉटेले व ढाब्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी होती. (latest marathi news)
टोल आकारणी न करता मार्गस्थ
वावी (ता. सिन्नर) : ‘एमआयएम’चे नेते इम्तियाज जलील यांची तिरंगा रॅली छत्रपती संभाजीनगर येथून मुंबईकडे समृद्धी महामार्गाने रवाना झाली. नाशिक जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर या रॅलीतील वाहने सकाळी अकरापासून मुंबईच्या दिशेने धावताना दिसून येत होती. प्रवासी कार, जीप, मिनीबस यासह विविध प्रकारच्या मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचादेखील समावेश होता.
सात ते आठ हजार इतकी वाहनांची संख्या असल्याचा अंदाज पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आला. सिन्नर तालुक्यातील गोंदे इंटरचेंज या ठिकाणी पुणे, संगमनेर बाजूकडून शेकडो वाहने रॅलीत सहभागी होताना दिसत होती. या ठिकाणी वावी सिन्नर व एमआयडीसी पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते.
विविध गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारीदेखील मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या रॅलीतील वाहनांची नोंद घेत होते. इगतपुरी इंटरचेंज येथून ही वाहने मुंबई-आग्रा महामार्गावर मार्गस्थ होत होती. इगतपुरी येथील समृद्धीच्या टोलनाक्यावरून या सर्व वाहनांना टोल आकारणी न करता मार्गस्थ करण्यात आले. टोल आकारणी पॉइंटवरील सेन्सर बार काढून घेण्यात आले होते, त्यामुळे एकाही वाहनाची नोंदणी अथवा स्कॅनिंग झाले नाही.
धोकादायक वाहतूक
समृद्धी महामार्गाच्या मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांची एकाच वेळी प्रचंड गर्दी झाल्यामुळे अनेक वाहने विरुद्ध बाजूच्या लेनवरून धावत होती. ही बाब अतिशय धोकादायक होती. विरुद्ध बाजूच्या लेनवर धावत असताना चुकून एखाद्या वाहनाला अपघात झाला असता तर परिस्थिती नियंत्रणा बाहेर गेली असती. मात्र सुदैवाने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.