Nashik News : जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना ‘नीट’ आणि ‘जेईई’ या अनुक्रमे वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी जिल्हा परिषदेने राबविलेल्या ‘सुपर फिफ्टी’ उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, यात सात विद्यार्थ्यांनी यश मिळविले. या अभ्यासक्रमाची व्याप्ती वाढवून आता ११० विद्यार्थ्यांना यात प्रवेश देण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. (Nashik ZP News)
या उपक्रमाकरिता दोन कोटींची तरतूद करावी, यासाठी जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजन समितीला साकडे घातले आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ‘नीट’ आणि ‘जेईई’ परीक्षांची कवाडे उघडी व्हावीत, यासाठी सुपर ५० उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला.
या नावीन्यपूर्ण योजनेसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. उपक्रमात वर्षभरात प्रतिविद्यार्थी सुमारे एक लाख ६५ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. गेल्या वर्षी हा उपक्रम उपाध्ये क्लासेससोबत राबविण्यात आला होता. या उपक्रमाचा प्रतिसाद बघता गत वर्षी या उपक्रमातील विद्यार्थ्यांची संख्या ११० करण्यात आली.
गत वर्षीही पालकमंत्री दादा भुसे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पुन्हा निधी दिला होता. पहिल्या वर्षातील उपक्रमातील ५० पैकी २२ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले, तर सात विद्यार्थी चमकले. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ व २०२५-२६ या दोन वर्षांसाठी या उपक्रमासाठी एकूण ११० विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. यातील ५५ जण ‘जेईई’, तर ५५ विद्यार्थी ‘नीट’साठी निवडण्यात येणार आहेत. (latest marathi news)
नावीन्यपूर्ण योजनेतून कोणत्याही उपक्रमाला केवळ दोनदा निधी देण्यात येतो. वारंवार निधी देता येत नाही. त्यामुळे या उपक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात यंदा दीड कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
असे असले तरी, जिल्हा नियोजन समितीकडे विविध लेखाशीर्षकाखाली दोन कोटींच्या निधीची मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. आदिवासी, समाजकल्याण या विभागांतर्गत निधीची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा नियोजनकडून यंदा निधी मिळतो की नाही, याकडे आता लक्ष लागले आहे.
इच्छुकांची संख्या वाढतेय
‘सुपर फिफ्टी’साठी आतापर्यंत सहा हजार ५०० विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. अद्याप १५ जुलैपर्यंत म्हणजे आणखी दोन दिवस प्रवेश देण्यात येणार आहेत. यासाठी २१ जुलै २०२४ ला यासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.