चांदोरी : भेंडाळी येथील व्यावसायिकांनी व्यवसाय वाढीसाठी ‘इंडिया मार्ट’ या वेबसाइटवर नोंदणी केली असून गेल्या काही महिन्यात चार ते पाच व्यावसायिकांची माहिती अज्ञाताने हॅक करून संबंधित व्यापाऱ्यांच्या नावावर विविध मालाची ऑफर देत पैसे आपल्या नावे वळते केले. (information of businessmen was hacked by unknown)
त्या बदल्यात भेंडाळी येथील प्रतिष्ठित नागरिक व व्यावसायिकांचे पत्ते देत तेथून माल घेऊन जा असे सांगत परप्रांतीय व्यापाऱ्यांची फसवणूक होत आहे. या घटनांत वाढ झाली असून त्रास येथील व्यावसायिक व प्रतिष्ठित नागरिकांना होत आहे. गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून हा गंभीर प्रकार घडत आहे. यामुळे स्थानिकांना परप्रांतीय व्यापाऱ्यांना तोंड देता देता नाकी नऊ आले आहे.
यासंदर्भात सायबर सेलकडेही तक्रार दिली आहे. परंतु, अज्ञात व्यक्ती न सापडल्याने दररोज त्रास सहन करावा लागत आहे. चोरट्यांनी परप्रांतीय व्यापाऱ्यांना ५० लाखांवर गंडा घातल्याचा अंदाज आहे. हे मोठे रॅकेट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भेंडाळी येथील कांदा व्यापारी व आर. बी. ट्रेडर्सचे संचालक राहुल खालकर यांना त्याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो आहे.
सुरवातीस काही परप्रांतीय व्यक्ती पत्ता विचारत यायचे. राहुल खालकर यांना की वाटायचे की यांचा काही गैरसमज होत असावा. ज्या व्यक्तीने त्यांना फोन केलेला असायचा तो बंद असायचा. नंतर त्रास वाढायला लागला. ‘तो मी नव्हेच’ किंवा त्या मालाशी माझा काही संबंध नाही हे सांगताना व त्यांचे समाधान करायला खूप वेळ आणि त्रास सहन करावा लागत आहे.
अशी होते परप्रांतीयांची फसवणूक
कोणीतरी परराज्यातील व्यापाऱ्यांना संपर्क करून स्वस्तात माल देण्याचे आमिष दाखवतात. अगोदर मालाची रक्कम खात्यावर वर्ग करण्यास सांगितले जाते. त्यानंतर भेंडाळी येथील आमचा पत्ता दिला जातो. ऑनलाइन टाकलेले पैसे थेट हैदराबाद, ओडिशा, गुजरात, राजस्थानमधील बँकेत जमा होत आहेत.
गुजरात, राजस्थान, ओरिसा या ठिकाणाहून मसूरदाळ, नारळ, कांदे घेण्यासाठी व्यापारी ट्रक घेऊन येतात. येथे आल्यावर त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येते. सायबर सेलने या प्रकरणाचा तातडीने तपास करून ग्रामस्थांची या त्रासापासून सुटका करावी,अशी मागणी होत आहे.
या व्यावसायिकांना त्रास....
आर. बी. ट्रेडर्स, राहुल खालकर, गुरुकृपा ट्रेडर्स, माऊली फर्निचर, सोपान खालकर, गोरख खालकर यासह भेंडाळी, महाजनपूर येथील प्रतिष्ठित नागरिकांना चोरट्यांच्या प्रतापाचा त्रास सहन करावा लागत आहे. कधीकधी वादाचे प्रसंग घडत आहे. कधीतरी बाहेरहून येणारे व्यापारी तुम्हीच पैसे घेतले म्हणून वादही घालतात. गेल्या नऊ महिन्यापासून दर आमचेकडे आठवड्याला दोन तीन व्यापारी भेंडाळी येथे येतात.
"संबंधित प्रकार हा इंडिया मार्केट या वेबसाईटच्या माध्यमातून घडलेला असून फसवाणुकीचे प्रकार उघडकीस येत आहे. ज्यांची फसवणूक झाली त्यांनी स्थानिक पोलिसांकडे संपर्क केला आहे." - विकास ढोकरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, सायखेडा.
"या प्रकाराचा अनेक दिवसांपासून मनस्ताप सहन करावा लागत आहे. चोर सोडून आम्हालाच त्रास सहन करावा लागतोय." - राहुल खालकर, व्यापारी, भेंडाळी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.