आई दोन महिन्यांची गर्भवती असताना वडिलांनी विहिरीत ढकलून दिलं. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. यातूनही आईचा जीव वाचला. रस्त्याने जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांच्या मदतीने तिचं बाळंतपण झालं, त्यानंतर आईसोबत ती वारकऱ्यांसोबत नाशिकला आली. नाशिक रोडच्या रेल्वेस्थानकावर आडोसा शोधला. येथील दोन पैसे मागणाऱ्यांनी तिला व आईलाही पैसे मागण्याचे धडे दिले. पैसे मागतानाच नाशिक रोड भागातील गोसावीवाडीतील महापालिका शाळेत शिक्षणाचा श्रीगणेशा केला. जिद्दीच्या जोरावर वकिलीचे शिक्षण पूर्ण करून महिलांसमोर आदर्श निर्माण केला, तो ॲड. गोदावरी देवकाते यांनी..!
(Insipirational Story Godavari devkate became Advocate)
ॲड. गोदावरी राजाराम देवकाते, शिक्षण बी.ए., एल.एल.बी... मूळच्या मराठवाड्यातील बुलडाणा परिसरातील... गोदावरीताईंना आई छायाबाई यांनी वाढवलं... अतिशय भयावह परिस्थितीत आयुष्य काढणाऱ्या गोदावरीताई यांच्या आई छायाबाई यांनी आलेल्या परिस्थितीला सामोरे जात मुलीच्या शिक्षणासाठी केलेला संघर्ष जगावेगळा...
सासरी होणाऱ्या त्रासामुळे मरणाच्या दारातून आई परत आली... गोदावरीताईंच्या वेळी आई गर्भवती असताना पतीने विहिरीत ढकलून दिले. मात्र नियतीनं त्यांच्या नशिबात काही वेगळंच लिहून ठेवलं होतं. या दुर्घटनेतून त्या बचावल्या. काही महिने शेगावला गजानान महाराज संस्थानमध्ये लाडू बनविण्याचे काम केले.
त्यानंतर या भागातून पायी जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांच्या मदतीने त्यांनी थेट रुग्णालय गाठलं... शासकीय रुग्णालयात गोदावरीताईंचा जन्म झाला... महिनाभर रुग्णालयात राहिल्यानंतर वारकरी दांपत्याच्या मदतीने त्यांनी नाशिकच्या रामतीर्थावर आपला मुक्काम हलवला. त्या वेळी गोदावरीताई केवळ पाच महिन्यांच्या होत्या.
संकटांची साखळी पाचवीलाच पूजलेली
रामतीर्थावर दिवस काढत असतानाच पूरपरिस्थितीमुळे प्रशासनाने येथील कुटुंबांना त्या वेळी राहण्यासाठी मज्जाव केल्याने आईसमवेत गोदावरीताई नाशिक रोड रेल्वेस्थानकावर आल्या. रेल्वेस्थानकावर काय काम करावे? हा प्रश्न मायलेकींसमोर होता. मायलेकींची व्यथा ऐकून रेल्वेस्थानकावर पैसे मागून उपजीविका भागविणाऱ्यांनी त्यांना पैसे मागण्याचे धडे देत माणुसकीचा आधार दिला.
नाशिक रोड स्थानकासह इगतपुरी, घोटी, रामतीर्थावर त्या पैसे मागण्यासाठी जाऊ लागल्या. पैसे मागण्यासोबतच अन्नदानाच्या ठिकाणांची माहिती घेत दोघींनी पोटाची भूक भागवली. नाशिक रोडच्या दुर्गादेवी मंदिरात राहून त्या आयुष्य काढत होत्या. याच काळात या भागात पोलिओ डोस पाजण्यासाठी आलेल्या आरोग्य विभागातील सेविकांनी गोदावरीताईंना शाळेत पाठविण्याचा सल्ला दिला. (latest marathi news)
खडतर प्रवासाला जिद्दीची जोड...
गोसावीवाडीतील शाळा क्रमांक १२२ मध्ये गोदावरीताईंनी पहिलीत प्रवेश घेतला. सकाळी शाळेत जाण्यापूर्वी परिसरात दोन पैसे मागायचे, त्यानंतर सायंकाळी शाळा सुटल्यानंतर भंगार गोळा करण्यासाठी आईसोबत गोदावरीताईंना जावे लागत होते. मात्र बुधवारी गंगाघाटावर बाजार भरत असल्याने गोदावरीताई शाळेला दांडी मारून आईसह पैसे मागण्यासाठी गंगाघाट, रामतीर्थ परिसरात यायच्या.
गोदावरीताई अभ्यासात हुशार असल्याने त्या चौथीत असताना शिष्यवृत्तीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्या. याच काळात नाशिक रोड रेल्वेस्थानकावर पैसे मागत असताना वडापावमध्ये गुंगीचे औषध टाकून गोदावरीताईंचे एका तरुणाने अपहरण केले. त्या वेळी त्या केवळ दहा वर्षांच्या होत्या.
मनमाड रेल्वेस्थानकावर त्या शुद्धीवर आल्यानंतर त्या तरुणाकडे त्यांनी आईबद्दल विचारणा केली. मात्र त्यांना मारहाण झाली. येथे अजून एका तरुणाशी पळवून नेणाऱ्या तरुणाची भेट झाल्यानंतर त्यांनी गोदावरीताईंना विकण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात सहा दिवस गोदावरीताई उपाशीच होत्या.
मात्र दोन्ही तरुणांमध्ये वाद झाल्यानंतर तरुण निघून गेला. पळवून नेलेल्या तरुणाने गोदावरीताईंना मूर्तिजापूरला नेले. मात्र तेथूनही त्यांनी त्या तरुणाला शिताफीने चकवा देत थेट रेल्वेने नाशिक गाठले व आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. सातवीपर्यंत रेल्वेस्थानक परिसरात वास्तव्याला राहून पैसे मागणाऱ्या गोदावरीताईंसह आईने आपला मुक्काम देवळाली गावात हलवला.
मात्र संकटं काही पाठ सोडायला तयार नव्हती. याच काळात परिसरात केटरिंगच्या कामावर आईसोबत त्याही जात होत्या. गोदावरीताईंनी अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी त्या उत्तीर्ण झाल्या. ‘इंटरविडा’सारख्या संस्थेने तसेच प्रसारमाध्यमांनी त्यांच्या परिस्थितीची दखल घेतल्याने त्यांना अकरावीमध्ये केटीएचएम महाविद्यालयात प्रवेश मिळाला.
त्यामुळे शिक्षणासाठी त्यांनी आनंदवली येथे मुक्काम हलविला. महाविद्यालयाचे शिक्षण घेत असतानाच परिसरात पुस्तकांच्या दुकानात काम करत त्यांनी आईला मदत केली. २०२० मध्ये कोरोनाच्या महामारीत वर्षभर पुस्तकांच्या दुकानात काम बंद असल्याने भाजीपाला विक्री करून धडपड सुरू ठेवली. पुढे विधी महाविद्यालयात प्रवेश मिळवत त्यांनी तीन वर्षांत वकिलीचे शिक्षण पूर्ण करत सनद मिळवली.
ॲड. प्रभाकर वायचळेंनी जपली माणुसकी
आयुष्याच्या संकटांच्या लढाईला सामोरे जाताना जिद्दीच्या जोरावर गोदावरीताईंनी मिळवलेलं यश नक्कीच खचून जाणाऱ्या घटकांसाठी प्रेरणा देणारं आहे. वकिलीचे शिक्षण पूर्ण करत असतानाच मुंगसरा येथील ज्येष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते ॲड. प्रभाकर वायचळे, प्रवीण वाघमारे, सचिन मोढे, रविभाऊ गांगुर्डे, विनायक येवले, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी व आई शांताबाई यांचा आधार मोलाचा असल्याचे त्या अभिमानाने सांगतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.