Artist Sharvari Luth esakal
नाशिक

Nashik Kala Katta : आलेख चित्राच्या किमयागार शर्वरी लथ

सकाळ वृत्तसेवा

"आलेख्यम् ... मुंबईच्या जहाँगीर आर्ट्स गॅलरीमध्ये चित्रकार शर्वरी लथ यांचे हे अनोखे चित्रप्रदर्शन ११ ते १७ डिसेंबर दरम्यान सुरू होत आहे. ‘लाईन स्पेस ॲन्ड कलर्स’ या कल्पनेतून साकारलेल्या त्यांच्या सर्जनशील कलाकृतींच्या या प्रदर्शनाचे अनावरण प्रसिद्ध कलाकार राज ठाकरे यांच्या हस्ते होणार असून आलेख आणि चित्रकला यांच्या संगमातून उगम पावलेली ‘आलेख्यम्’ ही त्यांची खास बहारदार शैली चित्रजगताला यानिमित्ताने अनुभवायला मिळणार आहे."- तृप्ती चावरे- तिजारे.

(Nashik Kala Katta Alchemy of Graphic Art Sharvari Lath)

अनोख्या चित्रशैलीबद्दल बोलताना शर्वरीजी म्हणतात, कला ही ॲबस्ट्रॅक्ट, अनाकलनीय आणि अभविष्यनीय असली तरी रेषा ही सरळ, समांतर पण अमर्याद असते, म्हणूनच मला ती आलेखाची जननी वाटते.

यश आणि अपयश या दोन्ही अवस्थांमध्ये रेषा आपल्याला हे शिकवीत असते की, अजून मी कुठेच पोचू शकलेली नाही, प्रवास सुरू आहे. कला बहरणे ही एक आत्मिक प्रक्रिया आहे, कोणत्याही तडजोडीशिवाय ती सतत, अखंड आणि अव्याहत सुरूच हवी. रेषा हे माझ्यासाठी एक प्रमाण आहे.

माझ्या मनातली कला आणि प्रत्यक्ष साकारणारी कृती हे पडताळून पाहणारे प्रमाण.रेषा माझ्यासाठी मर्यादाही आहे, ‘बेसिक मेकस वंडर्स’ याप्रमाणे फक्त चार मूळ रंगातच मी माझे विश्व शोधत असते, कारण या चारच रंगावर आधारित सगळे कलर पेलेट विकसित झाले आहे असे मला वाटते.

तंत्र आणि कला यांच्या समन्वयातून स्वतःचे सौंदर्य विधान साकारणाऱ्या शर्वरी लथ यांचे एक वेगळे कलावैशिष्ट्य म्हणजे, मूर्तीकलेवरील पृष्ठभागीय चित्रकला. गोमातेच्या आणि कासवाच्या मूर्तीवर त्यांनी मांगल्याचे प्रतीक म्हणून साकारलेल्या ‘बेल्स’ या कॉर्पोरेट जगतात सर्वपरिचित आहेत.

त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दुर्मिळ छायाचित्रांचा अर्थबोध अधिक प्रभावीपणे व्हावा म्हणून मूळ छायाचित्रांत त्या शुद्ध भौमितिक चित्रकलेचा अंतर्भाव एका वेगळ्याच कौशल्याने करतात.

मुळातच सुंदर असलेल्या एखाद्या कलाकृतीत, स्वतःच्या रंगरेषांची शैली मिसळून एक वेगळी आंतरपूरक कलाशैली निर्माण करणे हे आव्हान एखाद्या शिवधनुष्यासारखे असते.

परंतु यामागे, मूळ कलाकृतीचे सौंदर्य वाढवण्याची शर्वरीताईंची भूमिका ही त्यांच्या या प्रयोगशीलतेतही स्पष्ट व प्रामाणिक असते, त्यामुळे हे आव्हान त्या आपल्या प्रतिभेच्या साक्षीने सहज निभावून जातात.

त्यांच्या आर्ट गॅलरीत, कवी गुलजार आणि जावेद अख्तर यांच्या एका दुर्मिळ छायाचित्रावर काढलेल्या अर्थपूर्ण रेषा व रंगसंगती हे याचे उत्तम उदाहरण आहे. विमानाच्या पार्श्वभूमीवरील हे मूळ छायाचित्र उत्तम आहेच, पण त्यातील नात्यातील वीण खऱ्या अर्थाने पूर्ण होते ती शर्वरीजींच्या रंगरेषांनी सजलेल्या अर्थपूर्ण पार्श्वभूमीमुळे.

२०१३ ला जहाँगीर आर्ट्समध्ये भरलेल्या शर्वरीजींच्या चित्रप्रदर्शनातील सगळी चित्रे सर रतन टाटा यांनी बॉम्बे हाऊससाठी एकाच वेळी विकत घेतली होती. त्यांच्या कलेवर खूष होऊन प्रसिद्ध आर्किटेक्ट, सर हाफीज कॉन्ट्रॅक्टर, तसेच ऋषितुल्य शिक्षणतज्ञ बेजन देसाई, हे दिग्गज त्यांच्या कलेची प्रशंसा करतात, त्यांना प्रोत्साहित करतात.

प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी त्यांच्या चित्रकृतीने सजलेली साडी परिधान करतात. अत्यंत खडतर परिश्रमाने शर्वरीजींनी आजवर गाठलेले यशाचे हे काही पल्ले, पण इथवर येण्यासाठी त्यांना त्यांच्या सर्व कुटुंबीयांची मोलाची साथ लाभली.

त्या अभिमानाने सांगतात, की अंथरुणाला खिळून असलेल्या माझ्या सासूबाईही मला म्हणतात की ‘तू माझ्यात अडकू नकोस, माझ्या सेवेपेक्षाही तू तुझ्या कलेच्या सेवेकडे लक्ष दिलेस तर त्यात मला जास्त आनंद होईल.

घरातूनच असे जिव्हाळा जपणारे प्रोत्साहन मिळते, त्या वेळी माझी कला खऱ्या अर्थाने आतून बहरून येते आणि ती सार्थकी लागल्याचे समाधान मिळते. शर्वरीजींच्या स्टुडिओला भेट दिल्यावर मला भावलेली गोष्ट म्हणजे अगदी समोरच दिसणारी त्यांची पहिलीवहिली कलाकृती.

असं म्हणतात की‌ तुमचा आरंभ कुठे होता हे तुम्हाला समजलं तरच तुमच्या प्रवासाला अर्थ येत असतो. हा अर्थ समोर ठेऊन शर्वरीजी काम करतात, त्यांच्यासाठी जणु त्या आत्मविश्वासाच्या पाऊलखुणाच असतात. कलेतून मिळणारा निधी हा त्या अनाथ मुलांच्या कल्याणासाठी व कॅन्सरपीडित मुलांच्या

उपचारासाठी वापरतात. मला वाटतं, त्यांच्यातली संवेदना व हा समर्पणभाव त्यांना माणूस म्हणून प्रत्येक कलाकृतीगणिक सतत मोठं करीत असतो. यासाठी, आत्मशोधाच्या प्रक्रियेत, त्यांच्यासाठी त्यांचा स्टुडिओ हा एखाद्या स्वर्गाच्या तुकड्यापेक्षा कमी नाही, तोच त्यांचा सर्जनशील एकांत आहे.

आत्मसंवादात रमणारा. या संवादातून त्यांच्या कलेचा हेतू, प्रयोजन ,भूमिका आणि विचार हे सारख्याच उंचीने आणि खोलीने उदात्त आकार घेत असतात, सतत..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आशिष शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT