लासलगाव : कांद्यासाठी संपूर्ण आशिया खंडात लासलगावची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. परंतु, या गावातील ४९ वर्षे जुना असलेला डेपो व ४२ वर्षे जुन्या बसस्थानकाची अवस्था अतिशय खराब झालेली असून, स्थानकाला अस्वच्छतेचे ग्रहण लागले आहे; तर जुन्या आणि खिळखिळ्या झालेल्या बसमधूनच प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. (Lasalgaon MSRTC damaged bus become unsanitary)
लासलगाव हे आशिया खंडात कांद्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे याठिकाणी जिल्ह्यासह परराज्यांतील व्यापाऱ्यांचा नेहमी राबता असतो. कांद्यामुळे पंचक्रोशीतील भाग हा सधन झाल्याने तसेच महामार्गावर हे गाव असल्याने येथे लोकवस्तीही मोठ्या प्रमाणात असून, निफाड तालुक्यातील हे महत्त्वाचे गाव आहे.
परंतु, येथील बसस्थानकाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. जिल्ह्यात उत्पन्नाच्या बाबतीत आगाराचा दुसरा क्रमांक असून, महिन्याला दोन कोटी ७० लाखांचे उत्पन्न यातून महामंडळाला मिळत असले, तरी सुविधांच्या बाबतीत हे बसस्थानक अतिशय खराब अवस्थेत आहे.
डेपोला ४५ बस असून, नऊ बसची स्थिती ‘स्क्रॅप’ची झाली. उर्वरित ३६ बस या खिळखिळ्या झाल्या असून, पाच नवीन बस नव्यानेच दाखल झाल्या आहेत. एकूण २८९ बसफेऱ्यांमधून साडेबारा हजार प्रवाशांची वाहतूक केली जाते.
समस्यांकडे दुर्लक्ष
डेपो व बसस्थानक हे दोन्हीही अस्वच्छतेच्या विळख्यात असून, चारही बाजूंनी गवत वाढलेले आहे. डेपोत प्रवेश करताना अथवा बाहेर पडताना खड्ड्यांमुळे बस ‘डान्स’ करतात. बस डेपोचे पत्रे खराब झाले असून, पावसाळ्यात सर्वत्र पाणी गळते. त्यामुळे येथे कोणीही बसत नाही.
लासलगाव बसस्थानक चारही बाजूंनी अतिक्रमणांनी वेढलेले असल्याने प्रत्येकाच्या मागील बाजूस कचऱ्याचे साम्राज्य आहे. बाहेरील खासगी वाहनांना जणू पार्किंग सुविधा करून दिली असल्याचे चित्र दिसते. सायंकाळी बसस्थानकात दिवे लागत नसल्याने बसस्थानक हे टपोरी मुलांचा बसण्याचा अड्डा बनतो. हिरकणी कक्षाला कायमचे कुलूप लागले आहे. (latest marathi news)
...दृष्टिक्षेपात बसस्थानक
एकूण बस ४५
‘स्क्रॅप’च्या मार्गावर ९
रोजच्या बसफेऱ्या २९८
रोजचे किलोमीटर १६,७४९
रोजची प्रवासी वाहतूक १३,५००
एकूण कर्मचारी २१२
वाहक ७४
चालक ८७
यांत्रिक २६
प्रशासकीय २५
मान्यवरांच्या भूमिका
"आशिया खंडातील कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. मात्र, बसस्थानकाची अवस्था वाईट आहे. २००३ मध्ये सिन्नरबरोबर लासलगाव बसस्थानकाचे काम व्हायला हवे होते; पण ते झाले नाही. मात्र, आता नवीन बसस्थानकाचे उद्घाटन झाले आहे. काम लवकर पूर्णत्वाकडे जाईल."
- जयदत्त होळकर, माजी सरपंच, लासलगाव
"शालेय विद्यार्थ्यांसाठी फेऱ्या वाढविल्या. विद्यार्थी पास वाढले. चालक-वाहक उत्पन्नवाढीसाठी खर्च व उत्पन्न यांचा ताळमेळ साधतात. महिला सन्मान योजना व अमृत ज्येष्ठ नागरिक योजनांची जनजागृती केली. कमी कर्मचारी संख्येवर काम सुरू असून, नवीन बसची मागणी केली आहे."
- सविता काळे, डेपो व्यवस्थापक, लासलगाव
"बसस्थानकातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हाल होतात. महाविद्यालय सुटल्यावर बस सुविधा नसल्याने प्रामुख्याने युवक-युवती रस्त्यावर खासगी वाहनांना हात देऊन जीवघेणा प्रवास करतात."- राजेंद्र राणा, उद्योजक, राणा स्टील, लासलगाव
"बऱ्याचदा महाविद्यालय सुटल्यावर आम्हाला घरी जायला बस नसते. त्यामुळे नाइलाजाने जीव मुठीत धरून खासगी वाहनांना हात दाखवून प्रवास करावा लागतो. कधी-कधी सायंकाळपर्यंत बस नसते."- गायत्री शिंदे, विद्यार्थिनी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.