Nashik Lok Sabha Constituency  esakal
नाशिक

Nashik Lok Sabha Constituency : ‘ये पब्लिक है, सब जानती है’; ताईंचा डायलॉग भगरेंच्या पथ्थ्यावर

सकाळ वृत्तसेवा

सुदर्शन सारडा : सकाळ वृत्तसेवा

ओझर : तब्बल दोन दशकांनंतर भास्कर भगरे यांच्या विजयाने दिंडोरी पुन्हा शरद पवारांसाठी हक्काचे ठिकाण बनले. दिंडोरी तसा बारामतीनंतरचा शरद पवार यांच्यासाठी सर्वांत सुरक्षित मतदारसंघ. मात्र, डॉ. भारती पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात जात हा मतदारसंघ भाजपकडे खेचून घेतला होता. (Nashik Lok Sabha constituency)

आताच्या लोकसभेत मात्र भास्कर भगरे यांच्या रूपाने दिंडोरी पुन्हा शरद पवारमय झाले आहे. भास्कर भगरे यांच्या यशाचे श्रेय या मतदारसंघातील सामान्य कार्यकर्ते व मतदारांचेच आहे. प्रचारादरम्यान भाजपच्या डॉ. पवार यांनी नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीची महती सांगताना ‘ये पब्लिक है, सब जानती है’ हे वाक्य वापरले. पण, या वाक्यात दडला होता शेतकऱ्यांच्या आस्थेचा कांदा हा विषय.

या कांद्याने एकेकाळी दिल्ली हादरून सोडली होती, मात्र ताईंनी हा विषय हलक्यात घेऊन मतदारांना गृहीत धरल्याची चर्चा अखेर पराभवात रूपांतरित झाली. निवडून आलेले भास्कर भगरे हे शिक्षक आहेत. भगरे यांचा विजय म्हणजे ही मतदारांनी हाती घेतलेली निवडणूक होती, हे स्पष्ट होते. यात ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे हे निवडणुकीचे ‘मसीहा’, तर माजी आमदार अनिल कदम ‘स्टार प्रचारक’ ठरले.

याच श्रीरामाने त्यांच्या सभापती केलेल्या शिष्याला खासदार केले. अनिल कदम हे तेच, ज्यांनी गेल्या निवडणुकीत भारती पवार यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. राजकीय धोरणांमुळे यंदा मात्र ते विरोधात होते. गेल्या वेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने वेगळे लढून त्यांना जेवढी मतं मिळाली, त्याहून थोडी कमी मते बाबू भगरे (सर) नामक उमेदवाराला मिळाली. (latest marathi news)

मात्र, त्यानंतरही लाखाच्या वर मताधिक्याने भास्कर भगरे निवडून आले. बाबू भगरेंना मिळालेली सगळी मते ही भास्कर भगरे यांची होती, असे म्हणण्यास वाव आहे. पक्षफुटीनंतर जे स्वयंघोषित पुढारी शरद पवार यांच्या अगदी जवळ गेले, त्यात गोकुळ पिंगळे, कोंडाजीमामा आव्हाड यांच्यासारखे नेते पहिल्या रांगेत पोहोचले. पक्षाने दिंडोरीची जबाबदारी पिंगळे यांना बहाल केली.

साहजिकच गोकुळ पिंगळे यांनी दिंडोरीत हवेचा अंदाज घेत साहेबांना शब्द देऊन टाकला. त्यांनी पक्षाला जे जे सांगितले, ते ते खाते गोठले असतानाही केले गेले. पण, कार्यकर्त्यांची रसद त्यांच्यापर्यंत पोहोचली का, हा संशोधनाचा विषय ठरेल. मनापासून जबाबदारी घेतली असती, तर दहाव्या क्रमांकावर असलेले बाबू भगरे हे लाखाच्या वर गेलेच नसते.

सामना अटीतटीचा झाला असता, तर डमी महोदयांनी फेस आणला होता. जनतेपर्यंत उमेदवाराचे नाव, चिन्ह, क्रमांक पोहोचविणे ही पक्षीय जबाबदारी गोकुळ पिंगळे, कोंडाजीमामा आव्हाड पेलू शकले नाहीत. त्यामुळे बाबू भगरेंना मिळालेली मते ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे अपयश आहे. श्रीराम शेटे यांनी होम ग्राउंडवर सर्वपक्षीय चंग बांधल्याने तो मतदानातून दिसून आला.

त्यामुळे समाविष्ट तालुक्यातील काही जाणकार ‘स्टार प्रचारक’ सोडले, तर गोकुळ पिंगळेंसारख्या नेत्यांकडे रसदव्यतिरिक्त कुठलाही अभ्यास दिसून आला नाही. ही बाब हेरून शेवटच्या क्षणी जयंत पाटलांनी अनुभवी बी टीम काही भागात कार्यान्वित केली.

आता अभिप्रेत असलेला निकाल लागला आहे. दरम्यान, पक्षाकडे दिलेल्या आकड्यांच्या यादीत दिंडोरीतील गाव-नेते, कार्यकर्ते, बूथप्रमुख यांना खरोखर विश्वासात घेतले होते, की फक्त कागदोपत्रीच आकडेमोड केली, हे वरिष्ठांनी तपासणे गरजेचे आहे.

चुका टाळा, पुढे चला!

राज्यात अडीच वर्षे उलटूनही जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका अद्याप घोषित झाल्या नाहीत. त्यामुळे कुठेही गटबाजी दिसून आली नाही. मात्र, कंत्राटदारी बंद झाल्यावर अडगळीत पडलेले काही धंदेवाईक राजकारणी लोकसभेत प्रादेशिक अस्मितेच्या नावाखाली झपाटून कामाला लागल्याचे चित्र दिसत होते. प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीतही एकत्र न येणारे गट अचानक सक्रिय झाल्याचे दिसून आले, हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. त्यामुळे जे भारती पवारांकडून घडले, ते भगरे यांना टाळावेच लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon : महाराष्ट्रातून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू

NIA Raid : ‘एनआयए’चे देशभर २२ ठिकाणी छापे; संशयास्पद साहित्य जप्त, राज्यामध्येही कारवाई

Narendra Modi : ‘काँग्रेस’चा विचारच परदेशी; वाशीमच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा घणाघात

Rahul Gandhi : आरक्षण मर्यादा वाढवणारच! कोल्हापुरात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा निर्धार

Calcutta Crime : पश्चिम बंगाल पुन्हा हादरले! अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून

SCROLL FOR NEXT