Nashik Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीच्या कामात प्रत्यक्ष सहभागी शासकीय कर्मचारी, ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना पोस्टल मतदानाचा अधिकार बहाल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अशा एक लाख १५ हजार मतदारांपैकी सुमारे पाच हजार मतदारांनी आतापर्यंत पोस्टल मतदानास संमती दिली. १४ हजार शासकीय कर्मचारी प्रत्यक्ष ‘ड्यूटी’च्या ठिकाणीच मतदान करणार असल्याचे त्यांनी जिल्हा निवडणूक विभागाला कळविल्याने पोस्टल मतदारांची संख्या कमी झाली आहे. (Nashik Lok Sabha Constituency 14 thousand employees of postal voters will exercise their right at actual booth )
नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी २० मेस मतदान होणार आहे. जिल्ह्यातील चार हजार ८०० मतदान केंद्रांसाठी २९ हजार ६६५ शासकीय कर्मचाऱ्यांवर विविध प्रकारची जबाबदारी सोपविण्यात आली. प्रत्यक्ष निवडणुकीत सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना १८ तारखेला पोस्टल मतदान करण्याची संधी दिली जाते.
त्यांच्यापर्यंत पोस्टल बॅलेट पोहोचवण्याची तयारी जिल्हा निवडणूक विभागाकडून केली जात आहे. जिल्ह्यातील २९ हजार कर्मचाऱ्यांपैकी अवघ्या तीन हजार ८५० कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदानास होकार दर्शविला आहे. यात अजून पोलिस अधिकाऱ्यांची भर पडण्याची शक्यता आहे; तर १४ हजार १९१ कर्मचाऱ्यांनी मतदान प्रमाणपत्र मागविले आहे. म्हणजेच ज्या ठिकाणी आपली ‘ड्यूटी’ असेल, त्याच ठिकाणच्या मतदान केंद्रावर मतदान करण्याची संधी त्यांना मिळते.
ज्या मतदारसंघात आपले नाव आहे आणि त्याच मतदारसंघात आपली ‘ड्यूटी’ आहे, अशा मतदारांना हे प्रमाणपत्र दिले जाते. जिल्ह्याबाहेरील किंवा दुसऱ्या राज्यात मतदान असलेल्या कर्मचाऱ्यांना तेथील मतदानाच्या दिवशी शासकीय सुटी दिली जाते. त्याच दिवशी फक्त आपल्या जिल्ह्यात मतदान नको, एवढीच अट त्यांना घालण्यात आली आहे. यंदाच्या निवडणुकीत ८५ वर्षांवरील व्यक्तींना घरूनच मतदान करता येणार असल्याने त्यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागते. (latest marathi news)
जिल्ह्यातील ६३ हजार ज्येष्ठ नागरिकांपैकी अवघ्या ७५० मतदारांनी घरूनच मतदान करण्याची परवानगी दिली आहे. २३ हजार दिव्यांगांपैकी २७५ व्यक्तींनी घरूनच मतदान करण्यासाठी परवानगी दिली. गावागावांमध्ये विखुरलेल्या या मतदारांपर्यंत पोहोचून त्यांची पूर्वसंमती घेण्याचे काम निवडणूक विभागाकडून केले जात आहे. इतर जिल्ह्यांतील १७३ मतदार असून, त्यापैकी धुळे जिल्ह्यात १३२ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
''पोस्टल बॅलेटद्वारे मतदान प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे. दिव्यांग, ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व शासकीय कर्मचाऱ्यांची पूर्वसंमती घेतली जात आहे. लवकरच अंतिम मतदार निश्चित होतील.''-डॉ. शशिकांत मंगरुळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी
विधानसभा मतदारसंघनिहाय पोस्टल मतदार
नांदगाव- २७८
मालेगाव मध्य- ७२
मालेगाव बाह्य- ४७०
बागलाण- ५१९
कळवण-सुरगाणा- १५०
चांदवड-देवळा- २६१
येवला- १२६
सिन्नर- १०२
निफाड- ३०१
दिंडोरी-पेठ- २००
नाशिक पूर्व- ७४४
नाशिक मध्य- १३०
नाशिक पश्चिम- १९९
देवळाली- ६१
इगतपुरी-त्र्यंबकेश्वर- ६४
एकूण- ३८५०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.