विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा
Nashik Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात १९५२ ते २०२४ या ७२ वर्षांच्या कालावधीमध्ये सुमारे ३५ वर्षे खासदारकीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाकडे दिल्लीतील नेतृत्व होते. मात्र, १९९९ पासून आजवर नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला परत मिळविता आलेला नाही. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून दोन्ही मतदारसंघ त्यांच्या वाट्याला राहिलेले आहेत. (Nashik Lok Sabha Constituency Nashik and Dindori Congress deprived of candidacy)
राष्ट्रवादी व शिवसेनेच्या फुटीनंतरही दोन्हीपैकी एक मतदारसंघ पक्षाला मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षाही फोल ठरली. नाशिक शिवसेना (उबाठा गट) तर, दिंडोरी मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला गेला आहे. त्यामुळे २५ वर्षांपासून या मतदारसंघात पक्षाला उमेदवारी देखील करता आलेली नसून पक्षाचे चिन्ह देखील मतदारापर्यंत पोहचविता आलेले नाही.
नाशिक जिल्हा तसा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला. नाशिक लोकसभा मतदारसंघात पक्षाने तब्बल ४० वर्षे नेतृत्व केले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा उमेदवार ८ वेळा विजयी झालेला आहे. अगदी १९९८ च्या लोकसभा निवडणुकीतही माजी खासदार माधवराव पाटील यांनी शिवसेनेचे खासदार राजाभाऊ गोडसे यांचा पराभव करत दिल्ली गाठली होती.
मात्र, १९९९ च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षात फूट पडून शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेत तिरंगी लढत झाली होती. यात शिवसेनेचे माजी खासदार उत्तमराव ढिकले विजयी झाले होते. तर, काँग्रेसचे गोपाळराव गुळवे पराभूत झाले होते. त्यानंतर सन २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी झाली. (nashik political news )
यात हा मतदारसंघ राष्ट्रवादीला गेला. त्यानंतर राष्ट्रवादीने २००४ ते २०१४ या कालावधीत सलग दोनदा या मतदारसंघातून विजय मिळवत दिल्ली गाठली. त्यानंतर सलग दोनदा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा उमेदवार पराभूत झाला. अठराव्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना (ठाकरे गट) यांच्या महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचा उमेदवार निवडणूक लढवत असल्याने यंदाही काँग्रेस पक्षाच्या पदरी उपेक्षा पडली आहे.
सन १९५७ निवडणुकीपासून झालेल्या लोकसभा निवडणुकीत मालेगाव लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. स्व. इंदिरा गांधी यांच्या एकनिष्ठ अशी ओळख असलेले कहांडोळे यांनी मालेगाव मतदारसंघातून सहा वेळा निवडणूक लढवली आणि त्यात तब्बल पाच वेळा त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली होती.
१९७७ च्या आणीबाणीनंतर भारतीय लोकदलाकडून प्रथमच निवडणूक लढवणारे हरिभाऊ महाले यांनी कहांडोळेचा पराभव केला. या पराभवाचा वचपा कहांडोळेंनी १९८० च्या निवडणुकीत लागलीच काढला. दहा वर्षाच्या विश्रांतीनंतर काँग्रेसने कहांडोळे यांना पुन्हा एकदा संधी दिली आणि पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरवत त्यांनी आपले पारंपरिक प्रतिस्पर्धी महाले यांना पराभूत केले.
१९९८च्या निवडणुकीतही त्यांनी पुन्हा विजयी झाले. सन १९९९ मध्ये जनता दल (निरपेक्ष) यांनी या मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला. त्यानंतर हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाटयाला गेला. राष्ट्रवादीने सन २००९, २०१४ व २०१९ मध्ये या मतदारसंघातून नशीब अजमाविले. मात्र, राष्ट्रवादीला यश मिळाले नाही.
राष्ट्रवादी पराभूत होत असल्याने अनेक काँग्रेसने हा मतदारसंघावर दावा केला. मात्र, नाशिक पाठोपाठ हा देखील मतदारसंघात पक्षाला उमेदवार देता आलेला नाही. पक्षाला उमेदवार नसल्याने पक्षाचे चिन्हही मतदारसंघात पोहचू शकले नाही. त्यामुळे काँग्रेसचे संघटन विस्कटीत होत गेले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.