Nashik News : मृग नक्षत्रातील पहिल्याच चरणात मालेगाव, चांदवड, निफाड तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. चांदवड तालुक्यात तर पाझर तलाव ओसंडून वाहिल्याने शेतकरी समाधानी आहे. जिल्ह्यात इतरत्रही पावसाने कमीअधिक हजेरी लावली असली तरी अजून दमदार पावसाची तेथे प्रतीक्षा आहे. मालेगाव, चांदवड तालुक्यात रविवारी (ता. ९) सायंकाळी सुरु झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत विविध भागात सुरु होता. (Malegaon Chandwad Niphad taluka receive heavy rains)
तालुक्यात ४०.५ मिलिमीटर एवढा पाऊस झाला. सौंदाणे मंडळात सर्वाधिक ७९.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान पावसासोबतच मोठ्या प्रमाणावर वादळ असल्याने अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून वीज तारांवर पडल्या. झाडे उन्मळून पडल्यानेही वीजपुरवठा ठप्प झाला. घरांवरचे पत्रे उडून नुकसान झाले.
मालेगाव, चांदवड शहरासह तालुक्यात मृग नक्षत्रातील पहिल्या पावसाने शेतकऱ्यांसह सर्वच घटकांना मोठा दिलासा दिला. मालेगावात दोन ते अडीच तास मुसळधार पाऊस झाला. वादळाने येथील छत्रपती शिवाजी महाराज जिमखान्याचे पत्रे उडाले. मुसळधार पावसाने गटारी तुडूंब भरून वाहत होत्या. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचले.
पाऊस सुरु असतानाच संपूर्ण शहरात बत्ती गूल झाली. तालुक्याच्या ग्रामीण भागात पावसाने सर्वत्र कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. रावळगाव येथील महिला शेतकरी रुक्मिणी बच्छाव यांच्या शेतात वीज पडली. यात त्यांची ८० हजार रुपये किमतीची जर्सी गाय मृत झाली. काटवनसह माळमाथ्यावर पावसापेक्षा वादळी वाराच अधिक होता. गावठी आंब्याच्या कैऱ्या वादळात सापडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
पत्रे उडाल्याने काही ठिकाणी चाळींमध्ये राखून ठेवलेला उन्हाळी कांदा भिजला. तालुक्यात झालेल्या नुकसानीचे महसुल विभागाकडून पंचनामे केले जात आहेत. पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरु केली आहे. आणखी एक-दोन मोठे पाऊस झाल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात का होईना सुटू शकेल. सध्या शेकडो गावे, वाड्या वस्त्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. (latest marathi news)
मालेगाव तालुक्यातील मंडलनिहाय पाऊस
मालेगाव - ३९.३ मिलिमीटर
दाभाडी - ५१.०
वडनेर - ३३.८
करंजगव्हाण - ४५.५
झोडगे - ५२.८
कळवाडी - ११.३
कुकाणे - १३.८
सौंदाणे - ७९.८
सायने - ४७.८
निमगाव - ३०.०
--------------
सरासरी - ४०.५
--------------
पाऊणतास ,जणू ढगफुटीच
चांदवड ः चांदवड शहरासह तालुक्यात रविवारी रात्री अनेक गावांत अतिमुसळधार पाऊस झाला. डोणगाव, निमोण, दरेगावसह परिसरात तर ढगफुटी सारखा कोसळला. जवळपास पंचेचाळीस मिनिटे चाललेल्या या पावसामुळे अनेक नदीनाल्यांना पूर आला होता. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पहिल्याच पावसात सिमेंट बंधारे ओसंडून वाहायला लागल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
चांदवड शहरातील या पावसाने रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. शहरातील अनेक भागात पाणी तुंबल्याने मोठी गैरसोय झाली.तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी पावसामुळे विजेचे खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. नवापूर येथील गुलाब शिवराम कुंवर यांच्या घराचे पत्रे उडून घराची पडझड होऊन संसार उघड्यावर पडला आहे.
मनमाड येथे मुसळधार
मनमाड ः मनमाड शहर परिसरात दोन दिवसापासून हुलकावणी देणाऱ्या मृगाच्या पावसाने रविवारी सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत पावसाच्यासरी सुरू होत्या. दरम्यान पावसामुळे वीज गेल्याने शहरात अंधार पसरला होता. उंचसखल भागात पाणी साचले होते.
रविवारी सायंकाळच्या सुमारास अचानकपणे काळे ढग जमा झाले. विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसाला सुरवात होताच नेहमीप्रमाणे वीजपुरवठा खंडित झाला. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. शेतकऱ्यांना देखील या पावसाचा मोठा फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
घरांचे पत्रे उडाले, पिकांचे नुकसान
नामपूर : उत्राणे (ता. बागलाण) परिसरात रविवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली, त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. घरांचे पत्रे उडाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. उत्राणे येथील निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी आनंदराव पगार, द्याने येथील सदाशिव कापडणीस, सुशीला कापडणीस यांच्या घरांचे पत्रे उडाले. वादळामुळे अनेक पोल जमीनदोस्त झाले. त्यामुळे या गावांचा रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाला होता.
उत्राणे रस्त्यावर वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. द्याने येथील भगवान कापडणीस यांचा साडेचार एकर मका भुईसपाट झाला आहे. कोबी पिकाचे नुकसान झाले आहे. परिसरातील आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सकाळी कैऱ्यांचा थर पडलेला दिसत होता. अनेक ठिकाणी कांदाचाळीत पाणी घुसल्याने कांद्याचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाने नुकसानग्रस्त घरे, शेतमालाचे तातडीने पंचनामे करून भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.