Nashik Market Committee : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नोकरभरतीला पणन संचालकांनी आदेश काढून स्थगिती दिली आहे. बाजार समिती कायद्यातील तरतुदी, शासनाकडील परिपत्रकीय आदेश आदींचा भंग करत ही भरती होत असल्याचा आरोप करत बेकायदा सुरू असलेली ही बाजार समितीची नोकर भरती तत्काळ रद्द करण्याची मागणी बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक शिवाजी चुंभळे यांनी पणन मंत्र्यांकडे केली होती. (Nashik Market Committee recruitment postponed by directors marathi news)
बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांनी नियमाप्रमाणे महागाई भत्ता व सातवे वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळण्यासाठी वेळोवेळी आंदोलन व उपोषण केले होते. परंतु अजूनही कर्मचाऱ्यांना सातवे वेतन आयोग लागू नाही. अशातच समांतर आरक्षणाबाबत शासन आदेशांचे पालन न करता बाजार समितीने घाईघाईने ५८ जागांवर कर्मचारी भरतीची कार्यवाही डिसेंबर महिन्यात हाती घेतली होती.
परंतु ही प्रक्रिया घेण्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालय व पणन संचालनालयाचे आदेश डावलून पुन्हा मर्जीतील कर्मचाऱ्यांना बेकायदा जम्पिंग पदोन्नती दिली. सदोष बिंदुनामावली तयार करून त्यास विभागीय आयुक्त कार्यालयातून मंजुरी मिळविली. कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ जुलै २०२३ पासून विनाकारण रोखून ठेवल्याचा आरोप आहे.
सन २०१६ पासून रोखून ठेवलेला महागाई भत्ता २०२३ मध्ये दिला. परंतु त्यातून कपात केलेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम अजूनही संबंधित खात्यात भरली नाही. अनुकंपा तत्त्वावर नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांना विभागीय सहनिबंधक नाशिक यांच्या आदेशानंतरही सेवेत घेतलेले नाही. (latest marathi news)
समांतर आरक्षणाचे पालन न केल्याने झालेल्या तक्रारींमुळे १४ फेब्रुवारी रोजी पुन्हा भरती जाहिरात प्रसिद्ध करण्याची वेळ बाजार समितीवर आली. या व इतर बेकायदा बाबी असल्याचे चुंभळे यांनी पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्याची दखल घेत पणन मंत्री यांनी बुधवारी (ता.२८) नाशिक बाजार समितीच्या भरतीला स्थगिती दिली आहे.
जिल्हा उपनिबंधकांच्या भूमिकेकडे लक्ष
बाजार समिती कायदा व तक्रार अर्जातील मुद्दे याबाबत सखोल चौकशी करून अहवाल शासनास सादर करण्याचे आदेश पणन संचालकांना दिले आहेत. कपात केलेला भविष्य निर्वाह निधी इतरत्र खर्च करणे हा भारतीय दंड संहिता कलम ४०९ नुसार गंभीर व अजामीनपात्र गुन्हा आहे. बाजार समित्यांवरील नियंत्रक अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक याबाबत काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्यातील बाजार समिती कर्मचारी आणि सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.
''बाजार समितीने विद्यमान कर्मचाऱ्यांना नियमानुसार सातवा वेतन आयोग, न्यायालय व पणन संचालकांच्या आदेशानुसार सेवाज्येष्ठतेप्रमाणे पदोन्नती दिल्यानंतर अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देऊन सेवेत घ्यावे. तसेच कर्मचाऱ्यांची सर्व थकीत देणी व्याजासह दिल्यानंतर योग्यप्रकारे आस्थापना खर्च तपासून टिसीएस किंवा आयबीपीसद्वारे भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करावी.''- शिवाजी चुंभळे, माजी सभापती तथा विद्यमान संचालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.