लासलगाव- चांदोरी : लासलगाव शहर परिसरासह गोदाकाठी यंदा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. नवरात्र उत्सवाला शेवटचे दोन दिवस उरले असताना यंदा प्रथमच महिलावर्ग युवक युवती बालगोपाल यांच्यामध्ये रासगरबा आणि दांडियाचा फिव्हर दिवसेंदिवस वाढत चाललेला दिसून येत आहे.
अनेक मंडळांनी विजेत्यांसाठी मोठमोठी आकर्षक बक्षीसे जाहीर केल्याने रंगत वाढली आहे. दरम्यान रासगरब्याबरोबरच विविध ठिकाणी देवीची आराधना, सप्तशतीपाठ आदी धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आलेले आहे. (Nashik Navratri 2024 Godakathi Garba Dandiya)
नवरात्रात नऊ रंगाच्या साड्या आणि विशिष्ट ड्रेस परिधान करून नवरात्राची धूम सुरू आहे. लासलगावमध्ये पारंपारिक नवरात्र मंडळांतर्फे रासगरबा होत आहे. गुजराती नवरात्र मंडळ, क्रांती मित्र नवरात्र मंडळ, श्री गणेशनगर नवरात्र मंडळ, राजमुद्रा नवरात्र मंडळ, दुर्गामाता नवरात्र मंडळ, इच्छापूर्ती नवरात्र मंडळ, संत नामदेव महाराज नवरात्र मंडळ यांच्यासह इतर नवरात्र मंडळात तरुणतरुणांची धूम बघायला मिळत आहे.
यंदा क्रांती मित्र मंडळाने दुर्गा शप्तशती सामूहिक पारायण, विविध गुणदर्शन कार्यक्रम, पैठणी लकी ड्रॉ स्पर्धा या विविध कार्यक्रमांमुळे महिला बालगोपाल वेशभूषा करून विविध संगीताच्या तालावर ठेका धरून आनंद घेत आहे. या मंडळातर्फे सायंकाळी महाआरती विविध मान्यवरांच्या उपस्थितीत घेतली जात आहे. निफाडचे पोलिस उपधीक्षक डॉ. नीलेश पालवे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सोनिया होळकर, लासलगाव पोलिस ठाण्याचे भास्करराव शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते महाआरती घेण्यात आलेली आहे.
"लासलगाव व परिसरात नवरात्रोत्सव शांततेत पार पडत आहे. सुरक्षा म्हणून पोलिस ठाण्यातर्फे गस्त पथक व पेट्रोलिंग सुरू आहे. प्रत्येक मंडळाला सुरक्षिततेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत."- भास्करराव शिंदे, सहाय्यक निरीक्षक, लासलगाव.
"पाणीपाऊस चांगला झाल्याने बऱ्याच दिवसानंतर नवरात्रोत्सवात उत्साहाचे वातावरण बघावयास मिळत आहे. महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे. यामुळे मंडळाचे स्वयंसेवक काळजी घेत आहे. महिला, युवक युती बालगोपाल मनसोक्त आनंद घेत आहेत."
- विशाल पालवे, आधारस्तंभ क्रांती नवरात्र मंडळ.
भाऊसाहेबनगरला गरबानृत्य
कसबे सुकेणे : भाऊसाहेबनगर येथील जय जनार्दननगर येथे नवरात्रीची धूम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. विविध उपक्रमांचे आयोजन जय जनार्दन महिला भक्त मंडळातर्फे करण्यात येत आहे. येथील महिला भक्तमंडळ नवरात्रोत्सवानिमित्त अनेक समाजोपयोगी कामांसह विविध स्पर्धा तसेच महिलांच्या गरबानृत्य स्पर्धा यांचे सादरीकरण केले जात आहे. नवरात्रीनिमित्त महिलांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. नवरात्रीच्या शेवटच्या टप्प्यात महिलांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे
लोणजाई येथे सामूहिक सप्तशतीपाठ
निफाड : लोणजाई देवस्थान हे अतिशय प्राचीन असून पेशवे काळातील सरदार विंचूरकर यांचे श्रद्धास्थान होते. या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला असून सभामंडप व भक्तनिवासाची सोय करण्यात आलेली आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होत असते. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी दरबारचे प्रमुख गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या प्रेरणेने दुर्गा सप्तशती पाठाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमास जिल्हाभरातून हजारो भाविक महिला व पुरुषांनी उपस्थिती होती. देवस्थानचे मार्गदर्शक बंडू शास्त्री महाले यांनी संचालन केले. विंचूर येथील दिलीप चव्हाण आणि मधुकर बाबूराव दरेकर यांना सपत्नीक महाआरतीचा मान देण्यात आला होता. सुभाषनगरचे सरपंच, उपसरपंच व सदस्य तसेच निफाड- विंचूर लासलगाव आणि परिसरातील सर्व स्त्री पुरुष सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले.
पाच वर्षाच्या बालिकेपासून सत्तर वर्षाच्या वृद्धेचा सहभाग
चांदोरी : गोदाकाठ भागात नवरात्रीचा फिव्हर दिवसेंदिवस वाढत आहे. चांदोरीमध्ये दांडियासाठी तरूणाईमध्ये गुजराथी वेशभूषेचे आकर्षण आणि गुजराथी संगीताची धूम सुरू आहे. हिंदी व मराठी चित्रपट गितांसह मराठी लोकगितांच्या तालावर दांडिया खेळण्यात तरूणाई दंग आहे. रास गरबा आणि दांडिया जल्लोषात खेळताना तरुणाईबरोबर लहानग्यांसह वयस्कर महिलाही सहभागी झाल्या आहेत.
या मंडळातर्फे दांडिया
- मोरया मित्र मंडळ, चांदोरी ( शरद नाठे, नीता नाठे, संदीप जाधव, छाया जाधव)
- दुर्गा माता मित्र मंडळ ( रवी सूर्यवंशी, कल्पेश टर्ले)
- राजे छत्रपती युवा प्रतिष्ठान ( संदीप टर्ले, मोनिका टर्ले)
- भैरवनाथ मित्र मंडळ, चौदा क्रमांक चारी
सोन्याची नथ, मोबाईल अन पैठणी
चांदोरी गावात होत असलेल्या विविध मंडळाच्या दांडियामध्ये विजेत्या महिलांना सोन्याची नथ, पैठणी अन मोबाईल, उत्तेजनार्थ विविध भेटवस्तू हे पारितोषिक दिले जात असताना प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी महिला दांडियाचा आनंद लुटताना बक्षीसाची लयलूट करत आहे.
क्रांतीनानांचा आज होममिनिस्टर
माजी जिल्हा परिषद सिद्धार्थ वनारसे यांच्या आदर्श युवा प्रतिष्ठानने सलग दुसऱ्या वर्षी प्रसिद्ध सिने अभिनेते क्रांतीनाना माळेगावकर यांचा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम शुक्रवारी (ता.११) संध्याकाळी सातला बसस्थानक येथे आयोजित करण्यात आलेला आहे. सहभागी महिलांना विविध पारितोषिक दिले जाणार आहेत. जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन प्रतिष्ठानने केले आहे.
सोनांबेत आईभवानीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी
पांढुर्ली : सिन्नर- घोटी महामार्गावरील सोनांबे शिवारातील डोंगराच्या कपारीत वसलेल्या आईभवानीच्या मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवासाठी मुंबई, नाशिक, सिन्नर, पांढुर्ली, विंचूरदळवी, सोनांबे व पंचक्रोशीतील भाविकांची श्रद्धा असल्याने दर्शनासाठी भाविकांची गर्ददीवाढत आहे.
आई भवानीचा जयजयकार डोंगरपरिसर भक्तिमय वातावरणामुळे फुलून गेला आहे. विविध धार्मिक कार्यक्रम, सकाळ संध्याकाळ देवीची आरती तसेच भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येत आहे. मंदिरात पहाटे मंदिराचे पुजारी राणोजी घोडे यांच्या हस्ते देवीला दररोजची रंगनिहाय साडी नेसवली जाते. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या मंदिराच्या डोंगरावरील ध्वज व आई भवानीची स्वयंभू मूर्तीस्थान प्रति तुळजापूर म्हणून नावारूपाला येत आहे.
अकरा वर्षांपूर्वी मंदिराचा जिर्णोद्धार खासदार राजाभाऊ वाजे, डॉ. गोरे, बी एम पवार, भास्कर पवार व भाविकांच्या उपस्थितीत करण्यात आला. नवव्या माळेला होमहवन आणि प्रसादाचे वाटप करण्यात येईल. जय भवानी लाँन्सचे संचालक व मंदिर समितीचे अध्यक्ष सोपान बोडके, सरपंच जनार्दन पवार, शांताराम पवार, पुजारी राणुजी घोडे,धोंडीराम वारुंगसे व पंढरीनाथ सदगीर, विनोद रोकडे, पप्पू घोडे, रावसाहेब बोडके, सागर घोडे, बाळासाहेब पवार, तानाजी पवार, दामू बोडके व भाविक तसेच ग्रामस्थ नवरात्र उत्सवासाठी नियोजन व परिश्रम घेत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.