Nashik NMC News : मागील साडेतीन वर्षांपासून महापालिकेकडून रीतसर परवानगी घेऊन रस्त्यांची तोडफोड करणाऱ्या मात्र सर्वच रस्ता आपल्या मालकीचा समजून मनमानी करणाऱ्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनी (एमएनजीएल) ने १५ ऑक्टोबरपासून शहरात १२६ किलोमीटरचे रस्ते खोदणार असल्याचे पत्र परस्पर बांधकाम विभागाला पाठविले.
त्यामुळे संतप्त झालेल्या बांधकाम विभागाने परवानगी न घेताच रस्त्यांची तोडफोड केल्यास गुन्हा दाखल करण्याचे पत्र पोलिसांना दिले आहे. जबाबदार दोन संस्थांमध्ये रस्त्यांच्या खड्ड्यांवरून निर्माण झालेला वाद आता शासन दरबारी पोचण्याची दाट शक्यता आहे. (NMC reply to MNGL arbitrariness with notice)
घरोघरी स्वयंपाकाचा गॅस पोचविण्यासाठी २०२१ पासून नाशिक शहरामध्ये एमएनजीएल कंपनीकडून रस्ते खोदाई सुरू आहे. रस्ते खोदाईसाठी महापालिकेकडे रनिंग मीटरप्रमाणे जवळपास पावणेदोनशे कोटी रुपये तोडफोड फीदेखील जमा करण्यात आली आहे.
महापालिकेची परवानगी मिळाल्यानंतर एमएनजीएलच्या ठेकेदारामार्फत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खोदाई सुरू झाली आहे. रस्ता खोदकाम करताना नियम आहे. तीन फुटाच्या पेक्षा अधिक खोल खड्डा करता येत नाही. त्या व्यतिरिक्त पाईपची रुंदी जेवढी असेल तेवढ्याच प्रमाणात खड्डे खोदणे गरजेचे आहे.
साधारण १०० मीटरचा खड्डा खोदल्यानंतर तेथे पाइपलाइनचे काम पूर्ण करावे व त्यानंतर पुन्हा माती ढकलून पुढील कामात सुरवात करावी. त्यापूर्वी दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू होत असताना पहिल्या टप्प्यातील कामावर खोदलेल्या रस्त्याचे तातडीने खडीकरण व डांबरीकरण करावे, असा नियम आहे. मात्र एमएनजीएलच्या ठेकेदाराकडून सर्रास मोठ्या प्रमाणात खड्डे खोदून नियमदेखील पाळले गेले नाही.
परिणामी पावसाळ्यात अपघातांची संख्या वाढली. खोदलेली माती रस्त्यावर आल्याने अपघात वाढले व खोदलेले रस्ते चुकीच्या पद्धतीने दुरुस्त केल्याने महापालिकेला अतिरिक्त आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्या व्यतिरिक्त किरकोळ अपघातांची संख्यादेखील वाढली. परिणामी नागरिक व लोकप्रतिनिधींनी महापालिकेच्या बांधकाम विभागाला जबाबदार धरले.
ताकही फुंकून
रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाकडूनदेखील यासंदर्भात ताकही फुंकून पिले जात आहे. असे असताना एमएनजीएल कंपनीकडून मात्र महापालिकेची मालमत्ता आपलीच असल्याच्या आविर्भावात त्याचप्रमाणे महापालिकेपेक्षा मोठी संस्था असल्याचे दाखवत परवानगी न घेताच १५ ऑक्टोबरपासून खुदाई करणार असल्याची फक्त माहिती कळविल्याने अधिकाऱ्यांचा संताप झाला. (latest marathi news)
महापालिकेनेही थोपटले दंड
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तसेच नागरिकांकडून होत असलेली ओरड लक्षात घेऊन १५ मेनंतर शहरात रस्ते खोदाई करण्यास बांधकाम विभागाने मनाई केली. आता पावसाळा संपत असताना १५ ऑक्टोबरपासून खोदाई करण्यासाठी कंपनीने महापालिकेला कळविले. मात्र महापालिकेने परवानगी घ्यावी, असा आग्रह लावल्याने वादास सुरवात झाली.
महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक असताना फक्त काम सुरू करणार असल्याचे परस्पर कळविल्याने महापालिकेनेदेखील तितकाच आक्रमक पवित्रा घेतला आहे. महापालिकेने परवानगी नाकारलेली असल्याने एमएनजीएलने खोदकाम सुरू केल्यास पोलिस कारवाई करण्याचा व करारनामा रद्द करण्याचा इशारा कंपनीला दिला आहे. या संदर्भातील नोटिशीची एक प्रत पोलिस ठाण्यामध्येदेखील जमा केली आहे.
"महापालिकेची परवानगी न घेता १५ ऑक्टोबरपासून काम सुरू करणार असल्याचे महापालिकेला कळविले. परंतु आपल्या पावसाळा सुरू असल्याने परवानगी देता येत नाही. त्यामुळे कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे."
- संजय अग्रवाल, शहर अभियंता, महापालिका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.