Onion Export esakal
नाशिक

Nashik Onion Export : निर्यातबंदी खुलीची घोषणा शेतकऱ्यांसाठी फार्स! सरासरी बाजारभाव 1500 रुपयांवरच

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी उठवून आठवडा होत आला तरी देखील कांद्याला अपेक्षित भाव मिळाला नाही. चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने दोन ते तीन दिवस बाजार समित्यांमध्ये आवक वाढली. येथील बाजार समितीच्या मुंगसे, सौंदाणे व झोडगे उपबाजारात जवळपास ७५ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. (Nashik Onion Export)

किरकोळ वाहनांना भाव दोन हजारावर गेला असला तरी सरासरी बाजार भाव १५०० च्या आत-बाहेरच राहिला. कांदा निर्यातबंदी उठविल्याचा निर्णय केवळ फार्स ठरल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीनंतर कांदा निर्यात खुली राहील की नाही याबाबत शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये साशंकता आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याचे पीक घेतले आहे.

केंद्र शासनाने ८ डिसेंबर २०२३ ला कांदा निर्यात बंदी केल्यापासून भाव कोसळले. लोकसभा निवडणूक प्रचारात शेतकऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त करताच निर्यातबंदी मागे घेण्यात आली. निर्यात खुली झाल्यानंतर पहिल्याच दिवशी भावात ५०० रुपयांनी सुधारणा झाली. तसेच, सलग तीन दिवस आवक वाढली. भावात झालेल्या वाढीचा आनंद काही तासच होता. दुसऱ्याच दिवशी जैसे थे परिस्थिती झाली.

अत्यंत कमी वाहनातील कांद्याला दोन हजार रुपये क्विंटल भाव मिळाला. किमान अडीच ते तीन हजार रुपये भाव मिळेल, ही अपेक्षा फोल ठरल्याने शेतकऱ्यांनी कांदा बाजारात आणण्यास हात आखडता घेतला. परिणामी, वाढलेली आवक देखील कमी झाली आहे. निर्यातबंदी उठविणे हा फार्स ठरल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. सरासरी बाजार भाव १५०० रुपयांच्या आत बाहेर स्थिर आहे. शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना माल विक्रीचे पैसे तत्काळ दिले जात आहेत. (latest marathi news)

उपबाजार आवारात सुविधांचा अभाव

मालेगाव बाजार समितीच्या मुख्य आवारात शेतकऱ्यांसाठी पाणी, निवारा, सावली शेड, प्रसाधनगृह, शौचालय आदी सर्व सोयी-सुविधा आहेत. मात्र, मुंगसे, सौंदाणे, निमगाव व झोडगे या उपबाजारांमध्ये पुरेशा सुविधा नाहीत. पिण्यासाठी पाण्याचे जार आणले जातात. निवारा शेड व इतर सोयी सुविधांची वाणवा आहे.

अपेक्षित भाव न मिळाल्याने बहुसंख्य शेतकऱ्यांनी कांदा चाळींमध्ये राखून ठेवला आहे. त्यातच निर्यातबंदी किती दिवस खुली राहील, याविषयी सर्वांच्याच मनात साशंकता आहे. परिणामी, भविष्यातदेखील भाव कितपत वाढतील, याबाबत सांगणे अवघड आहे.

"मालेगाव बाजार समितीच्या मुख्य आवारात शेतकऱ्यांसाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. मुंगसे, सौंदाणे व झोडगे उपबाजारात पिण्याच्या पाण्यासाठी जारची उपलब्धता नियमित केली जाते. यासाठी पाणी वाटप हातगाड्या तयार केल्या आहेत. या हातगाड्या लिलावाच्या ठिकाणी फिरत असतात.

मुंगसे, झोडगे, सौंदाणे, निमगाव या उपबाजारात शेतकऱ्यांना सावलीसाठी शेडसह विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित आहे. व्यापारी व माथाडी कामगारांमधील प्रश्‍न कायमचा मिटण्यासाठी समिती प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांची अडवणूक होवू नये व कांद्यासह शेतीमालाला सर्वोच्च भाव मिळावा हाच समितीचा मुख्य उद्देश आहे. व्यापारी व माथाडी कामगारांमधील वादामुळे शेतकऱ्यांसह बाजार समितीचे देखील आर्थिक नुकसान झाले." - विनोद चव्हाण, उपसभापती, मालेगाव

"कांदा निर्यातीसंदर्भात केंद्र शासनाने ठोस धोरण ठरविले पाहिजे. शेतकऱ्यांची वेळोवेळी दिशाभूल केली जाते. व्यापाऱ्यांचे होणारे नुकसान शेतकऱ्यांकडून वसुल केले जाते. अजून वेळ गेलेली नाही. राज्य व केंद्र शासनाने शेतकऱ्यांचे प्रश्‍नांकडे प्रामाणिकपणे लक्ष घालावे. शेती मालाला पुरेसा भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करतात.

खतांच्या किंमती वाढल्या आहेत. वीज, खते, बियाणे, औषधे या शेतीच्या चार मुलभूत गरजा शासनाने मोफत दिल्या पाहिजेत. शेतकऱ्यांना जिवंत ठेवायचे असेल तर भविष्यात कांदा निर्यातबंदी लादणार नाही याची शासनाने हमी द्यावी." - दिलीप जाधव, कांदा उत्पादक, रावळगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT