नाशिक : यावर्षी कांद्यासह अन्य नगदी पिकांनी साथ दिल्याने जानेवारीपासून आतापर्यंत जिल्ह्यात चार हजार दोनशेवर ट्रॅक्टरची विक्री झाली. एक ट्रॅक्टर सहा लाखांचा गृहित धरल्यास सुमारे २४० कोटी रुपये या खरेदीवर खर्च झाला आहे. वरचेवर रडवणाऱ्या कांद्याला मिळालेल्या चांगल्या भावाने शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आहे. दिवसेंदिवस बैलजोडी सांभाळणे खर्चिक होत असल्याने यांत्रिकीकरणाकडे वाढणारा शेतकऱ्यांचा कल यातून स्पष्ट होतो. (Onion farmer buys tractor worth billions due to good price of onion market )
ट्रॅक्टर खरेदीसाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या यांत्रिकीकरण योजनेचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुरेपूर घेतल्याचे यातून दिसते. यंदा शेवटच्या टप्प्यात उन्हाळ कांद्याला समाधानकारक भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना लाखोंचे उत्पन्न मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा ट्रॅक्टर खरेदीला पसंती दिली. नवरात्र काळात सुमारे दोनशेहून अधिक ट्रॅक्टरची विक्री झाली. ‘कांद्याला भाव मिळाला, अन ट्रॅक्टर दाराशी उभा राहिला’, अशा प्रतिक्रिया बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांकडून ऐकायला मिळत आहे.
जॉन डिअर, कुबोटा, मॅसे फर्ग्युसन, महिंद्रा सरपंच, फार्मट्रेक, न्यू हॉलंड, स्वराज, पॉवरट्रॅक, सोनालिका, आयशर, व्ही.एस.टी.मित्सुबिशी इत्यादी कंपन्यांच्या ट्रॅक्टरला शेतकऱ्यांचे प्राधान्य आहे. साधारण २२ ते २४ एचपीपर्यंत लहान ट्रॅक्टर पाच ते सहा लाखांपर्यंत; तर मोठा ट्रॅक्टर बारा ते तेरा लाखांपर्यंत असल्याने शेतकरी आर्थिक क्षमतेनुसार पर्याय निवडत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. ट्रॅक्टर खरेदीसोबतच ट्रॉली, रोटेव्हेटर, नांगर, टिलर इत्यादी यांत्रिक साहित्याचीही खरेदी केली जात आहे. (latest marathi news)
पारंपरिकऐवजी शेतकरी आधुनिक शेतीची कास धरत आहे. शेतकऱ्यांच्या अंगणातल्या खिल्लारी बैलजोडीची जागा ट्रॅक्टर घेत आहे. साधा नांगर, पलटी नांगर, पळी नांगर अशी यंत्रे जोडून शेतकऱ्यांना हव्या त्या प्रकारात नांगरणी त्यामुळे करता येते. रोटर, फण, फळी, पेरणी ही यंत्रेही ट्रॅक्टरला जोडता येतात. नांगरणी, वखरणी, पेरणी तसेच द्राक्ष व फळबागांमधील फवारणी इत्यादी कामे पारंपरिक पद्धतीने करण्यात खर्ची पडणारा वेळ ट्रॅक्टरमुळे वाचत आहे. एकूण मागणीपैकी सुमारे ३५ टक्के ट्रॅक्टर आता बिगरकृषी कारणांसाठी वापरले जातात. यातून तरुणांना रोजगारही मिळत आहे.
''घरची शेती कसण्याबरोबरच अन्य कामे करणे तसेच ट्रॅक्टरद्वारे रोजगारही मिळवता येत असल्याने शेतकऱ्यांचा दिवसेंदिवस ट्रॅक्टर खरेदीकडे कल वाढत आहे.''- मयूर कोटमे, ट्रॅक्टर व्यावसायिक, चांदोरी
बिनव्याजी कर्जयोजनेचा लाभ
राज्य शासनाच्या माध्यमातून मराठा समाजामध्ये व्यावसायिक तथा युवा उद्योजक तयार होण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून शेतीपूरक व्यवसायाला प्राधान्य देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी १५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळते. लाभार्थी शेतकऱ्यांना सात वर्षांत परतफेड करता येत असल्याने या योजनेला प्रतिसाद वाढत आहे.
(२०२४ मध्ये आतापर्यंत झालेली खरेदी)
शहर ट्रॅक्टर विक्री
लासलगाव - २३५
पिंपळगाव ब. - १२९०
निफाड - ५००
नांदगाव - २०५
मनमाड - ८०
चांदवड - ४५०
दिंडोरी - १०१५
सटाणा - २५०
देवळा - १५
कळवण - २५०
एकूण - ४२९०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.