Nashik Onion Market Strike : येथील बाजार समितीत माथाडी-मापारी कामगारांच्या हमाली, तोलाई, वाराई कपात आणि लेव्हीसंदर्भात सर्वमान्य तोडगा न निघाल्याने शेतमालाचे लिलाव तीन दिवसांपासून पूर्णतः ठप्प झाले आहेत. त्यामुळे एकट्या लासलगाव बाजार समितीत सुमारे नऊ कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. आवारात शुकशुकाट आहे. मात्र, विंचूर उपबाजार आवारात सर्व शेतमालाचे लिलाव सुरळीत आहेत.
हमाली, तोलाई, वाराई कपात आणि लेव्ही मुद्द्यावर सर्वमान्य तोडगा निघालेला नसल्याने माथाडी-मापारी कामगारांनी गुरुवार (ता. ४)पासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. यासंदर्भात त्यांनी बाजार समितीला पत्रही दिले आहे. या मुद्यांवर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी (ता. ५) देवळा येथे कांदा व्यापाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत बाजार समिती चालू करण्यास विरोध नसल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र, शेतकऱ्यांच्या हिशेबपट्टीतून हमाली, तोलाई, वाराई कपात करणार नसल्याच्या भूमिकेवर व्यापारी ठाम असल्याचा निर्णय घेण्यात आला.
काय आहे लेव्ही प्रश्न
पूर्वी पारंपरिक पद्धतीने शेतकऱ्यांकडून हमाली, वाराई, तोलाईसह कपात व्हायची. पण, २००८ पासून रक्कम शेतकऱ्यांकडून कपात न करता खरेदीदारांकडून कपात करायची, असा औरंगाबाद खंडपीठाने निर्णय दिला. लेव्ही रक्कम कोणी अदा करावी, याबाबत राज्य शासनाने खरेदीदाराकडून वसूल करावी, असा निर्णय दिला. सदर निर्णयाविरुद्ध नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीतील व्यापारी असून, याप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
त्यावर न्यायालयाने जिल्हा न्यायालयात निर्णय घ्यावा, असे नमूद केले. २००८ पासून हमाली, तोलाई, वाराई शेतकऱ्यांकडून कपात होते. मात्र, देवीची रक्कम कपात होत नसल्याने ती माथाडी मंडळाकडे जमा होत नाही. माथाडी कामगार मंडळाने जोपर्यंत सदर रक्कम अधिक दंड माथाडी मंडळाकडे जमा होत नाही, तोपर्यंत लिलाव प्रक्रियेत सहभागी होणार नसल्याचे सांगितले. (latest marathi news)
''उठसूठ नेहमी-नेहमी बाजार समित्या बंद ठेवून शेतकरी नाहक भरडला जात आहे. वाद व्यापारी आणि हमाल-मापाऱ्यांचा आणि लिलाव बंदमुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील बाजार समित्या तत्काळ सुरू करण्यासाठी निर्णय घ्यावा.''- भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघ
''हमाली, तोलाई विषयावर बाजार समित्या बंद ठेवून शेतकऱ्यांना वेठीस न ठेवता व्यापारी व बाजार समित्यांनी एकत्र निर्णय घ्यावा. पूर्वीप्रमाणे काट्यावर पोते भरून तोलाईऐवजी शेतकरी इलेक्ट्रिक काटा करून स्वतः पैसे देतो व हे हायड्रोलिक ट्रॉलीने कांदा खाली करतात. त्यामुळे शेतकऱ्यांकडून हमाली व तोलाई कायमस्वरूपी बंद करावी.''- विकास रायते, कांदा उत्पादक, खडक माळेगाव
''हमाल व तोलणाऱ्यांची नेमणूक बाजार समितीने पणन संचालकांच्या मंजुरीने केलेली असते. हमाल व तोलणार शेतकऱ्यांचा शेतमाल खाली करतात. त्यांची मजुरी शेतकरी देत आहे. त्या मजुरीवरील लेव्ही अडत्यांकडे मागत आहे. शासन आदेश पुणे जिल्ह्याच्या योजनेवरून काढलेला आहे. नाशिक जिल्ह्याची योजना शासन आदेश काढताना विचारात घेतलेली नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील अडत्यांचा लेव्ही देण्याचा काहीही संबंध येत नाही.''- प्रवीण कदम, संचालक, लासलगाव बाजार समिती
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.