Nashik Onion Market Strike : मार्च अखेर, शासकीय सुट्या, व्यापाऱ्यांचा आर्थिक ताळेबंद, हमाल मापारी संघटना यांच्या लेव्हीच्या प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेला लढा आदी कारणांमुळे जिल्ह्यातील बाजार समित्या दहा-बारा दिवसांपासून कुलूपबंद असल्याने कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प झाल्याने ऐन सणासुदीला शेतकरी अडचणीत आला आहे. (Nashik Onion Market Strike Onion farmers angry over market ban marathi news)
सध्या उन्हाळकांदा काढणीचा हंगाम जोमाने सुरू असून मार्केट बंद असल्याने शेतकऱ्यांची 'दुष्काळात तेरावा महिना' अशी अवस्था झाली आहे. बंद बाजार समित्या शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याचे चित्र आहे. ‘माय-बाप सरकार, कांदा मार्केट तातडीने सुरू करा’ अशी आर्त हाक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे. कांद्याचे लिलाव बंदमुळे कांदा उत्पादक, शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
बंद काळात बाजार समित्यांकडे कोणतीही सक्षम पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे शेतकऱ्यांची लूट होत आहे. मार्च एन्डनंतर लेव्हीचा मुद्दा चिघळल्याने बाजार समित्यांमधील व्यवहार ठप्प झाले आहेत. चाळी नसल्याने कांदा शेतातच पडून आहे. मजुरी अदा करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
बाजार समित्या तीन दिवसांपेक्षा अधिक काळ बंद ठेवू नये, असे आदेश पणन संचालक सोनी यांनी दिले होते. मात्र या आदेशावर वरवंटा फिरविण्याचे काम शेतकरीविरोधी घटक करीत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी आदींनी पुढाकार घेऊन तातडीने बाजार समित्या सुरळीत कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.
काय आहे प्रकरण....
शेतकऱ्यांनी शेतमाल विकल्यानंतर त्यांच्या हिशेब पट्टीतून हमाली व तोलाईपोटी २ टक्के रक्कम कापली जाते. या रकमेचा वापर हमाल आणि मापाऱ्यांसाठी माथाडी मंडळात आडत्यांमार्फत भरली जाते. माथाडी मंडळ पगाराच्या रूपाने ती माथाडींना (हमाल-मापारी-तोलाईदार वगैरे) अदा करते. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून ही रक्कम जमा झालेली नसल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले.(latest marathi news)
त्यानंतर या लेव्हीची ३४% रक्कम व्यापारी व आडते यांनी जमा करावी असा आदेश न्यायालयाने दिला. तशा नोटीसाही त्यांना मिळाल्या आहेत. त्यामुळे ते पैसे चुकते करणे व्यापाऱ्यांना भाग आहे. मात्र आडते व व्यापाऱ्यांचा प्रत्यक्ष मालक म्हणून हमाल-मापारींशी संबंध नसून त्यांची जबाबदारी ही नियमानुसार बाजार समितीची असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
''जिल्ह्यातील बाजार समित्यांत दररोज सुमारे दहा हजार वाहनांद्वारे दीड लाख क्विंटल कांद्याची आवक होते. दहा दिवस बाजार समित्या बंद राहिल्याने एक लाख वाहनांमधील कांदा शेतकऱ्यांकडे साचला आहे. त्यानंतर बाजार सुरळीत झाल्यावर कांद्याची प्रचंड आवक होऊन भाव पडल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान होण्याचा धोका आहे.''- प्रवीण अहिरे, जिल्हाध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्ष
''कांदा मार्केट बंदमुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. १ एप्रिलनंतरही केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय कायम ठेवल्यामुळे कांद्याच्या भावात सुधारणा झालेली नाही. आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे लाल कांद्याचं मोठं नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हितासाठी तातडीने बाजार समित्या सुरू होणे गरजेचे आहे.''- अभिमन पगार, उत्तर महाराष्ट्र प्रमुख, कांदा उत्पादक शेतकरी संघटना.
''कांदे काढून विकण्यासाठी शेतातच घोड्या घालून ठेवल्या आहेत. पण बहुतांश बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद असल्याने कांदा विक्री करण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. पावसाळी वातावरणामुळे कांदा भिजण्याचा धोका असल्याने लवकरात लवकर हा प्रश्न मिटवून पूर्ण क्षमतेने कांदा लिलाव चालू व्हावेत.''- अरुण निकम, विठेवाडी, ता. देवळा.
व्यापारी भूमिकेवर ठाम
देवळा ः माथाडी मापारी कामगारांची हमाली, तोलाई, वाराई कपात आणि लेव्हीसंदर्भात या मुद्यांवर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी (ता.५) देवळा येथे जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत मार्केट चालू करण्यास विरोध नसल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले मात्र शेतकऱ्यांच्या हिशोबपट्टीतून हमाली, तोलाई, वाराई कपात करणार नसल्याच्या भूमिकेवर व्यापारी वर्ग ठाम असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.
मात्र हमाल मापारी संघटनेचे म्हणणे असे की शेतकऱ्यांची अडवणूक न करता कोर्टाचा निर्णय येईपर्यंत प्रचलित पद्धतीने लिलाव सुरू ठेवावा. यामुळे कांदा लिलाव सुरू होण्यासंदर्भात प्रश्नचिन्ह कायम आहे. दरम्यान कामगार आयुक्त, जिल्हा उपनिबंधक तसेच तसेच स्थानिक प्रशासनाने लक्ष घालून संप मिटवावा आणि पुढील दोन दिवसांत बाजार समित्यांचे कांदा लिलाव सुरू करावेत.
तसे न केल्यास कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बरोबर घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव, जिल्हाध्यक्ष निवृती गारे, स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शिरसाठ, रवींद्र शेवाळे, रामकृष्ण जाधव आदींनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.