Nashik Polio Vaccination : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आज (ता. ३) पाच वर्षाखालील जिल्ह्यातील ४ लाख ३५ हजार ३५६ बालकांना पोलिओचा डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी’ ही यंदाच्या पल्स पोलिओ मोहिमेची टॅगलाईन आहे. (nashik Polio dose in district marathi news)
लसीकरणाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा, अंगणवाडी केंद्र, आदींच्या माध्यमातून व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवा, अंधश्रद्धेला बळी न पडता आपल्या बालकांना पोलिओचा डोस पाजावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांनी केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) १९८८ मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केल्यानंतर राज्यात १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दरवर्षी राबवण्यात येत आहे. यामध्ये पाच वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओची लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. गेली २५ वर्षे सातत्याने पोलिओ निर्मूलनाकरिता सर्व जण योगदान देत आहेत. भारतात १३ जानेवारी २०११ नंतर एकही पोलिओ रुग्ण आढळून आलेला नाही.
दरम्यान, पोलिओच्या समूळ उच्चाटनासाठी पोलिओ मोहीम लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात ३ हजार ६७१ बुथ उभारण्यात आले असून, ८ हजार ७८५ कर्मचारी या बुथवर कार्यरत असतील. (latest marathi news)
१ हजार ४५८ बुथवर तीन कर्मचारी तर २ हजार २१३ बुथवर दोन कर्मचारी असतील. नियमित बुथसह बसस्थानक, रेल्वेस्थानक, टोलनाका आदी ठिकाणी ट्रान्झिट टीम, तर वीटभट्टी, ऊसतोड कामगार, द्राक्ष छाटणी कामगार आदींसाठी मोबाईल टीम जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
३९ पर्यवेक्षकांवर जबाबदारी
पल्स पोलिओ मोहिमेसंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली आहे. उपजिल्हा रुग्णालयात, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आदींमधील सुमारे २५० वैद्यकीय अधिकारी, ७३० पर्यवेक्षक, जिल्ह्याचे ३९ पर्यवेक्षक आदींवर मोहिमेच्या यशस्वीतेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
गृहभेटीदरम्यानही होणार लसीकरण
पल्स पोलिओ लसीकरण दिनाच्या दिवशी डोस न घेऊ शकणाऱ्या वंचित बालकांना गृहभेटी दरम्यान पोलिओ डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेमध्ये आरोग्य विभागासोबतच जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ युएसएड, लायन्स क्लब रोटरी क्लब व स्वयंसेवी संस्था तसेच बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, परिवहन विभाग आदी विभागांचा सहभाग असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.