नाशिक : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरवात झाली असून, राजकीय पक्षांकडून रणनीती आखली जात आहे.
या रणनीतीचाच एक भाग म्हणून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांची भेट घेतल्याने मालेगाव तालुका व धुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शेवाळे यांच्या भेटीतून बावनकुळे यांनी टाकलेल्या गुगलीने अनेकांचा त्रिफळा उडण्याची भीती निर्माण झाली आहे.
धुळे लोकसभा व मालेगाव बाह्य या विधानसभा मतदारसंघातील राजकीय गणिते निवडणुकीच्या तोंडावर बदलतात की धुळे लोकसभा मतदारसंघ आणखी बळकट करण्यासाठी भेट होती, हे येत्या काळातच स्पष्ट होईल. (Nashik political News Bawankule Googly Congress and BJP office bearers Indications of preparation for Dhule Lok Sabha)
भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे शनिवारी (ता. २५) मालेगाव दौऱ्यावर होते. पक्षाचे नियोजित कार्यक्रम आटोपून धुळ्याकडे जात असताना बावनकुळे यांनी अचानक प्रवासाचा रोख बदलत थेट काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेवाळे यांचे निवासस्थान गाठले.
जनसंवाद यात्रेत पाच नागरिकांच्या घरी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोन पुस्तके देण्याचा हा उपक्रम आहे. मालेगावमध्ये शेवाळे यांच्यासह फक्त पाच लोक वास्तव्य करतात, असे नाही. मात्र, डॉ. शेवाळे हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असल्याने या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले.
बावनकुळे-शेवाळे यांच्या भेटीने नाशिक-धुळ्याच्या राजकीय खेळपट्टीवर गुगली टाकल्याचे मानले जात आहे. डॉ. शेवाळे यांच्या भेटीने पहिला धक्का बसला तो भाजपचे धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांना. शेवाळे लोकसभेसाठी इच्छुक आहेत.
त्यामुळे भामरे यांच्यानंतर पर्याय म्हणून शेवाळे यांचे नाव समोर येऊ शकते, असे बोलले जात आहे.
भाजपकडून खुंटा बळकट
आगामी लोकसभा निवडणुकीत पूर्ण बहुमताने निवडून येण्याची एकही संधी भाजपकडून सोडली जाणार नाही, हे स्पष्ट आहे. त्याचाच एक भाग म्हणून धुळे लोकसभा मतदारसंघासाठी खुंटा बळकट करण्याचा भाग म्हणून भेट घेतल्याचेही बोलले जात आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार व पालकमंत्री दादा भुसे यांचा विजय मिळविताना चांगलीच दमछाक झाली. मात्र, अखेरच्या क्षणी फिरलेल्या सूत्रांमुळे शेवाळे कुठे गायब झाले, हे मतदारांनाही समजले नाही.
मतदानाच्या दिवशीच अवतरल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. या भूमिकेमुळे भुसे यांचा विजय सहज सोपा झाला. काँग्रेसची ताकद या निमित्ताने मालेगाव बाह्य मतदारसंघात दिसून आली. लोकसभा निवडणुकीत धुळे मतदारसंघात या मतदारसंघाचा समावेश होतो.
भाजप किंवा शिंदे गटाच्या उमेदवाराला धोका नको म्हणून शेवाळे यांना भेटीनिमित्त प्रेमाचा संदेश देऊन लॉक केले असावे, अशी चर्चा आहे.
शिंदे गटाची वाढली धडधड
ट्रिपल इंजिन सरकारचे ढोल वाजविले जात असले, तरी या ट्रिपल इंजिन सरकारमधील घटक एकमेकांचे तीव्र स्पर्धक आहेत. या स्पर्धेतून एकमेकांना शह-काटशाह दिला जातो.
भविष्यात शिवसेनेच्या शिंदे गटाचे भाजपबरोबर बिनसले किंवा न्यायालय वा विधानसभा अध्यक्षांच्या निकालातून वेगळे चित्र निर्माण झाले, त्या व्यतिरिक्त सर्वेक्षणाचा निकाल वेगळेच गणित मांडत असेल तर तेथे शेवाळेंचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो, या भीतीने शिंदे गटाची धडधड वाढली आहे.
शेवाळेंभोवती संशयाचे वलय
शेवाळे यांना निवडणूक लढवायची आहे, हे लपून राहिलेले नाही, तसेच त्यांच्यात विजयाची क्षमता असली, तरी प्रचार रंगात आल्यावर ते यू टर्न घेतात, असे मतदार खुलेआम बोलतात.
आता बावनकुळे यांच्या भेटीनंतर शेवाळे यांच्याबद्दल काँग्रेसच्या बहुतेक जणांचा संशय अधिकच वाढला आहे.
"भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माझी भेट घेतली, तरी माझ्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही. भविष्यात राजकारण कसे बदलते, ते पाहू."
- डॉ. तुषार शेवाळे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.