Nashik News : लोकसभा सभागृहात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद नाशिकच्या धार्मिक क्षेत्रात उमटण्यास सुरवात झाली आहे. हिंदू धर्मावर आघात करत देवीदेवतांना अपमानित केल्याचा आरोप करताना संताप व्यक्त होत आहे. तसेच वक्तव्याला खोडण्यासाठी आध्यात्मिक दाखले देण्यात आले. (reaction of Leader of Opposition Rahul Gandhi speech in Lok Sabha)
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांमध्ये वाद-प्रतिसाद सुरू होते. यामध्ये धार्मिक टीकाटिप्पणीमुळे सामाजिक वातावरणही पेटले होते. निवडणुकींचे निकाल जाहीर झाले असले तरी अद्यापपर्यंत टीकाटिप्पणी सुरूच आहेत. अशात लोकसभा सभागृहात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नमूद केलेल्या वक्तव्याचा नाशिकच्या धार्मिक क्षेत्रातून निषेध नोंदविला जातो आहे. राजकारणासाठी हिंदू धर्माचा वापर करू नये, अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
"संसदेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदूंच्या संदर्भात बेताल वक्तव्ये केली. त्याचा निषेध सर्व संत, महात्मे करीत आहेत. शिवपुराणसमध्ये चोवीस हजार श्लोक विद्येश्वर, रुद्र, शत्रुद्र, कोटिरुद्र, उमा आणि कैलाश संहिता आहे. अन्य मतांनुसार शिवपुराणामध्ये सात अध्यायात वायू संहिताला अतिरिक्त अध्याय सांगितला आहे. यामध्ये कोठेही अभय मुद्रा दर्शवीत असल्याचे दिसून येत नाही. लोकसभा अध्यक्षांनी त्यांचे वक्तव्य कामकाजातून काढल्याने ते असंसदीय शब्द आहेत. खासदार गांधींचा निषेध करताना त्यांना शिवपुराण भेट पाठवत आहे." - महामंडलेश्वर सुधीरदास महाराज
"बहुसंख्य हिंदू धर्मीयांच्या देशात असून, त्यांचाच अवमान राहुल गांधी यांनी संसदेत केला आहे. विरोधी पक्षनेता म्हणविणाऱ्या राहुल गांधी यांचा अज्ञानीपणा सर्व देशाने पहिला. अहिंसेची परंपरा असलेल्या हिंदू धर्मीयांचा अवमान दुर्दैवी असून, याचा आम्ही तीव्र निषेध करतो."- महंत डॉ. भक्तिचरणदास महाराज, पंचमुखी हनुमान मंदिर ट्रस्ट (latest marathi news)
"राहुल गांधी स्वतः हिंदू आहेत, मग ते पण हिंसक आहे का? बहुसंख्य हिंदू धर्मीयांच्या देशात त्यांचाच अवमान, अपमान सहन केला जाणार नाही. संपूर्ण देशवासीयांची त्यांनी बिनशर्त माफी मागावी व यापुढे अशा प्रकारची गैरजबाबदार वक्तव्ये करण्याचे टाळावे." - धनंजय पुजारी, विश्वस्त व पुजारी, श्री काळाराम संस्थान
"राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते या जबाबदार पदावर असून, त्यांच्याकडून अशा वक्तव्यांची अपेक्षा नव्हती. त्यांनी परत एकदा त्यांच्या अपरिपक्वतेचे दर्शन घडविले आहे. अखंड हिंदू समाजाची नाराजी ओढवून त्यांचा हिंदूंविषयी असलेला राग व्यक्त झाला."- मंदार जानोरकर, विश्वस्त, श्री काळाराम संस्थान, श्री शनेश्वर मंदिर, पंचवटी
"हिंदू धर्माबाबत राहुल गांधींनी केलेल्या विधानाचा निषेध व्यक्त करतो. अपरिपक्व आणि बालिश विरोधी पक्षनेता असे त्यांच्याबाबत म्हणता येईल. देशाची प्राचीन परंपरा आणि हिंदू देवदेवतांचा नसणारा अभ्यासही दुर्दैवी बाब आहे. देशातील बहुसंख्य हिंदूंनीच विचार करणे अतिआवश्यक आहे."- डॉ. नरेंद्र धारणे, धर्मशास्त्र अभ्यासक
"राहुल गांधी यांच्या सभागृहातील वक्तव्याचा तीव्र निषेध आहे. हिंदू धर्म कधीही कुणाचा द्वेष, तसेच हिंसा करून दुसऱ्या धर्माच्या लोकांचे बळजबरी परिवर्तन करत नाही. हिंदू सहिष्णू असला तरी जेव्हा हिंदूंवर अन्याय होईल, तेव्हा हिंदू त्रिशूळ हातात घ्यायलाही मागे-पुढे बघत नाही, याची राहुल गांधी यांनी नोंद घ्यावी." - सतीश शुक्ल, अध्यक्ष, पुरोहित संघ
"हिंदू हिंसक असतात, या राहुल गांधी यांच्या विधानाचे तीव्र शब्दांमध्ये निषेध करतो. हिंदू समाज सहिष्णू, सर्व समावेशक आहे. हिंदू या सनातन म्हणजे कधीही नष्ट न होणाऱ्या समाजाबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत निषेधार्ह आहे. राहुल गांधींनी वक्तव्याबद्दल हिंदू धर्माची क्षमा मागावी व असे बेताल वक्तव्य पुन्हा करणार नाही, अशी शपथ घ्यावी." - वेदाचार्य रवींद्र पैठणे
"राजकारणासाठी धर्माचा वापर अत्यंत दुदैवी बाब आहे. केवळ मतांसाठी काहीही वक्तव्ये राजकीय नेत्यांनी करण्याचे टाळावे. मतदार हा राजा असून, त्यांच्या भावनांसोबतचा खेळ थांबायला हवा. वातावरण कलुषित होण्यापासून थांबविण्याची गरज आहे." - अमर ठोंबरे, सचिव, श्री निवृत्तिनाथ महाराज संस्थान, त्र्यंबकेश्वर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.