येवला : नाशिक-संभाजीनगर आणि अहमदनगर-मनमाड महामार्गावरील येथील विंचूर चौफुलीला अतिक्रमणासह बेशिस्तीच्या वाहतुकीने विळखा घातल्याने त्यावर पाच महिन्यांपूर्वी सिग्नलची उपाययोजना केली आहे. याचा बहुतांशी फायदा होऊन विस्कळितपणा थांबला असला तरी स्थानिक वाहनधारक तसेच मोटारसायकलस्वारांच्या घुसखोरीमुळे सिग्नल यंत्रणाही कुचकामी ठरत आहे. त्यामुळे आता स्थानिकांवरच आवर घाला, असे म्हणण्याची वेळ येवलेकरांवर आली आहे. (Yeola motorcyclists breaking traffic rules)
नाशिक-संभाजीनगरदरम्यान मोठी वाहतूक सुरू असते, तर अहमदनगर-मनमाड महामार्गावर तमिळनाडू, कर्नाटक, राजस्थानपासून आठ ते दहा राज्यांतील मालवाहतूक कंटेनर व ट्रक जात असल्याने शहरात वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यातच वर्दळीच्या विंचूर चौफुलीवरून या चार महामार्गांसह शहरातून गावाबाहेर व गावातून शहरात जाणाऱ्यांची मोठी संख्या असल्याने येथे प्रचंड विस्कळितपणा निर्माण झाला होता.
त्यातच चौफुलीच्या आजूबाजूला विक्रेत्यांची झालेली अतिक्रमणे अजूनच डोकेदुखी ठरत आहे. या चौफुलीवरील विस्कळित वाहतुकीमुळे १३ एप्रिलला १५ वर्षीय शाळकरी मुलगी टँकरखाली सापडून जागीच मृत्यू झाल्यानंतर शहरवासीय संतप्त झाले होते. त्यानंतर १५ मेच्या दरम्यान विंचूर चौफुलीवर सिग्नल यंत्रणा बसविल्याने कंटेनरसह मोठ्या वाहनांच्या वाहतुकीला शिस्त लागली आहे.
दुसरीकडे विंचूर रोडवरून शहरात जाणारे तसेच शहरातून कॉलनी भागात जाणारे मोटारसायकलस्वार तसेच महामार्गावर जाणारे स्थानिक चारचाकी वाहनधारक मात्र सिग्नलला न जुमानता कधीही, कोठेही आणि कसेही घुसत आहेत. यामुळे मोठ्या वाहनधारकांवर नाइलाजाने थांबण्याची वेळ येत असून, पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे.
अनेकदा तर मोटारसायकलस्वारांच्या घुसखोरीमुळेच वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र येथे दिसत आहे. विशेष म्हणजे, रेड सिग्नल असला तरी बिनधास्तपणे मोटारसायकलस्वार मध्ये घुसतात. यामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.
चोवीस तास नेमावेत पोलिस
या चौफुलीवर पूर्वी पूर्णवेळ वाहतूक पोलिसांची नेमणूक असायची, आता मात्र अनेकदा येथे पोलिसच नसतात. त्याचा गैरफायदा घेऊन स्थानिक वाहनधारक कुठे आणि कसेही घुसत आहेत. यावर पर्याय म्हणून शहर पोलिसांनी पूर्णवेळ वाहतूक पोलिस या ठिकाणी नेमावा अन् नियम मोडणाऱ्यांवर नियमितपणे कारवाई केली तरच वाहतुकीला शिस्त लागणार आहे. मध्यंतरी पोलिसांनी दोन दिवस कारवाईचा बडगा उगारला मात्र तो फोटोसेशनपुरताच मर्यादित ठरला आहे. (latest marathi news)
स्थानिकांनी बदलावी मानसिकता
राज्यातील तसेच परजिल्ह्यातील जाणारे-येणारे मोठे ट्रक, कंटेनर व इतर वाहनधारक या ठिकाणी सिग्नलचे तंतोतंत पालन करतात. मात्र स्थानिक चारचाकी व दुचाकीस्वार सिग्नलला न जुमानता मध्येच घुसखोरी करत असल्याने वाहतूक विस्कळित होत आहे. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळेलच पण वाहतूक कोंडीही वाढत चालली असल्याने स्थानिकांनी मानसिकता बदलून नियमांचे पालन करायला शिकावे, अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.
"सिग्नल बसवूनही विंचूर चौफुलीवर मोटारसायकलस्वार व वाहनचालकांचा बेशिस्तपणा कमी झालेला नाही. काही कुठूनही घुसतात, तर काही कुठेही वाहन उभे करतात. यामुळे येथील दुकानदारांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. नियम मोडणाऱ्यांना शिस्त लावावी, त्यामुळे चौफुलीवरील वाहतुकीचा विस्कळितपणा थांबेल."
-नितीन काबरा, संचालक, मर्चंट बँक, येवला
"येवला शहर व तालुक्यातील नागरिकांनी सिग्नलचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. सिग्नल क्रॉस करून जाण्याचा प्रयत्न करत असेल तर बाहेरून येणारी वाहने किंवा ट्रकवाले हेसुद्धा गाडी क्रॉस करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते. पोलिस प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे."
-गौरव कांबळे, अध्यक्ष, मनसे, येवला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.