नाशिक रोड : नाशिकमध्ये भाजपच्या उभारणीसाठी आणि विशेष करून नाशिक रोड व आसपासच्या ग्रामीण भागात तळागाळात हा पक्ष रुजावा म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील आडके यांनी चार दशके काम केले. आजपर्यंत पक्षाला ऊर्जितावस्था मिळवून दिली. आगामी महापालिका निवडणुकीत सुनील आडके यांच्या पत्नी मंगल आडके निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.
भाजप, नाशिक रोड-देवळाली व्यापारी बँक आणि विविध पक्ष संघटनांच्या माध्यमातून केलेल्या कामाची पोचपावती मतदार नक्की देतील, अशी प्रतिक्रिया मंगल आडके यांनी व्यक्त केली आहे. निवडणुकीत विजयश्री खेचून आणणार, असा आत्मविश्वास मंगल आडके व सुनील आडके यांनी व्यक्त केला.
सुनील आडके यांनी राष्ट्रीय स्तरावरील नेते श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी, मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज, स्मृती इराणी, प्रदेश स्तरावर प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, रामभाऊ म्हाळगी, सूर्यभान वहाडणे, धरमचंद चोरडिया, प्रा. ना. स. फरांदे, पांडुरंग फुंडकर, रघुनाथ कुलकर्णी, शरद कुलकर्णी, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, माजी पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री राम शिंदे, जयकुमार रावल, डॉ. राजेंद्र फडके, श्रीकांत भारतीय, रवींद्र भुसारी यांचे समाजकारण व राजकारण जवळून पाहिले.
पक्षाची कामे निष्ठेने केली
सुरवातीला भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष नंतर जिल्हाध्यक्ष, त्यानंतर महानगर उपाध्यक्ष आणि सतरा वर्षे भाजप महानगर सरचिटणीस म्हणून त्यांनी धुरा सांभाळली. भाजप प्रदेश कार्यकारिणीवर ते पाच वर्षे सदस्यही होते. वर्षानुवर्षे नाशिक रोड-देवळाली व्यापारी बँकेवर आडके यांनी विजयश्री खेचून आणली आहे. एकदा अध्यक्ष म्हणूनही काम करण्याची संधी मिळालेली आहे.
लोक न्यायदान करतील...
भाजपच्या तिकिटावर १९९२ ची महापालिका निवडणूक त्यांनी लढविली. त्यांच्यासमोर काँग्रेसचे अप्पासाहेब अरिंगळे हे दिग्गज उमेदवार होते. केवळ पक्षाचा जनाधार वाढावा, या हेतूने आडके यांनी पक्षाचा आदेश मानला होता. ते पराभूत झाले; मात्र निवडणुकीतील डावपेच ते शिकले. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नवख्या लोकांना पक्षाने भरभरून दिले. मात्र, चार दशकांपासून भाजपशी एकनिष्ठ असलेले सुनील आडके यांच्याकडे पक्षाने काहीसे दुर्लक्षच केले असल्याची खंत त्यांच्या नातेवाईक व कुटुंबीयांच्या मनात आहे. नाशिक रोडमध्ये भाजपचे अस्तित्व नसताना सुनील आडके यांनी निवडणुका लढवल्या, मेळावे घेतले. विविध समाजाच्या प्रश्नांवर आंदोलने केली; मात्र त्याची दखल अजून पक्षाने घेतली नाही म्हणून लोकच मतपेटीच्या माध्यमातून न्यायदान करतील, असा आत्मविश्वास आडके कुटुंबांनी व्यक्त केला आहे.
आंदोलन हीच ओळख
भाजपच्या प्रत्येक आंदोलनात आडके यांनी हिरिरीने भाग घेतला. राम जन्मभूमी आंदोलनात तर ते अग्रेसर होते. भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांनी देशभर दौरे केले. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका सहसा पक्षाच्या चिन्हावर कधीच लढविल्या जात नाहीत. परंतु, सात वर्षांपूर्वी झालेली देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक आडके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच पक्षाच्या चिन्हावर लढवली गेली. या निवडणुकीत त्यांनी मेहनत घेऊन भाजपचे पाच आणि रिपाइंचा एक मिळून भाजपची सत्ता या बोर्डावर आणली. नंतर चिन्हांवर निवडणूक लढविण्याचा देवळाली कॅम्प पॅटर्न देशभरातील बोर्ड निवडणुकांसाठी लागू झाला.
पक्षाने एकदा संधी द्यावी
सुनील आडके यांनी नाशिक रोडमध्ये पक्षाचे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी अनेक आंदोलने, मोर्चे, सामाजिक कार्यक्रम घेतले आहेत. नाशिक रोड आज भाजपचा बालेकिल्ला बनला आहे. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार निवडून आले. २०१७ च्या महापालिका निवडणुकीतही भाजपला नाशिक रोड पट्ट्यात घवघवीत यश मिळाले. त्याचे सारे श्रेय आडके यांनाच जाते. पक्षाच्या पडतीच्या काळात पक्षाला अस्तित्व मिळवून दिले. पक्षाने आपल्याला विधान परिषद किंवा एखादे महामंडळाचा अध्यक्ष करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
"प्रभाग २० मधून मी भाजपच्या तिकिटावर तयारी सुरू केली आहे. मूलभूत सोयी-सुविधा याव्यतिरिक्त लोकोपयोगी हायटेक कामे करणार आहे. शिवाय प्रभागात विखुरलेले नातेगोते यांचे जाळे, मित्रमंडळी, नाशिक रोड-देवळाली व्यापारी बँकेच्या माध्यमातून केलेल्या कामांचा फायदा आपल्याला निवडणुकीत विजयश्री खेचून आणण्यात होईल."
- मंगल आडके, अध्यक्ष, जिजाऊ महिला रोजगार स्वयंरोजगार संस्था
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.