Nashik Onion News : कांद्याचे भाव प्रतिक्विंटल तीन हजारांवर जाऊन पोचल्यानंतर अफगाणिस्तानचा कांदा आयात केल्याची उत्तर भारतात चर्चा सुरू आहे. पंजाबमार्गे भारतात अवघे २०० क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. परंतु भारताला एका दिवसाला ३५ हजार टन कांद्याची आवश्यकता असते. अफगाणिस्तानात उत्पादित केला जाणारा संपूर्ण म्हणजेच एक लाख ४१ हजार टन कांदा भारतात आणला तरी तो अवघे तीनच दिवस पुरेल. त्यामुळे कांदा आयातीची अफवा पसरवून कांद्याचे भाव पाडण्याचे राजकारण सध्या सुरू असल्याचे दिसून येते. (Rumors of Afghan onion import to lower prices )
राज्यात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन जिल्ह्यात होते. सद्यःस्थितीला ८० ते ९० हजार क्विंटल उन्हाळ कांदा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी येत आहे. प्रतवारीनुसार त्याला किमान एक हजार ते कमाल तीन हजार रुपये म्हणजे सरासरी दोन हजार ७०० ते दोन हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळताना दिसतो. त्यामुळे शेतकरी समाधानी असून, बाजार समित्यांमधील आवक कायम असल्याचे दिसते.
अशा परिस्थितीत सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर कांदा पोचल्याने आता उत्तर भारतातून अफगाणिस्तानचा कांदा आयात केल्याचे वृत्त समाजमाध्यमांवर पसरवले जात आहे. त्याला महाराष्ट्रातील शेतकरी संघटना साथ देत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या विरोधात वातावरण तयार होऊ लागले आहे. कांदा विकत घेणाऱ्या व्यापारी या अफवेचा गैरफायदा घेऊन कांद्याचे भाव कमी करू शकतात.
त्यांना साथ देऊन शेतकरी संघटनाच शेतकरीविरोधी भूमिका बजावत असल्याचे दिसून येते. काही शेतकरी संघटनांनी अफगाणिस्तानच्या कांद्याला विरोध केला आहे. परंतु, देशात अवघे २०० क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. एवढा कांदा तर एकट्या नाशिक शहरालाही पुरणार नाही. त्यामुळे अफगाणिस्तानच्या कांद्याबाबत जाणीवपूर्वक अफवा पसरवली जात आहे. (latest marathi news)
सोमवारी भाव किंचित घसरले
गेल्या सोमवारच्या तुलनेत या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी उन्हाळ कांद्याच्या भावात किंचित घट झाली आहे. सरासरी बघितली, तर कांद्याचे भाव एकसमान दिसतात. जास्तीत जास्त कांदे अडीच ते तीन हजार रुपयांनी खरेदी केले आहेत. गेल्या सोमवारी (ता. ८) लासलगाव बाजार समितीत प्रतिक्विंटल किमान एक हजार ते कमाल तीन हजार १७२ रुपये म्हणजे सरासरी दोन हजार ८५१ रुपये इतका भाव मिळाला. सोमवारी (ता. १५) किमान एक हजार ५२ ते कमाल तीन हजार एक इतका भाव मिळाला. शेतकऱ्यांचे प्रतिक्विंटल शंभर ते दोनशे रुपयांचे नुकसान झालेले दिसून येते.
''अफगाणिस्तानच्या कांद्याच्या नावाखाली महाराष्ट्रातील कांद्याचे भाव पाडले जात असतील, तर त्याला आम्ही पूर्णत: विरोध करणार आहोत. या संदर्भात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना यापूर्वीच निवेदन दिले आहे. तरीही कांदा आयातबंदी केली नाही, तर आम्ही आंदोलन करणार आहोत.''- भारत दिघोळे, अध्यक्ष, कांदा उत्पादक शेतकरी संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.