Nashik News : दहावी, बारावीनंतर उपलब्ध असलेले करिअरचे सर्वोत्तम पर्याय जाणून घेण्यासाठी विद्यार्थी, पालकांनी 'सकाळ विद्या एक्स्पो २०२४' या शैक्षणिक प्रदर्शनात गर्दी केली होती. प्रदर्शनाच्या माध्यमातून मनातील शंकांचे समाधान होऊन, उचित अभ्यासक्रम निवडीसाठी सहाय्यता झाल्याची प्रतिक्रिया अनेक विद्यार्थी, पालकांनी बोलून दाखविली. (Sakal Vidya Expo 2024 concludes with enthusiastic response)
तर मिळालेल्या प्रतिसादामुळे सहभागी संस्थांचे पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या तीन दिवसीय प्रदर्शनाचा उत्स्फूर्त प्रतिसादात रविवारी (ता.१६) समारोप झाला. सिटी सेंटर मॉल समोरील लक्षिका सभागृह येथे आयोजित 'सकाळ विद्या एक्स्पो २०२४'या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक मराठा विद्या प्रसारक समाज संस्था (मविप्र संस्था) होते.
पॉवर्ड बाय के. के. वाघ शिक्षण संस्था आयोजित प्रदर्शनासाठी सह-प्रायोजक पीडब्ल्यू विद्यापीठ फिजिक्सवाला, तर प्रायोजकांमध्ये अशोका बिझनेस स्कूल आणि ब्रह्मा व्हॅली एज्युकेशन कॅम्पस यांचा समावेश होता. अनेकांनी संस्थाचालकांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करत समुपदेशन करुन घेतले. यामध्ये प्रवेश प्रक्रियेबाबतची माहिती, अभ्यासक्रम निवडीनंतर उपलब्ध असलेले करिअरचे पर्याय, यासह इतर बाबींची माहिती जाणून घेण्याकडे कल राहिल्याचे बघायला मिळाले.
गुणवंतांना मिळाले प्रोत्साहन
या प्रदर्शनानिमित्त दहावी, बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली. या सत्कारामुळे यापुढील काळात चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरणा मिळणार असल्याची भावना सत्कारार्थी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
सीईओ मित्तल यांच्याकडून उपक्रमाचे कौतुक
प्रदर्शनास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी भेट दिली. विविध स्टॉल्सला भेटी देत त्यांनी माहिती जाणून घेतली. 'सकाळ'तर्फे आयोजित प्रदर्शनात करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन उपलब्ध होत असल्याने त्यांनी उपक्रमाचे कौतुक केले. आगामी काळात 'सकाळ'सोबत मार्गदर्शक उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. (latest marathi news)
यशस्वी उमेदवारांचे मनोगत
काही दिवसांपूर्वी एसपीआयमध्ये निवड झालेल्या आंचल गायकवाड, श्रद्धा हरक आणि मानसी कारले या विद्यार्थिनींनी व्याख्यानाप्रसंगी उपस्थिती नोंदविली. 'सकाळ'चे वरिष्ठ व्यवस्थापक (जाहिरात) पंकज पिसोळकर यांच्या हस्ते या विद्यार्थिनींचा सत्कार झाला. यानंतर या तिघींनी एसपीआयमध्ये यश मिळविण्याचे गमक उपस्थितांसमोर उलगडून सांगितले. अनुभव कथन करताना, उपस्थित विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळविण्यासाठी टिप्स दिल्या.
"'सकाळ'च्या प्रदर्शनातून विद्यार्थी, पालकांशी संवाद साधता आला. संस्थेच्या विविध अभ्यासक्रमांची माहिती त्यांच्यापर्यंत पोचविली असून, त्यांना मार्गदर्शन केल्याचे समाधान आहे. उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याबद्दल 'सकाळ' समूहाचे अभिनंदन करतो." - ॲड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र संस्था.
"करिअरविषयी शंकांचे निरसन होणे महत्त्वाचे असते. प्रदर्शनात मिळालेल्या माहितीमुळे अनेक विद्यार्थी, पालकांचे संभ्रम दूर झाले असून आता अभ्यासक्रमाची निवड करणे सोयीचे जाणार आहे. असा अभिनव उपक्रम राबविल्याबद्दल 'सकाळ'चे आभार मानतो."- अजिंक्य वाघ, जनसंपर्क संचालक, के. के. वाघ शिक्षण संस्था.
"'सकाळ' तर्फे सामाजिक जाणीवातून उपक्रमांचे आयोजन केले जाते. 'सकाळ विद्या एक्स्पो'तून ही सामाजिक बांधिलकी जोपासली गेली आहे. प्रदर्शनाला मिळालेल्या प्रतिसादाने आम्ही समाधानी आहोत." - राजाराम पानगव्हाणे-पाटील, संस्थापक, ब्रह्मा व्हॅली ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट.
"गेल्या दहा महिन्यांपासून ऑफलाइन पद्धतीने आम्ही नाशिक सेंटरच्या माध्यमातून कार्यरत असून, प्रदर्शनानिमित्त अधिकाधिक पालकांपर्यंत पोहचण्याची आम्हाला संधी मिळाली. पालकांच्या अपेक्षा जाणून घेताना आणखी काय सुधारणा करता येईल. आयोजकांचे आम्ही आभार मानतो." - शुभेंद्र मिश्रा (मार्केटींग हेड, फिजिक्सवाला)
"करिअर निवडीबाबत योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. अनेक विद्यार्थ्यांना प्रदर्शनातून उपयुक्त माहिती दिल्याने त्यांना सुस्पष्टता आली. प्रदर्शनात सहभागाचा आमचा अनुभव चांगला राहिला." - डॉ. नरेंद्र तेलरांधे, प्रशासक, अशोका एज्युकेशन फाउंडेशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.